काय कधी कोणी कुठे ..... that's the way माही वे......


धोनी टेस्ट नंतर एकदिवसीय सामन्यांचं कप्तानपद सोडून देतोय....... ? पूर्वीचे captain चांगले होते, आताचा captain लईच भारी आहे वगैरे सगळं झालंच पण धोनी? धोनी धोनी आहे. कारण तो नुसता भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान नाहीये तर पूर्ण देशाला गर्व वाटावा असा एक कमालीचा नेता, व्यवस्थापक, दिग्दर्शक आहे. क्रिकेटच्या मैदानावर सलग चार वेळा संघाला जिंकून देणारी फोर किंवा सिक्स मारा, हेलीकॉप्टर शॉट नावाचा विशेष शॉट तुम्ही अस्तित्वात आणा, तुम्ही जिंका, हरा, वर्ल्डकप मिळवा, आजूबाजूच्या खेळाडूंकडून थट्टा होऊद्या; तरीही हा माणूस जमिनीवर आणि शांत. स्थितप्रज्ञ की काय म्हणतात तसला हा शहाणपणा किंवा प्रगल्भता...काहीही काय....असं असतं का काही!
 कित्येक मॅचेस कप्तानाच्या चांगल्या निर्णयामुळे जिंकलेला कदाचित आपलाच संघ असेल. हा कप्तान मॅच सुरु होण्यापूर्वी विरोधी संघाशी कसं खेळायचं याचं नियोजन नुसतंच करत नाही तर ते घडवूनही आणतो. त्याच्या संघाला, त्त्यातल्या खेळाडूंचा खेळ; त्यांच्या क्षमता तो ओळखून असतो त्यानुसार तो संघाची क्रमवारीच नाही तर त्याचं कर्तृत्वही उंचावू शकतो, त्याला त्याच्या संघाबद्दल इतका आत्मविश्वास आहे की जो म्हणतो इथून पुढे दहा वर्ष तरी कुठल्याही मैदानात, कुठल्याही प्रकारच्या हवामानाचा सामना करायला आपला संघ सज्ज आहे, कुठलाही सामना सुरु होण्यापूर्वी प्रेससमोर बसून बडबड करणे हे वेळ वाया घालवण्यासारखं आहे हे जो प्रेस समोर स्पष्ट सांगू शकतो, सगळ्यात कहर, जो एखादं पद घेऊन ती जबाबदारी नुसती पार न पाडता संघाच्या खेळाचा दर्जा उंचावून कोणाच्याही सांगण्यापूर्वी ते कप्तानपद सोडून जातो कुठलाही अभिनिवेश न आणता.....असं कोणी असतं का!!
अशा किती मॅचेस असतील ज्याबद्दल तासनतास बोलता येऊ शकेल, किती लिहावं तेवढं कमी आहे, तरीही गेल्या वर्षीचा वर्ल्डकप T20 बांग्लादेश विरुद्धचा दुसरा सामना आठवतोय, भारताकडे शेवटचे ३ बॉल राहिलेले, आणि बांग्लादेशला फक्त दोन रन्स हव्या होत्या; त्यात आपण चक्क दोन विकेट्स घेतल्या, आता एक बॉल आणि एक रन अशी परिस्थिती ...तर ...हा महान मनुष्य एका हाताचा ग्लोव्ह काढून नव्या खेळाडूला धावबाद करायला तयार ....पुढचा बॉल येतो काय ? आणि खरंच तो खेळाडू धावबाद होतो काय? निर्णय कळण्यापूर्वीच संघाकडे येताना “out आहे हा ” असं निवांत म्हणत येतो काय? सगळंच कल्पनेच्या बाहेरचं....भारताच्या इतर कुठल्याही खेळाडूबद्दल बरं न बोलणारा पाकिस्तानचा मियांदाद सुद्धा याला दाद देऊन जातो... असं कधी असतं का!!!
आम्ही लोक सचिन आउट झाला तरी भारत मॅच जिंकू शकतो हे शिकललो आहोत एव्हाना पण शेवटच्या ६ बॉल मध्ये ४० रन्स हव्या आहेत..”होतील रे; धोनी यायचाय अजून” किंवा आपली १ ओवर असताना समोरच्या संघाचे ९ खेळाडू शिल्लक आहेत, ४ च रन हव्या आहेत “तरीही भारतच जिंकणार” असला कल्पनाविलास आम्ही तुझ्याशिवाय कसा काय करणार?

बाकी भारताचं विराट भवितव्य तुझ्या मार्गदर्शनाखाली दणदणीत कामगिरी करताना दिसतंय...एक कप्तान बदलून नवा येतोय .... संघ उत्तमच कामगिरी करतोय... दोन्ही कप्तान एकमेकांना आदर देत देशाच्या विजयाची ग्वाही देताहेत.....पुन्हा एकदा...असं भारताबाहेर कुठे असतं का!!! 

टिप्पण्या