
'स्थळ : उद्यान' हा
एक भन्नाट लेख, यात काय आहे तर एका उद्यानाचं साद्यंत वर्णन, तिथला
परिसर, माणसं, त्यांच्या हालचाली हे सगळे जसे घडते तसे
टिपलेले उद्यान नाट्य, एखाद्याला प्रसंग नाट्यासाठी बाग हा विषय यावा आणि त्याने
त्यावर एक दहा मिनिटाचं सादरीकरण करावं तर ते कसं असावं यासाठी निरीक्षणशक्तीचा
वापर केलेला उत्कृष्ट नमुना. एका सत्य घटनेच्या संदर्भातील बूनमी च्युबांग या
व्यक्तीच्या संदर्भातील त्याची अखेरची इच्छा हा लेख खूप वेगळ्या धाटणीचा आणि आर्वजून वाचावा असा. 'थोडी मुंबई -प्रशस्ती', नावावरून जावं तर थेट उलट
संदर्भ दाखवून वास्तवाची चपराक मारणारा लेख, खरं तर असे
प्रत्येकच लेखाविषयी काही ना काही लिहिता येणार नाही, पण 'मोटार
मास्तर', 'या यंत्रांचा धिक्कार', 'मैना खेर', 'गांधी जयंतीची गोष्ट', 'हा हंट हंट' हे पुन्हा एकदा नक्की वाचावे असे लेख,
हलके फुलके पण विचारगर्भी. ‘अहम्’ हा इतका भारी आणि खरा लेख आहे की तो प्रत्येकाला
आपलासा वाटेल. ‘खेळणी’ हा हि असंच एक गोड आणि खराखुरा लेख, ‘चलो दवाखाना’ मधलं
वर्णन रुग्णाचं वर्णन वाचून क्षणभर आपण आपल्याला न भेटलो तर नवल.
‘रातराणी’ पेक्षा
अनुभवाने मोठा झालेला लेखक ‘कोवळी उन्हे’ मध्ये आपल्याला भेटतो. नाटकातून
वास्तवाच्या निखाऱ्याचं दर्शन घडवून खरं तर आदर आणि भीती अशी संमिश्र भावना मनात
असताना तेंडुुलकरांचे हे ललित लेखन वाचले की त्यांच्यातल्या हरहुन्नरी लेखकाची ओळख
तर होतेच पण आपण त्यांना एखाद्या लेबलने ओळखत होतो याबद्दल खंतहि वाटते, त्यांच्या
ललित लेखनाचे संग्रह वाचनात आल्यामुळे त्यांच्या अनुभवांचा, विचाराचा, विवेकाचा, शाब्दिक पसारा आपल्यासमोर हळूहळू उलगडला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा