भौमितिक दिवाळी

शाब्दिक दिवाळी, सांगीतिक दिवाळी, पौष्टिक दिवाळी तशीच एक भौमितिक दिवाळी. 

कंपास, कर्कटक, कोनमापक, सहा इंची पट्टी, टोक केलेली गुळगुळीत शिसाची पेन्सिल, खोडरबर, सोबत कागद म्हणजे दिवाळी. समांतर रेषा, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, लंबदुभाजक, कोनदुभाजक, आंतरवर्तुळ यांनी सजलेलं टेबल म्हणजे दिवाळी. x आणि y यांच्याबरोबर z ऍक्सिसने दुपारभर सहजपणे ५,,, खेळायला येऊन बसावं ती दिवाळी. द्विमितीतली आकृती(2D) त्रिमितीत(3D) बदलुन जाते; घन, शंकू, तीन/चार बाजूंचा पिरॅमिड असे वेगवेगळे आकार समोर येताना दिसणं म्हणजे दिवाळी.

एखाद्या कागदाला आपण वळवू तसा तो वळतो आणि किती वेगवेगळे आकार तयार होतात. मग असे किती आणि कुठले वेगवेगळे आकार एकमेकांना जोडले तर एक बंदिस्त आकृतीबंध तयार होईल असा विचार करत आकाशदिव्याच्या अनेक कल्पना मनात येतात. शाळेच्या भूमितीच्या पुस्तकात भेटलेले युक्लीड आणि पायथागोरस डोकावून जातात. कुठल्या कुठल्या कळलेल्या न कळलेल्या प्रमेयांची उजळणी करत भौमितिक दिवाळी रंगात येते. कागदावर एक चित्र तयार होतं, त्याचे भौमितिक रचना काढली जाते, योग्य त्या जागी चिकटपट्टी ठेवत ती रचना कापली जाते.
कागदावर हा पूर्ण साचा तयार होतो. मग या सगळ्या आकारांना एकमेकांत जोडायचं. एकेक आकार जोडत असताना अर्धवट रंगवलेलं चित्र पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल असं वाटून चित्रकाराला त्या कलेचं आणखी वेड लागतं तसं काहीसं या आकाशकंदीलाचं होतं. शेवटचा एक तुकडा जोडून ती कलाकृती पूर्ण होणार असते पण तो शेवटचा तुकडा प्राण कंठाशी आणतो, अगदी पुन्हा पहिल्यापासून काही गोष्टी बनवाव्या लागतील की काय इतकी वेळ येते. पुरेशी परीक्षा घेत अलगदपणे तो शेवटी सिंहासनावर विराजमान होतो. आकाशकंदील हातात घेतला की मनातल्या मनात आपला आनंद ३०, ६०, ९० म्हणत अंशाअंशांनी वाढत भौमितिक उत्सव साजरा करीत असतो.
मजा असते हा आकाशकंदील म्हणजे. थोडं गणित, थोडीशी भूमिती, थोडे कागद, कात्री, हाताला चिकटून कोरडं झालेलं फेव्हीकॉल, नको तिथे मध्येच टरकन फाटून जाणारा जिलेटीन, क्रेप पेपरची उलगडली गेली की बंद न होणारी गुंडाळी, खूप पसारा, खूप गडबड, वायरची लांबी, बल्बचं माप, नंतर कसंबसं मोठ्ठं केलेलं आकाशकंदिलाचं तोंड, सगळी तयारी करून चालू केलेलं बटण आणि मग त्या कंदिलातून येणारा थोडासा कलणारा, डोलणारा, वाऱ्यावर झुलणारा, मध्येच हिरमुसणारा, खुलणारा आणि चेहऱ्यावर हास्याची पुसटशी लकेर आणणारा उत्साहाचा, उमेदीचा आणि आत्मविश्वासाचा उजेड!!

टिप्पण्या