आजीची पत्रं

           
            लहानपणी आपण कसे गंमतीदार वागतो, कोणी गावाहून आलं की लगेच मला काय आणलंय? आई भाजी घेउन येतेय तर माझ्या आवडीची आणलीस का? असं आपलं टुमणं चालूच असतं. याच 'मला काय आणलंय' या भानगडीत एक दिवस भर पडली ती आजीच्या पत्राची. बाबा पोस्टाच्या पेटीतून कागदपत्र घेउन आले, तर त्यात चक्क एक पत्र होतं 'चि. नंदितास,...'. मराठी भाषा एव्हाना लिहीता वाचता येउ लागलेली त्यामुळे ताबडतोब त्या पत्रावर हल्ला करीत पत्राचा फडशा पाडला. पण त्यात नुसतं कौतुक नाही तर एक अपेक्षाही होती प्रत्युत्तराची. मग आईच्या मागे लागून रेघा बिघा अाखून खंडीभर गप्पांमधल्या ४-६ ओळी लिहून ते पहिलं पत्र पोस्ट केल्याचं आठवतंय.
            त्यानंतर मात्र आजी माझी कायमची पेनफ्रेंड बनली. माझी शाळा, मैत्रिणी, अभ्यास, परीक्षा, गॅदरींग असं करीत करीत माझं पत्र मोठं होत गेलं अाणि कधी माझा वाढदिवस, कधी बागेतला मोगरा, कधी खिडकीतून डोकावणारा वेडा राघू, कधी भारताची भन्नाट बॅटींग असे आजीच्या पत्रातले विषय बदलत गेले. कळत नकळत गप्पांची जागा विचारांनी घेतली. पत्रातून होणारा भावनेचा स्पर्श मनाला संस्काराचं खतपाणी देत होता.
             तिच्या पत्रात क्वचित कधी तरी भूकंपासारख्या भयानक गोष्टीमुळं आलेला अस्वस्थपणाही असायचा, क्षणभर का होईना समाजाचं भान तो देउन जायचा. तर कधी पोखरणच्या अणुस्फोटासारखी एखादी घटना असायची न् त्यात ती या घटनेमुळं अवघ्या देशाला अालेला हुरुप वर्णन करायची. कधी तरी तीव्र संताप असायचा टीव्ही सिरीयलबद्दल तर कधी असायचा साहित्यकारांचा गुणगौरव. कधी पुस्तकांची ओळख करून द्यायची तर कधी आपल्याच माणसांची नवी ओळख आणि त्यांच्यावर कौतुकाचा पाउस. कधी तरी निश्चय करून झानदेवांच्या ओव्यांचं लेखन चाले, कधी अर्जुनाचे प्रश्न, कधी कृष्णाची उत्तरं तर कधी नादमधुर भाषासौंदर्यच फक्त. किती न् काय काय दिलं त्या शब्दांनी. माया, प्रेम, आत्मविश्वास तर दिलाच दिला पण ओळख करुन दिली माझीच मला. हे म्हणताना पुन्हा जाणवतंय, या तिच्या स्नेहाचा वर्षाव तिच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीवर झाला. तिच्या संपर्कात आलेल्या कितीक लोकांना तिनं या पत्रांच्या धाग्यानं अलवार गुंफलं होतं, जपलं होतं.
              कधीतरी काहीतरी शोधत कपाट उघडावं, जे हवं ते सोडून भलतंच हाती यावं आणि यात घड्याळाचे काटेही भराभर पुढे पळून जावे तसं काहीसं होतं तिची पत्रं हाती लागतात तेव्हा. जुन्या पत्रांचा जुना वास, तिच्या पेनाची शाई, तिचं अक्षर अाणि त्याचं ठराविक वळण, त्या शब्दातली अफाट माया या सगळ्यानं मिळालेल्या श्रीमंतीनं गहिवरून यावं अाणि तो गहिवर डोळ्यावाटे पाझरु लागताच त्या अक्षरांनी, काना,मात्रा, वेलांट्या्नी अापल्याभोवती फेर धरुन नाचत अापल्याला त्याच सहवासाचा अनुभव द्यावा अाणि तोच पत्रांचा गठ्ठा हातात घेउन 'माझे सुख मोठे, ठेउ कळेना कोठे' म्हणत अापणही त्या अानंदात बुडून जावं. 

टिप्पण्या