(इनोव्हेशन) नाविन्य भाग ६

इनोव्हेशन... इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी)च्या दिशेने

विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या प्रगतीचा वेग आज इतका जास्त आहे की आपण कुठून कुठे पोहोचलोय याचा रस्ताच आपल्याला सापडायचा नाही. तंत्रज्ञान, संगणक, इलेक्ट्रोनिक्स हे सध्याचे परवलीचे शब्द. तंत्रज्ञानामुळे  इतक्या गोष्टी स्वयंचलित झाल्या आहेत की त्यावर आपला विश्वासही बसत नाही. इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT/ आय ओ टी) हा त्याचाच एक नवा प्रकार. ज्यामध्ये मशीनचा मशीनशी संवाद होतो आणि मानवाची कित्येक कामे सहजसोपी होतात. इंटरनेट चा वापर केवळ मोबाईल फोनद्वारे केला जातो असं नाही तर घरातील वस्तू, वाहने, इमारती आणि इतर अनेक वस्तूंसाठी केला जातो.
स्मार्ट फोन, स्मार्ट शहरे, वाहतुकीतील इंटेलिजन्स ही सगळी इंटरनेट ऑफ थिंग्सची उदाहरणे. स्मार्ट होमचं दार उघडून आत आलो की आपल्याला हवे असलेले दिवे, एसी, व्हॅक्युम क्लीनर यासारख्या गोष्टी चालू होतात. पाण्याने भरलेली चहाची किटली गरम केली लागते. ज्याच्या त्याच्या आवडीचं संगीत चालू केलं जातं. बाहेरून जेवण कुठून मागवायचं हे ठरलेलं असेल तर ठराविक हॉटेलमध्ये ठराविक ऑर्डर दिली जाते. गुगल या कंपनीचं ‘गुगल होम’ हे एक असंच मजेशीर प्रॉडक्ट आहे. ज्याला आपण तोंडी सूचना द्यायच्या; त्यानुसार ते सकाळचा गजर, भाजी शिजवण्याचा वेळ, ऑफिसला जायची आठवण, क्रिकेटच्या मॅचचा स्कोअर, आवडतं गाणं, बाजारातून आणण्याच्या वस्तूंची यादी हे सगळं करीत जातं. या सगळ्या गोष्टींमुळे जादुई जगताच्या जवळ जात आहोत की काय असं वाटलं तर अजिबात नवल नाही.
आपण जे बोलतोय ते सगळं अस्तित्वात येतंय तेही एका क्लिकने. संगणकाच्या सहाय्याने खेळ, अभ्यास, सिनेमे, गप्पागोष्टी, सामानाची खरेदी-विक्री अगदी काय वाट्टेल ते केलं जात आहे. अॅमेझॉन सारख्या कंपनीमार्फत आपण जिथे हवी तिथे एखादी वस्तू ज्या जागी असू तिथून ऑर्डर करू शकतो. अपेक्षित वेळेत ती आपल्याकडे हजर होते. त्यात दोष असेल तर परत घेतली जाते. अॅमेझॉन बटण ही सुद्धा अशीच एक विलक्षण सोय. हे बटण सातत्याने गरज पडते अशा गोष्टींसाठी उपलब्ध केले जाते जसे स्वच्छतेसाठी वापरले जाणारे साबण, फडकी, कागद, कपडे धुवायचा साबण किंवा नियमितपणे लागणारे दूध वा अन्य पदार्थ. ती वस्तू संपली की ते बटण दाबायचे ज्यावरून नवी ऑर्डर दिली जाते, वस्तूचे नाव, ग्राहकाच्या बँकचे तपशील या बटणशी जोडलेले असतात.  जेव्हा ती वस्तू वापरायची असते तेव्हा ती तुमच्याकडे डीलीव्हर झालेली असते. आयत्या वेळी आवश्यक ती वस्तू नसल्यामुळे जो वेळ आणि शक्ती खर्च होऊ शकते ती यामुळे वाचलेली असते. आपण चुकून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर नाही तर मशीन सोबत राहत असल्याची जाणीव झाली तर अशक्य नाही परंतू जे सोपं होत चाललंय ते मोकळ्या मनानी स्वागत करायचं आणि प्रगतीच्या वेगात सहभागी व्हायचं हे आताच्या पिढीचं खरं आव्हान.

अवधानानं -अनवधानानं सगळेच नुसते स्मार्ट-फोन बरोबर बाळगत नाहीयेत तर त्याचा स्मार्ट उपयोग करताहेत. इलेक्ट्रॉनिक पेमेंट, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे शब्द ज्यांना माहितही नव्हते ते सगळे आज सर्रास कॉम्प्युटर उघडून या गोष्टी स्वतः करीत आहेत. काही दिवसांपूर्वी नोटा बदलल्या गेल्या, आपल्या सगळ्यांनाच एक धक्का बसला, थोडे गडबडलो, गोंधळलो, बँकेच्या ओळीत उभे राहून वैतागलोही. पण जेव्हा एखाद्या  लहानश्या दुकानदाराने पेटीएम वापरण्यास किंवा घरी काम करणाऱ्या काकूंनी चेक घेण्यास सुरुवात केली, तेव्हा अचानक आपण सगळेचजण नकळत दोन पावलं प्रगत झालो असं वाटून गेलं. नाटकाचे तिकीट ऑनलाईन काढता येऊ लागली. दुधवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत सगळे चेक स्वीकारू लागले. असे बदल घडायला प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वेळी योग्य उपयोग हा जसा महत्त्वाचा तसाच मानसिकतेमधील बदलही महत्त्वाचा हा धडा आपण सगळेच शिकलो.


शिक्षणविवेक मे २०१७

टिप्पण्या