शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

गणूची आठवी गोष्ट: हाक

का कुणास ठाऊक? गणू मोठा होत चाललाय तसतसा आईचा चढा आवाज त्याला जास्त वेळा ऐकू येऊ लागलाय. तो कुठलंही काम करत असला की नेमकी त्याच वेळी म्हणे आईनी हाक मारलेली असते. परवा चक्क जुन्या चित्राच्या वहीत रंगवारंगव चालू होती, तेवढ्यात त्या रंगाच्या डबीतली वडी फरशीवर पडली, ती उचलायला गेला तर पाणी मांडलं. फडक्याने पुसायला सुरूवात केली तर तेवढ्यात त्या ब्रश पुसण्याच्या कापडातून दोरे बाहेर यायला लागले. मग ते दोरे जरा रंगात बुडवून कागदावर फिरवले, तर भन्नाट नक्षी तयार झाली. लहानमोठे वेटोळे काढताना धम्माल आली. मग, पॅलेट, ब्रश, ते फडकं, दोऱ्याची गुंडाळी हे सगळं सरळ खाली ठेवून हुश्श म्हणून उभा राहिला, तर दारात आई उभी. अशी नुसती न बोलता उभी राहिलेली ही आई म्हणजे एक मोठ्ठी भीती असते. कारण त्यानंतर ती “ओ द्यायला काय हरकत आहे?” असं ती त्याच्या अजिबात न आवडणाऱ्या आवाजात सांगायला लागते. मग ती त्याला कळेल असं आणि न कळेल असं खूप काय काय बोलणार असते. ते तिला तसं खरं खरं सांगितलं, तरीही आवडत नाही. तिला म्हटलं, की का रागवतीयेस? “तर म्हणते माझा आवाजच असा आहे.” पण तिच्या असं उभं राहण्याचं कारण एकच असतं ते म्हणजे तिची मला न ऐकू आलेली हाक. किती वेळा हाक न मारता मी सारखा समोर जातो तर म्हणते पायात पायात करू नको, खेळ आपलं आपलं. आता खेळतोय तर ही हाक ... आता काय करायचं अशा वेळी?

गणूची पहिली गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/06/blog-post_28.html
गणूची दुसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/09/blog-post.html
गणूची तिसरी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/07/blog-post.html
गणूची चौथी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2017/08/blog-post_6.html
गणूची पाचवी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2018/01/blog-post.html
गणूची सहावी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2018/01/blog-post_5.html
गणूची सातवी गोष्ट: http://nanditagadgil.blogspot.in/2018/01/blog-post_8.html