प्रिय कुसुमाग्रज

!!श्री!!
प्रिय कुसुमाग्रज,
            सादर नमस्कार
      पत्र लिहिण्यास कारण...खर तर काहीच नाही...अन म्ह्टल तर खूप काही. तसा तुमच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ पण तुमचे ‘पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा’ हे शब्द आमच्यासोबत आहेत ते अगदी बाकावर बसून पाठ्यपुस्तकातील कविता पाठ होईपर्यंत वाचली तेव्हापासून. तुमच्या कविता वाचण्यात अन त्यावर अर्थ कळेपर्यंत – वळेपर्यंत चर्चा आणि मतभेद करण्यात आम्ही कट्टयावरचे कितीक तास दिवस रंगून गेलोय...अवधानान ..अनवधानान तुमची कविता आमच्यावर संस्कार करीत होती आणि आम्हीही नवनवीन आव्हानं पेलवण्यासाठी सज्ज होत होतो.
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
किंवा,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला
अशा शब्दांनी अजूनही अंगावर तेच रोमांच उभे राहतात आणि ‘बास...यावेळेला तरी ही ही गोष्ट करणारच’ असा आत्मविश्वास जागा होतो...उत्साह संचारतो.
थोड्क्याशा दुखाचीही सवय नसणारे आम्ही जराशा असफलतेने निराशेच्या गर्तेत वगैरेही जून येतो...पण जेव्हा...
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी,
काळोखावर खोडीत बसला तेजाची लेणी
असं काहीतरी डोळ्यांसमोर उभं करता आलं की अंधाराला भेदणारी प्रकाशवाट सापडल्याचा आनंद होतो.
कसं जगावं? हे स्टेप बाय स्टेप ने शिकवणाऱ्या आजच्या सेल्फ हेल्प बुक्सच्या जगात क्रांतीचा जयजयकार करताना; ‘बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान’ आणि ‘कोसळल्या उल्का जळत सात दर्यात’ असं म्हणत वेडात दौडलेल्या वीर मराठ्यांची तुम्ही आम्हाला ओळख करून देता. आजही भ्रष्टाचार, जातीभेद यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी तरून पिढी एकत्र येऊन काही करण्याची जिद्द दाखवते तेव्हा तोच उद्वेग, आवेश कुठेतरी जपला गेलाय असं वाटून जातं.
केवळ स्वतःकडे न पाहता जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला आम्ही उद्युक्त होतो जेव्हा, आगगाडी आणि जमीन या कवितेत ‘दुर्बळ भेकड...’ असं म्हणत उद्दामपणे धावणाऱ्या गाडीलाज्मीन उत्तर देते आणि तीच गाडी ...’उलटी पालटी होऊन गाडी ती हजार शकले पडली खालती’ अशा अवस्थेत दिसून येते. नाट्य, संघर्ष आणि विरोध असे भाव उमटत जातात आणि समाजातील दोन स्तर आणि त्यांच्यातील भेदाभेद दिसून येतो.
अहिनकुल मधला विखारी आग ओकत येणारा नाग येताना तृणपात्याला मोडीत येतो..
’मार्गावर त्याच्या लवत तृणाची पाती,
पर्णावर सुमने मोडून मना पडती’ साऱ्या जगाला गुलाम बनवू पाहणारा हा नाग अखेरीस मुंगुसाकसून मारला जातो आणि त्यावेळी तीच पाती त्यांचा आनंद असा व्यक्त करतात.
‘संग्राम सरे रक्ताचे ओहोळ जाती
आनंदे न्हाती त्यांत तृणाची पाती’
केवळ विरोधातून तुम्ही समाजाभिप्रेत मानवतेविषयी विचार जागे करता असं नाही तर ‘गाभारा’ सारखी एखादी कविता ‘गाभारा सलामत तो देव पचास’ असं म्हणत खाड्कन डोळे उघडते. ‘मार्जिन’ या कवितेत
ईश्वर नाही म्हणता, - माझे
मतही अगदी तसेच आहे...
हो हो आपण म्हणता ते ही नाही खोटे
रोज प्रार्थना मीही करतो
हात जोडल्याविना जीवाला बरे न वाटे
देव नसे पण शक्ती असे ती
तिचे नियंत्रण जगतावरती
तिचे कराया स्मरण जरासे अडचण कोठे?
मन अपुल्या नजरेने जीवन सदा पाहते –
म्हणून माझ्या डोळ्यापुढती किरीटधारी रूप प्रभूचे उभे राहते
असो तसे पण – (मार्जिन सोडा)
ईश्वर नाही या प्रश्नावर –
अपुले जमते.
देव आहे किंवा नाही यावर कसे आपण बिनधास्त मतं मांडत असतो तशीच ती ‘मी सोडून इतर कोणी कामात तत्पर नाही’ अशी खात्री बाळगतो. या इतरांमध्ये पोलीस किंवा खाकी वर्दीतले आपले वाहतुकीचे रखवाले तर हमखास असतात. तुम्ही ‘सैनिक’ या कवितेत तुम्ही त्यांची खरी ओळख करून देता. सैनिक्ची भूमिका वठवणारा नत आणि खराखुरा सैनिक यांच्यातील फरक दाखवला आहे तो असा,
नाटकातल्या त्या शूराला
नसते तेथे मरावयाचे
असते केवळ टाळीसाठी
वीरत्वाने स्फुरावयाचे
रेल्वेतला सैनिक पण हा – जेव्हा अपुली मुलकी दुनिया सोडूनी जातो
      गळुनी पडती सर्व जांभया
तक्रारीचा स्वरही विरतो
दूरस्थातील आप्तजनांचा
आठव तेथे विद्ध न करतो
मळकट कवचे (रेल्वेतली) गळुनी पडती
आणि सनातन पुरुषार्थाचा
सोलीव गाभा युद्धतटावर उभा राहतो.
एकेक शब्द मनाशी भिडतो आणि आम्ही समरसून तोच अनुभव घेऊ शकतो.
      केवळ आशावाद आणि मानवतावादी दर्शन कवितेतून घडतं असं नाही तर तुमच्या नजरेतील कल्पनेच्या जगातला निसर्गही विलक्षण आहे ..’उषास्तवन’ किंवा ‘गोदाकाठचा संधिकाल’
उषेच दर्शन घडतं ते असं ....’विश्वामधले सात रंग हे
जागृत झाले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे हो जीवन वसुधा
तीर्थरूप ही होत जळे’
आणि संध्याकाळनंतरची रात्र अवतरते ती अशी...
पाचोळ्यावर का ही सळसळ
कसली डोहावरती खळबळ?
पाउल वाजे रजनीचे का येताना जगती ?
निसर्गनियमात बांधलेली पृथ्वी सूर्याभोवती फिरताना म्हणते ..’युगामागुनी युगे चालली करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना’ तर तपस्वी सुधांशू, प्रेमळ शुक्र अशा इतर ग्रहांना काजवे म्हणत तेजस्वी सूर्याला ‘नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
      तुझी दूरता त्याहुनी साहवे’ असंही म्हणून जाते. प्रेम या संकल्पनेशी आधारित तुमची प्रेमयोग ही कविता डोळ्यात झणझणीत अंजन घालते ते असं,
प्रेम कुणावर करावं ...कुणावरही करावं
प्रेम – ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावच
            पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं
प्रेम कर भिल्लासारखं
      बाणावरती खोचलेलं
मातीवरती उगवूनसुद्धा
      मेघांपर्यंत पोचलेलं असं निर्भीड असावं.
या आणि अशा कित्येक कवितांचंबोट धरून आजवर आम्ही चालत आलोय. असं चालताना अनेक अनुभव येताहेत; तुमच्याच शब्दांत सांगायचं तर;
मीही सजवतो सोंगे बरीच सोंगे, खोटे नाही
तुम्हीही सोंगी कुशल, यात न शंका काही
पण असं असतानाही तुमच्यासारखे काहीजण आम्हाला भेटतात आणि म्हणावसं वाटतं,
      अश्या खुळ्यांच्या जमावातुनी या महाखुळे ते येती
जनावरांतुनी माणसास जे पुढे जरासे नेती
      महाखुळे ते होते, असती, म्हणून आपण सारे
रुपयासह पेटीत ठेवतो दोन चार हे तारे 

- युवोन्मेष २०११

टिप्पण्या