यंदाचं हे गोविंद विनायक
उर्फ विंदा करंदीकर यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र या
तत्व चिंतकाच्या साहित्याचं स्मरण, अभ्यास आणि आनंद घेऊ बघतोय. एखाद्याच्या
साहित्यात विविधता असावी ती किती सर्वव्यापी, सर्वस्पर्शी... याचं विंदा हे एक समर्पक
उदाहरण. ते पिशीमावशी आणि तिची भुतावळ या त्यांच्या बालकवितेतून, कुठेतरी आहे-नाही
च्या बेचकीत सापडलेल्या आपल्याला भूत नावाच्या काल्पनिक सत्याला भेटवून आणतात तर
कुठल्याशा ‘ती जनता अमर आहे!’ सारख्या कवितेतून शोषितांच्या, श्रमिकांच्या, पीडितांच्या जीवनाचं
प्रतिबिंब दाखवून जातात. प्रेमकविता तर ते लिहितातच पण त्याही निर्भीडपणे.
कुठल्याही पापाचा स्पर्श त्या शब्दात जाणवत नाही. तर्काच्या साहाय्याने जीवनाकडे
बघणारे ते ‘निळा पक्षी’ सारखी प्रतीकात्मक कविताही करतात आणि ‘धोंड्या न्हावी’
सारखं व्यक्तीचित्रसुद्धा कवितेतून उभं करतात. जीवनाचं गोजिरवाणं रूप तर शब्दातून
व्यक्त झालेलं आपण कितीकदा वाचतो, पण विंदा त्यातलं वास्तव प्रसंगी प्रखर बंडखोरी दाखवत,
कधी उपहासाने कोपरखळी घेत तर कधी शास्त्रशुद्ध पद्धतीने सूत्रात बांधतात. या
त्यांच्या साहित्यासाठी देशाच्या साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ
पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. विंदांच्या या बहुआयामी साहित्यातील नक्की
वाचावे, ऐकावे, आणि सातत्याने आठवणीत ठेवावे असे काही... ‘मला भावलेले विंदा’ या
लेखातून सादर करते
2006 मध्ये मराठीतील ख्यातनाम कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. मराठी वर्तमानपत्र, टी व्ही सगळीकडे विंदांच्या नावाचा जयघोष चालू होता. विंदा म्हटल्यावर साहजिकच शाळेत असताना विंदांचा परिचय ज्या ओळींनी झाला त्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या,
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे |
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ||
सर्वप्रथम टी व्ही वरील एका कार्यक्रमात त्यांनी
सादर केलेली ‘घेता’ ही कविता ऐकली, त्यांच्या वाचनातून त्यांनी ती कविता समोर उभी
केली आणि विंदांचा खरा परिचय झाला. हिरव्या पिवळ्या माळावरून, हिरवी पिवळी शाल
घ्यावी म्हणतानाचा त्यांचा हळूवार असा निरागस स्वर जाणवला तर वेड्या पिश्या
ढगाकडून, वेडेपिसे आकार घ्यावे म्हणत असताना त्यांना दिसलेला तो वेडसर ढग डोळ्यासमोर
चमकून गेला. विंदा त्यांच्या कविता वाचत होते, पुढची कविता वाचू लागले, माझ्या मना
बन दगड,
हा रस्ता अटळ आहे |
येथेच असतात निशाचर,
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात,
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, “कर हिंमत,
आत्मा विक, उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला, स्मरा नित्य”
काय कळत होतं यातलं? कुणास ठाऊक, पण या शब्दात
ताकद आहे काहीतरी, जी आपल्याला त्या शब्दांकडे ओढून घेतेय, लक्ष द्यायला विचार
करायला भाग पाडतेय एवढंच जाणवत होतं. विंदा वाचायचे ठरवले खरे पण सुरुवात कुठून
करायची? विंदांची बालकविता हातात घेतली, बालकविता छान छान गोड गोड च असणार पण तशी नव्हतीच
ती, वेगळीच होती, खरी खरी, भेटणारी, दिसणारी होती, कधीतरी तरी मौजेची तर कधी विक्षिप्तपणे
सत्यात आणून आदळून टाकणारी होती.
आता हीच कविता पाहा, फूलवेडी
एक परी
एक परी
फूलवेडी
फुलासारखी
नेसते साडी.
फुलामधून
येते जाते;
फुलासारखीच
छत्री घेते.
येते जाते;
फुलासारखीच
छत्री घेते.
बिचारीला
नाही मूल;
पाळण्यामध्ये
ठेवते फूल.
नाही मूल;
पाळण्यामध्ये
ठेवते फूल.
यामुळे विंदांची
बालकविता लहानग्यांपर्यंत मर्यादित राहतच नाही ती तर मोठ्यांचीही असते. कारण विंदा
कल्पनेत आणि वास्तवात दोन्हीत अगदी सहजी विहार करतात. त्यांच्या ‘स्वेदगंगा,
मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका आणि अष्टदर्शने’
या कवितासंग्रहातून आपल्याला सामाजिक-राजकीय संदर्भ असणाऱ्या कविता, प्रेमकविता,
प्रतीकात्मक कविता, अभंग, सूक्ते, मुक्त सुनीते, तालचित्रे, गझल आणि विरूपिका अशा
वेगवेगळ्या रचना वाचायला मिळतात.
सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा
एकसुरीपणा सांगताना ते म्हणतात,
सकाळपासून रात्रीपर्यंत
तेच ते! तेच ते!
माकडछाप दंतमंजन;
तोच चहा, तेच रंजन;
तीच गाणी, तेच तराणे;
तेच मूर्ख, तेच शहाणे....इथेच
ते थांबत नाहीत तर हा तोचतोचपणा पराकोटीला नेत म्हणतात,
आत्महत्या ही तीच ती
आत्मा ही तोच तो;
हत्याही तीच ती;
कारण जीवनही तेच ते !
आणि मरणही तेच ते !
अशीच एक कविता, संयुक्त
महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईत जो गोळीबार झाला तेथे मृत्युमुखी पडलेल्या एका
सामान्य माणसाविषयी लिहिलेली,
अंधाराच्या मस्तीवरती
रक्ताची गुळणी थुंकून
तू मातीच्या कुशीत शिरलास;
ती माती तुला कधीही विसरणार
नाही, अन्यायाची निदान अज्ञानाला चीड आहे....
अंधार आणि अधिक अंधार
यांच्यामधील रित्या रेताडात डावा पाय रोवून
मी अजून उभा आहे.. पण हे
श्रेय तुझेच आहे.
समाजातील दडपशाही, भष्टाचार
यांच्या विरुद्ध त्यांचा उपहास उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना म्हणतात,
गोड गोड नव्या थापा;
जुन्या आशा, नवा चंग;
जुनी स्वप्ने, नवा भंग;...
जुना माल, नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!
खडबडीत आणि रोकठोक वाटणारे हे विंदांचे शब्द ‘झपताल’
या तालचित्रात मात्र भावनिक आणि अलवार होऊन जातात;
ओचे बांधून पहाट उठते.. तेव्हापासून झपाझपा
वावरत असतेस
अधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने
मांजरीसारखी लुडबुडत असतात,
त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला
करतेस...
संसाराच्या दहाफुटी खोलीत दिवसाच्या चोवीस
मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली
नाही.
विंदांची गझल ही अशीच सर्वगुणसंपन्न, कधी प्रेम,
कधी त्रागा, कधी सत्य कधी जीवनाचा साक्षात्कार घेऊन येणारी;
माझी न घाई काहीही, जाणून आहे अंतरी
लागेल जन्मावे पुन्हा, नेण्या तुला माझ्या घरी
||
असं प्रेम करतेच पण समजुतीच्या चार गोष्टी
सांगताना म्हणते,
प्रेमाप्रमाणे रागसुद्धा माणसांना जोडतो,
मानवातील गूढ नाते, ते जरा समजून घे असंही
सांगते.
विंदांची कविता कधी नुसती कविता असत नाही, तर
त्यात आततायी अभंग असतो, धेडगुजरी विरूपिका असते. त्याचा विषयही अर्थातच
विचारांच्या पल्याडचा पण नक्कीच विचार करण्यासारखा असतो. त्यांचा असंच एक विलक्षण
अभंग, तुकाराम आणि शेक्सपिअर चा,...
तुकोबाच्या भेटी| शेक्सपिअर आला|
तो जाहला सोहळा| दुकानात|
तुका म्हणे विल्या,| तुझे कर्म थोर|
अवघाची संसार| उभा केला|
शेक्सपिअर म्हणे | एक ते राहिले |
तुवां जे पहिले | विटेवरी |
हे असे शब्द वाचून तुकोबा आणि शेक्सपिअरच नाही
तर विंदांपुढेही नतमस्तक व्हावं असं वाटतं.
त्यांची अशीच आणखी एक कविता, कसा मी कळेना
कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची,
कधी वाढता वाढता व्योम व्यापी.
कधी धावतो विश्व चुंबावयाला,
कधी आपणाला स्वहस्तेच शापी.
टळेना अहंकार साध्या कृतीचा,
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे.
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे,
कधी सत्य ते वाटते सोंग साचे.
प्रत्येकाच्या मनातला द्वंद्व ते समोर उभा करून
अंतर्मुख होण्यास भाग पाडतात. अशी ही मुक्त पणे विचार मांडणारी, साचे मोडून
काव्यामध्ये प्रयोगशील योगदान करणारी विंदांची जीवनाची केवळ ओढ असणारी नाही तर
कुतूहल असणारी मोकळी, रांगडी खऱ्या अर्थाने रस्टिक कविता.
पण केवळ कवी म्हणून विंदांची ओळख सांगणं चुकीचं
ठरेल बरं का, कारण त्यांचे लघुनिबंधदेखील तितकेच उंची आहेत. ते शब्दांचं महत्त्व सांगताना म्हणतात,
‘पुष्कळ माणसे आपल्या विशिष्ट पेहरावात अधिक भीतीदायक वाटतात. तुम्ही आपले अनुभव
सांगू लागलात तर मी ते ऐकूनही घेणार नाही पण तुम्ही आपल्या अनुभूतीचा आविष्कार करू
लागलात तर तुमच्यापुढे करजुळणी करण्यातही मला गैर वाटणार नाही.’ लिहिताना खोडलेल्या
शब्दाविषयी ते म्हणतात, ‘शब्द खोडणे हा एक भ्रुणह्त्येचाच भाग आहे; प्रतिभेने पुढे
केलेला शब्द नाकारून ‘हे माझे नव्हे’ म्हणण्याची विश्वामित्री लेखकांना शोभत नाही!’
प्रतिभा आणि शास्त्र यांतला भेदाभेद ताडताना चे त्यांचे युक्तीवाद यथायोग्य असतात.
ते म्हणतात, ‘खरे म्हणजे मनुष्याचा स्वभावधर्म ‘जाणणे’ हा नाही; ‘वाटणे’ हा आहे.
जाणणारी माणसे संभाषण करू शकत नाहीत; ती फार तर व्याख्यान देऊ शकतात. वाटण्याचे
शास्त्र बनण्याची कल्पना मला तरी भयंकर वाटते. मला काय वाटते हे ज्या दिवशी
तुम्हाला अचूकपणे उमगता येईल त्या दिवशी माझे खाजगी जीवन संपुष्टात आले असेच
समजावे लागेल.’ विंदांचे हे आणि असे कितीक वेचे पुनःपुन्हा वाचावे असे आहेत.
अशोक नायगावकरांनी विंदांवर केलेल्या एका कवितेत
ते म्हणतात,
तो अभावांची बंदिश बांधतो
दारिद्र्याच्या मात्रा मोजत
अलगद येऊन ठेपतो
मानवतेच्या समेवर
ब्रह्म दचकून असते त्याला ....
प्रत्येक वाक्यच जणू ब्रह्मवाक्य असावं या ताकदीने
लिहिणाऱ्या विंदांचं साहित्य रूढी, परंपरा, साचा यांच्या विरुद्ध जात विकासाची नवी
वाट दाखवतं; प्रयोग, विज्ञाननिष्ठा आणि चिंतनाच्या पायावर उभं असतं म्हणूनच की काय
ते बुद्धीलाही पटतं आणि मनालाही भिडतं. विंदांची ही आणखी एक कविता, सामान्य
माणसाला आयुष्याशी लढण्याचं बळ देणारी .....नुसती वाचावी अशी नाही तर अनुभवावी ..जगावी
अशी...
असे जगावे दुनियेमध्ये... आव्हानाचे लावून अत्तर
....
नजर रोखुनी नजरेमध्ये ... आयुष्याला द्यावे
उत्तर ...
असे दांडगी इच्छा ज्याची ... मार्ग तयाला मिळती
सत्तर ...
नजर रोखुनी नजरेमध्ये ... आयुष्याला द्यावे
उत्तर ...
- युवोन्मेष २०१७
- युवोन्मेष २०१७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा