पुलंनी त्यांच्या
लेखनातून आनंद दिला आणि आपण रसिकांनी तो पुरेपूर लुटला. ‘विनोद’ हा पुलंच्या लेखनाचा
मूलाधार होता पण त्यांना हशा मिळविण्यासाठी कधी विनोद करावा लागला नाही. खरं तर
सुमार आणि सपक विनोद हे विनोदाचे शत्रू पुलंच्या विनोदात कधी दिसलेच नाहीत. असामी
असामी मधला बेमट्या उर्फ धोंडो भिकाजी जोशी चे डी बी अंकल हा प्रवास अनुभवताना आपण
त्यांच्याबरोबर एका कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाचा प्रवास अनुभवला. सर्वसामान्य माणसाच्या
आशा, अपेक्षा, आवडी असणारा तो, त्याच्या त्या केविलवाण्या आयुष्याला हसत असताना
आपण त्याचे कधी होऊन गेलो ते कळलंच नाही; ते वाचताना वा ऐकताना आपण स्वत:लाच हसत
होतो याचंही भान आपल्याला उरलं नाही. उलट चार्ली चाप्लीनला पुलं ‘तू माझा सांगाती’
असं का बरं म्हणत असतील हे आपल्याला मनोमन पटलं.
पुलंनी जसा हा माणूस
उभा केला तशीच बटाट्याच्या चाळीचीही निर्मिती केली. तिच्यातून नुसती चाळच नाही तर
मुंबईसुद्धा भेटली. अगदी तिचा कधीही अनुभव न घेतलेल्यालाही ती जवळची वाटली.
त्यांनी या चाळीला एक स्वतंत्र, संवेदनक्षम आणि बोलकं व्यक्तिमत्त्व दिलं. त्या
चाळीबरोबरच सुतकी आवाजात ‘पंत, तुम्ही उपास सुरु केलाय?’ असं म्हणणारे कुशाभाऊ,
‘तू काय धंदा करतो रे बोर्वे?’ हे विचारणारा फर्ताडो, पट्टीच्या न सापडणाऱ्या सुरात
गाणाऱ्या वरदाबाई, ‘कुठल्याशा किल्ल्याला चिखल किती लागला ते पन्हाळगडच्या
पावनखिंडीची लांबी रुंदी काय होती’ असली कागदोपत्री प्रवासाची इत्थंभूत माहिती
असणारे बाबुकाका खरे ही सगळी मंडळीही आपल्याला तिथेच भेटली किंबहुना ती रूपं बदलून
आजन्म भेटत राहतील. पुलंचं लेखन नुसतंच व्यंग किंवा विसंगती दाखवणारं नव्हतं तर त्यावर
ते एक मार्मिक भाष्य करीत, कधी त्यात खोचक चिमटेही घेत असत पण त्या विनोदाचा दर्जा
कायमच निखळ अन् निकोप असे.
पुलंचं लेखन खरंतर
आपण वाचत नाहीच ते ऐकत असतो. बहुतेक त्यांना लिहिण्यापेक्षा बोलायला अधिक आवडत
असणार म्हणून असेल. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘गोळाबेरीज’ आणि ‘मैत्र’ यासारख्या
पुस्तकातून त्यांने लिहिलेल्या व्यक्ती आपल्याला खरोखर भेटतात. ‘सर, हे पेढे.’
म्हणत सुरातील अजिजी दाखवणारा सखाराम गटणे, ‘इथे सगळेच पंचेवाले, अन
त्याच्यापेक्षा उघडे.’ असं बिनधास्तपणे सांगणारा अंतू बर्वा, ‘आम्ही पाहतोय,
महाराज पाहताहेत..’ म्हणत शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं करणारे हरितात्या,
सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी, ‘हं, ‘नाना फडणवीस’ अशी सही केली’ म्हणणारे
बघुनाना, ते ‘आयुष्यात व्रत एकच केलं, पोरगं सापडलं तावडीत की त्यास घासून पुसून
लख्खं करून जगात पाठवून देणे!’ असं म्हणणारे चितळे मास्तर अशी जर या वल्लींची यादी
करावयास सुरुवात केली तर ती संपणारच नाही. पुलंच्या समृद्ध भाषेमुळे, संवेदनशीलतेमुळे,
लोकसंग्रहामुळे, आणि अनुभवसंपन्नतेमुळे त्यांचे विनोद केवळ हासण्यापुरते मर्यादित न
राहता त्या मागची कारुण्याची लकेरही आपल्या नजरेस येते.
बरं, पुलंच्या
लेखनाच्या वैविध्याबरोबर विषयांचंही वैविध्य होतं; त्यांना कुठल्याही विषयाचंही
वावडं नव्हतं. प्रत्येक विषयावर त्याचं प्रभुत्व, त्याचा अभ्यास त्यांनी
वापरलेल्या परिभाषेतून दिसून येई. त्यांची प्रवासवर्णनंही अशीच वैशिष्ट्यपूर्ण मग
ते ‘जावे त्याचा देशा’ असो किंवा ‘अपूर्वाई’. त्यांची आठवणी लिहिण्याची हातोटी
विलक्षण होती. अपूर्वाई तील एक आठवण, प्रवासात हॉटेलमधल्या फ्रेंच वेटरशी संवाद
करण्याचा प्रसंग गुदरला, तेव्हा पु.लं म्हणतात, ’दूध हवं, हे सांगण्यासाठी कागदावर
एक गाय काढली - काढली कसली, गोहत्याच ती!’ आता यापुढे आपण पामराने त्यांच्या
विनोदबुद्धीवर काय बोलावं? आपल्याला मराठी कळतं त्यामुळे आपण हे वाचून आनंद घेऊ
शकतो, अनुवाद वगैरे ऐकण्या-वाचण्याची वेळ आपल्यावर येत नाही याबद्दल कृतज्ञ राहावं
इतकंच.
असं असलं तरीही,
पुलं विरोधी गटही काही कमी नाही, नुसतेच विनोदी, उथळ, वरवरचे, फक्त जे लोकांना
ऐकायला आणि वाचायलाच आवडेल असे लिहिले असे आरोपही होत या लेखनावर आले. पण त्यांनी त्यांच्या
लेखनातून विषमता, अन्याय, दंभ, मत्सर ही समाजाची कुरूपता मुद्दाम कधी दाखवली नाहीत.
स्वत:च्या दु:खाचे मनोरे रचून आपल्याला रडवले नाही; उलट रडू येईपर्यंत हसवले. आणि
विरोधकांना त्यांच्या विरुद्ध मतासह आपले मानले. आताचा काळ तर असा आहे की, पुलंचे
कित्येक विनोद, किस्से, कोट्या या स्वत:च्या नावाने दडपून लोक ते व्हॉटस् अॅपताना,
फेसबुकताना किंवा त्याची पुणेरी पाटी बनतानाही दिसून येते. कदाचित हेच त्या
लेखकाचं यश असेल, की त्याचा विनोद हा सर्व सामान्य माणसाला इतका जवळचा वाटतो.
पुलंचं लेखन आपण जितके वेळा वाचतो तितके वेळा ते आनंदच देतं, त्याचं कंटाळा येत
नाही. आता उदाहरणच द्यायचं तर, पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि
पौर्वात्य संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती, ‘संगीत संशयकल्लोळ’ मधील संगीत नसते,
तर बरे झाले असते, असे म्हणण्याइतके मधुर आहे, किंवा एकदा मर्ढेकरांच्या कविता
सादर करायला जाण्यापूर्वी भरपेट जेवण झाल्यावर ‘इतके जेवण झाल्यावर मर्ढेकर कुठला?
नुसता ढेकर.’ हे आणि असं खुमासदार लेखन न आवडेल तरच आश्चर्य. त्यातून पुलंनी
त्यांच्या खास गोष्टीवेल्हाळ शैलीत ते ऐकवलं तर आणखी लज्जतदार. अक्षरांशी थोडाफार
संबंध आलेला असा एकही माणूस नसेल ज्याने पुलंचं नाव ऐकताच त्याच्या मनाच्या हळव्या
कोपऱ्याला हात घातला जाणार नाही वा उत्साहाची लहर उठणार नाही.
त्यांच्यातला लेखक
एक उत्तम अभिनेता म्हणून भेटतो तो ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री प्रयोगात आणि तितकाच
परिणामकारक दिग्दर्शक भेटतो ‘वाऱ्यावरची वरात’ किंवा ‘वटवट’ सारख्या सामुहिक
नाट्यप्रयोगांचे मोट वळताना. त्यांना एक कसबी लेखक, गायक, वादक, अभिनेता म्हणून ओळखू लागतो तोवर ‘शिकवीन चांगलाच धडा’ म्हणत ‘ती फुलराणी’
समोर उभी राहते, त्यांच्या भाषा आणि बोलींच्या अभ्यासाची
आपल्यावर मोहिनी घातली जाते, आणि त्यांच्यातला नाटककार
खुणावून जातो. ‘सुंदर मी होणार’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ सारखी नाटकं, रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण नाटकं म्हणून आजही आठवली जातात.
पुलंच्या लेखनातून
जसे ते अगदी मनापासून भिडतात तसेच ते त्यांच्या अभिनयातून आणि अभिवाचनातून आपल्याला
मनोमन भावतात. गुळाचा गणपती, किंवा बटाट्याची चाळ मधील त्यांच्या लयबद्ध हालचाली
असोत किंवा म्हैस मधील कित्येक आवाजांचे प्रकार असोत, हा सगळा खटाटोप ते लीलया
साधून जातात. म्हणूनच की काय, आपण त्यांनी संगीत दिलेली ‘नाच रे मोरा’, ‘कौसल्येचा
राम’, ‘माझे जीवनगाणे’, ‘शब्दावाचून कळले सारे’, किंवा ‘हसले मनी चांदणे’ यासारखी गोड
गाणी कधी विसरूच शकणार नाही. एरवी मिश्कील असणारे पु.लं इतर कवींच्या कविता मात्र अतिशय
गांभीर्याने ऐकवत असत. ‘आनंदयात्रा कवितेची’ हा बा. भ. बोरकरांच्या कवितांचा
कार्यक्रम सादर करताना उत्तम आस्वादक असलेल्या पुलंकडून त्याचं कवितांवर असलेलं
प्रेम वाक्यावाक्यातून जाणवत राहतं. सरीवर सरी आल्या गं, किंवा समुद्रबिलोरी ऐना
यासारख्या कविता म्हणतानाचा त्यांचा सुरेल आवाज ऐकत रहावासा वाटतो. या बहुरूपी
अवलियाचं रुपडं आपण जितकं म्हणून शोधू, पाहू तितकं रंगीबेरंगी दिसू लागतं.
या बहुआयामी
व्यक्तिमत्वाचे पैलू तरी किती असावेत, एकाविषयी आश्चर्य, कौतुक वाटावं तोवर दुसरा
समोर यावा. त्यांची अशीच एक विलक्षण गोष्ट वाटली ती म्हणजे ते वयाची पन्नाशी उलटून
गेल्यावर मुद्दाम शांतीनिकेतन मध्ये जाऊन बंगाली भाषा शिकले, त्या भाषेचा, परिसराचा अभ्यासही केला. जर कुठलीही भाषा
शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटते तिथे जाऊन, तिची नाना स्वरूपे अनुभवून व
भोगून शिकायची ही त्यांची धारणा. हे त्याचे केवळ तत्व म्हणून मानले नाही तर
त्यांनी तसे अनुभव घेऊन ते ‘वंगचित्रे’ मधून त्यांच्या शब्दातही मांडलेदेखील.
पुलंच्या ठायी हे
सारे गुण तर होतेच होते पण त्याहीपेक्षा अफाट माया आणि प्रेम होते ते ‘माणूस’ या
गोष्टीविषयी. त्यामुळे त्यांनी असंख्य माणसांना आपलेसे करून घेतले आणि सत्पात्री
दानही केले. या त्यांच्या सव्यापसव्याचे शिस्तबद्ध दिग्दर्शन केले ते त्यांच्या
पत्नीने ‘सुनीताबाई’ यांनी. रसिकांनी जसे त्यांच्यावर प्रेम केले तितकेच प्रेम
पुलंनी समाजावर, मुक्तहस्ताने आणि आजन्म केले. त्यांच्यासाठी बोरकरांनी लिहिलेल्या
या कवितेच्या ओळी खरंच किती समर्पक आहेत बघा,..
जराशप्त या येथल्या
जीवनाला | कलायौवने तूच उ:शापिले |
व्यथातप्त जीवी
स्मिते पेरुनी तू | निराशेत आशेस शृंगारिले |
मिलाफुन
कल्याणकारुण्य हास्यी | तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली |
तुझ्यासारखा तूच
आनंदयात्री | तुवां फेडिली गाठ प्राणातली |
- युवोन्मेष दिवाळी अंक २०१८
पुलंच्या लेखन कारकिर्दीवर लिहिलेला आपला छोटेखानी लेख आवडला. आपली लेखन शैली सहज सुंदर आहे. नंदकिशोर लेले मधुकोशवासी
उत्तर द्याहटवाDhanyawad kaka!!
हटवाब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा