मला भेटणारा रविवार......


संदीप खरे यांच्या एका कवितेमध्ये बदल करत .....

मला भेटणारा रविवार......


आता इतका सहज सरळ उगवत नाही रविवार
सकाळ होताच म्हणतो, आज आठवडी बाजार !
कर्तव्यागत उठतो आम्ही, नेमे शिजते भाजी
कर्तव्यागत डोक्यावरती, भरून घेतो ओझी!

पोहे-पॅटीस जातात दूर कुठल्या कुठल्या गावा
शहाण्यासारखा पडून असतो रोजचा पेपर नवा!
रविवारचं कौतुक नाही, हवी फक्त सुट्टी
याच दिवसात व्हायला हवी, पंचवीस कामं मोठ्ठी!

असं का, हे माझं आणि रविवारचं व्हावं?
कोडी, नाही, पुस्तक नाही, टीव्हीवर बरं महाभारतही नसावं!
मला वेगळं हवं काही, त्याला वेगळं हवं
मला हवं थांबलेलं सारं, अन् त्याला उरकायची कामं!

उद्या-बिदया करू म्हणत तो फोडत नाही फाटे
जन्मापासून लाभलेत त्याला घड्याळाचे काटे!
वेळच नाही तिथे कुठली शांततेची सय?
लगबग, दगदग, करत तो फारशी बिघडवत नाही लय!

वीकेंड वीकेंड म्हणत म्हणत बघतो भ्रम सगळा
आधी असतो नुसता दिवस, नंतर होतो सोहोळा!
आठवड्यामध्ये अडकवून मला, घेईल काढता पाय
तंगड्या पसरताच टाकेल प्रश्न, नक्की चाललंय काय?

सातला तो उठ म्हणेल आणि दहालाच तू नीज
रोजच्या सारखी जगलीस म्हणून काही कोसळणार नाही वीज!
माझे घेणे आळसाशी, त्याचे आळसापार
इतका सहज सरळ नाही हा आठवड्याचा वार!

टिप्पण्या