ही आवडते मज मनापासुनी शाळा ....

       “ही आवडते मज मनापासुनी शाळा” असं म्हणावंसं वाटायचं, तेही मनापासून. शाळेत काय काय शिकलो यापेक्षाही शाळेनं मला काय काय दिलं असं मी म्हणू शकेन. शाळेची इमारत, क्रीडांगण, प्रयोगशाळा हे तर अजूनही आठवतच पण तितकेच काही शिक्षकही आवर्जून आठवतात. ज्यांनी प्रेमाने पाठीवरून हात फिरवला तेही आणि ज्यांनी पूर्ण वर्गासमोर अपमान करून त्यावेळी शहाणपणाचे धडे दिले तेही. या सगळ्या आठवणी माझ्या मी गोळा केल्या. माझ्या आईने शाळेत अॅडमिशन दिली मला, पण आता तिथे जाऊन काय आणि कसं शिक ते कधी सांगितलं नाही. पालकसभा सोडून एरवी ती कधी शाळेत फिरकली नाही, आणि सुदैवाने शिक्षा म्हणून तिची चिठ्ठी किंवा तिला कधी माझ्यासाठी कुणा शिक्षकाला भेटायला यावं लागलं नाही. तेव्हा किती मोकळीक होती मला, हे आज जाणवतंय.
आज पालक म्हणून मी जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेविषयी विचार करायला सुरुवात केली, बापरे! नुसता विचार करून मुलगा नक्की शिशूशाळेत जाणार की ही पोस्ट ग्रॅज्युएशनची तयारी आहे असं वाटायला लागलं. माझ्या पिल्लाचं वय किती होतं? जेमतेम दोन वर्ष आणि आता आम्ही शाळेचा फॉर्म घ्यायला ओळीत उभे होतो. ज्यानं आता शाळा नावाच्या त्या यंत्रात प्रवेश करायचाय त्याला याची जाणीवच नाहीये आणि मी त्याची आई, त्याच्यापेक्षा खूप जास्त काळजीत, उत्साहात आणि संकटात आहे. असं वाटलं तेव्हा म्हटलं अरे! आपण इतके का काळजी करतोय?
पूर्वीच्या काळापासून आपण बघत आलोय, अगदी रामायणात सुद्धा रामाला गुरूगृही पाठवताना कौसल्येने अश्रू ढाळले आहेत, तिथे आपली काय गत? पूर्वीच्या काळी तर मुले विद्यार्जनासाठी गुरूगृही राहायला जात व तेथून संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी परतत असत. महाभारताच्या काळात तर राजपुत्रांच्या शिक्षणासाठी चांगल्यात चांगल्या गुरूला पाचारण करण्यात आलं. यावरून असं दिसतं की त्या काळातही आईवडील आपल्या मुलाला सगळ्यात उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी त्यासाठी प्रयत्न करत असत. आपला भारताचा इतिहास, त्यात सर्वांना शिक्षणाचा समान हक्क, महिलांना शिक्षण यासाठी भारताने किती खस्ता खाल्ल्या हे सारं आठवलं. पण शिक्षण हा व्यवसाय आणि त्यात स्पर्धा कधीपासून सुरु झाली? आताच्या काळात शिक्षण देणे हा एक उद्योग होऊन बसलाय आणि शिक्षण घेणे ही जन्माची भरपाई झालेली आहे. प्रत्येकालाच या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग व्हायचं आहे अथवा व्हावं लाहणार आहे, आणि त्यासाठी प्रत्येकजण या शाळा नावाच्या गोष्टीच्या शोधात जीव मुठीत धरून पळतोय. मी पण माझ्या मुलाच्या शाळेच्या अॅडमिशनसाठी असाच काहीसा अंदाज घेत होते, मी पुण्यात विद्येच्या माहेरघरात नांदत असल्याने निर्णय सोप्पा असेल असं वाटेल पण तसं नाही. शिक्षण कशा पद्धतीने घ्यायचं आहे यासाठीही प्रचंड पर्याय इथे उपलब्ध आहेत.
कशी निवडायची शाळा? शाळांचे वेगवेगळे प्रकार, त्यांची वेगवेगळी भाषेची माध्यमं, त्यांची शिक्षण देण्याची वेगवेगळी पद्धत, त्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे वर्गीकरण अशाप्रकारे या शाळांची वर्गवारी करता येऊ शकेल का?
१. अशा शाळा ज्यांना खेळावर भर द्यायचा आहे.
२.अशा शाळा ज्यांना आपल्या समाजाचा आपण एक भाग आहोत याची जाणीव मनात जागी ठेवत शिक्षण द्यायचं आहे.
३.अशा शाळा ज्यांचा परीक्षापद्धतीवर विश्वास नाही तर व्यक्तीमध्ये असणारे गुण महत्त्वाचे वाटतात.
४.  अशा शाळा ज्यांना परीक्षेत अव्वल यश देणारे स्पर्धक तयार करायचे आहेत.
५. अशा शाळा ज्या इंटरनॅशनल स्कूल आहेत किंवा त्या तत्वावर आधारीत आहेत, जिथे असं वातावरण आणि अशा सोईसुविधा असतील ज्यामुळे विद्यार्थी कोणत्याही देशात गेला तरी त्याला सहजगत्या सामावता येईल.
६. काही अशा शाळा आहेत ज्यांना अजूनही गुरुकुलाची गंमत विद्यार्थ्यांना घेता यावी याची गरज वाटते.
हे सगळंच खरं तर खूप उत्तम आहे. पण पूर्वी किती सहज होत्या ना काही गोष्टी? शाळा जवळ आहे म्हणून प्रवेश घेतला. झाला निर्णय. पण ह्या सगळ्या पर्यायातून कशावर फुल्या मारायच्या आणि काय पत्करायचं हे कोण ठरवणार? आपण ..आईबाबा? आणि मुलाला वेगळच काही आवडत असेल तर?
‘तारे जमीन पर’ सारखे सिनेमे येणार आणि कित्येक ‘ईशान’ तयार करण्याचा आईवडिल प्रयत्न सुद्धा करणार, पण केव्हा, जर एखादी समान पद्धत मिळाली तर. नाहीतर आईवडिल त्यांना हवे त्या शाळेत, हव्या त्या गुरूकडे मुले जातील आणि आईवडिलांना हवे ते किंवा त्यांना जे जमले नाही ते शिकतील. मुलाला स्वतःला काय शिकायचे ते दूरच राहील. ही शालारुपी यंत्र त्यांच्या त्यांच्या उद्दिष्टात सफल निश्चितच होतील आणि त्यांचे विद्यार्थी त्या त्या प्रकारचे तत्व अंगी बाणवून तयारही होतील. पण मग या मुलांना “ही आवडते मज....” असं म्हणावंसं वाटेल का? 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा