कॅलिफोर्निया ...१

Shoreline park, California
कॅलिफोर्नीया मध्ये गेलं वर्षभर राहिले. त्या निमित्ताने आई बाबांना तिकडे बोलवून घेता आलं. यावेळी आई बाबांना आम्ही फिरवणार होतो. इतक्या वर्षात सर्वात प्रथम त्यांना मी त्यांना काहीतरी दाखवणार होते, या इथे ना ते हे आहे, तिथून तिकडे गेलं कि ते स्टोअर मग ही बाग, ती कंपनी, तो मॉल. खरं तर त्यात कित्येकदा बघण्यासारखं असं काही नसतंही. पण आपण आई बाबांना आपल्याला कुठलीही छान वाटलेली गोष्ट सांगत असतो आणि ते ही ती छोट्या मुलांच्या इतकच आनंदाने ते ते पाहात असतात. ते मलाही अनुभवायला मिळालं. 


आमची सुरुवातच झाली ती थेट पेट्रोल स्वत:च स्वत: कसं भरायचं हे दाखवण्यापासून. मग हळूहळू आजूबाजूची फुलं, स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण जागा असं करत करत आम्ही पर्यटकांसाठी प्रसिद्ध जागांपर्यंत पोहोचलो. छान उन पडलेलं बघितल्यावर शोअरलाईन पार्क, माउंटन व्हू ला निघालो. गेल्या गेल्या समोर दिसणारं नितळ स्वच्छ पाणी आणि त्यावर विहार करत असलेले कितीक पक्षी. जाता जाता नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून मुद्दाम वेळ काढून व्यायाम करणारे कितीक जण. कोणी सायकल फिरवत कोणी चालत , पळत त्या पायवाटांवरून निघालेले दिसत होते. 
शांत रस्ता, त्यावरून जाणारी वाट यावरून चालत फक्त आम्हीच त्या पाण्याकडे बघत होतो असं नाही, तर ही बदकांची जोडीही होती अशीच. याचं नावं आहे 'कॅनडा गीझ', उंच काळ्या रंगाची मान आणि डोकं आणि अंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेली करडी पाठ असे हे पक्षी इथे हमखास बघायला मिळतात. त्याचं सहजपणे पाण्यातून पोहत, मध्येच उडणं, एखाद्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघताना वाटतं तितकं ते सहज सुंदर वाटतं. पक्ष्याकडून विमानापर्यंत पोहोचलेले आपण क्षणात निसर्गासमोर हतबल होतो. 
बगळ्यांची माळ फुले पासून ते मम्मा डक सेड क्वाक क्वाक क्वाक पर्यंत गाण्यांची उजळणी करीत होतो. आधी कल्पना की आधी वास्तव हा प्रश्न कायम पडतो. हा असा निसर्ग असेल तर नक्की वास्तव आधी असणार मग कल्पना, चित्र, कविता असं वाटून जातं.   
निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा बघत सुन्न होत जाणं आणि त्या आठवणीत कित्येक वर्षे रममाण होणं ही एक गंमत असते. त्यात मानवाच्या बुद्धीची जोड मिळाली की या पार्क मध्ये कयाक, सेल बोट यासारख्या सोई सुविधा जुळून येतात. त्या पाण्यातून सहजगत्या रपेट मारता येते. कुठेतरी आणखी किती आकंठ आस्वाद घेणार हे समजत असतं पण तरीही आपण त्या सेलबोटीतून एखादी सैर करून येतो. डोळे आणि मन तुडूंब भरून पुन्हा व्यस्त होण्यासाठी निघून जातो. 

टिप्पण्या