एखाद्या ठिकाणी प्रथमतः जाणं
आणि पुन्हा एकदा जाणं यात किती फरक असतो! पहिल्यांदा जाताना जागा, वस्तू, झाडं,
पानं, फुलं, हवा, निसर्ग, भव्यता दिव्यता ...एवढच कशाला, हल्ली सोई –सुविधा, show
चा जमाना त्यामुळे दिखाऊ वैभव ...या सार्या गोष्टींमध्ये interest असतो rather
कुतूहल किंवा attraction असतं असं म्हणू हवं तर! पण त्याच ठिकाणी पुन्हा गेलो की
त्याचं कौतुक राहत नाही आणि खरं खरं वास्तव बघावं असं वाटतं, तिथली माणसं,
त्यांच्या तऱ्हा, त्यांचे स्वभाव, त्यांची राहणी याबद्दल जाणून घ्यावं असं
वाटतं...
परवाची कुवैतची ट्रीप अशीच
होती. राजीवच्या आईबाबांचं स्वतःच घर असल्यामुळे हॉटेल, चेक इन, चेक आउट असली काही
भानगड नव्हती. खरं तर परदेश पण विशेष काही फरक नव्हता, घरामुळे मोकळेपणा होता.
प्रशस्त घर, भव्य खिडक्या, आखीव
रेखीव गॅलरी, चित्रात असावं तसं घर ...खिडकीतून दिसणारा अथांग समुद्र,
क्षितीजरेषेचा थांगपत्ताच लागणार नाही... समुद्रानंच आभाळाला पांघरून घेतलेलं आणि ती
अथांग चादर अवघ्या विश्वाला व्यापूनही पुरून उरलेली ...तिला रंगाचं बंधन नाही..कधी
निळा, कधी हिरवा, कधी गडद जांभळा ....समुद्र ..पण शांत ..जणू ‘ठेविले अनंते तैसेचि
असावे, मनी असू द्यावे समाधान’...असं म्हणत आहे ती परिस्थिती, समोर चालू असलेलं
राजकारण, समाजकारण, धर्मकारण यातली स्थित्यंतरं पाहून सगळं तथास्तू..! म्हणत
accept केलेला.
झाडं...हिरवीगार...त्यांना
विकतचं पाणी. निसर्गानं पाठ फिरवली म्हणून काय माणूस वैभवात राहायचं सोडतो का? तो
वाळवंटात पिकं पिकवतो, फळांच्या बागा फुलवतो ....तंत्रज्ञानाच्या बळावर
...छे..छे... निसर्गाच्या बळावर ...भौगोलिक स्थानामुळे तेलावर अधिराज्य गाजवत
...पैशाच्या तालावर अख्खी दुनिया खरेदी करू शकतो...ही सुद्धा प्रगतीच!!
कल्पनेच्या पलीकडे जिथून
विश्वाची सुरुवात होईल असे अजत्स्त्र मॉल, तिथले अलौकिक प्रकारच्या ट्रेंड्सच
सामानसुमान आणि तितक्याच अथवा त्याहूनही कैक पट वेगाने चालू असणारी मालाची उलाढाल
...नवल नवल ...बघू तिकडे लखलखाट ... सकाळ, दुपार, संध्याकाळ ...काळाचा पत्ताच
लागणार नाही असा प्रकाश, चंद्र सूर्याला तरी वेळेच बंधन असतं...इथे तीनही त्रिकाळ
विजेचा प्रवाह अखंड वाहत असतो आणि धरती तो झेलत असते.
यवनांचा मुलुख..एखाद्या
मावळ्यानं तोंडात बोट घालून पाहतच राहावा तशी सुबत्ता, सुलभता आणि सौदर्य.
सौन्दर्याचं तर या धरतीला जणू वरदानच मिळालेलं. अतिशय लावण्यवती अशा या युवती
ज्यांना पुरुषच नाही तर बायकाही लाख वेळा मागे वळून बघतील. पु.ल. म्हणतात तसं
बायकाच बायकांकडे अती उत्साहाने बघत असतीलही कदाचित. पण सौदर्य या शब्दचं
मूर्तरूप...आणि एखाद-दुसरं नाही तर प्रत्येकच. सौदर्य जसं सुरेख भरजरी पोशाखात
खुलून येतं तसंच ते झाकून ठेवल्याने आणखी सुरेख दिसतं..हाच विचार असेल की काय त्या
बुरख्याआड दडलेल्या प्रत्येकीच्या मनात
कुणास ठाऊक? आज सुद्धा ही परंपरा टिकून आहे याचं आश्चर्य वाटतं. पुरुष ‘दिसदशा’
आणि स्त्री ‘बुरखा’ घातलेली अशी ही तिथली स्थानिक लोकं आजही त्यांची संस्कृती
टिकवून आहेत. त्यांची नवीन पिढी हे नियम तोडू बघतेय ..पण हे नियम आहेत म्हणून
संस्कृती आहे,.. जर ते नसतील तर ती टिकेल का याचा अंदाज येत नाही. नियमात जितका
अधिक अडकलेला तितका माणूस अधिक बंडखोर.....
त्यांची कुटुंब मोठमोठाली,
भरपूर बायका, पोरंबाळं आणि नोकर माणसं, बायका ... नोकर भारतीय, बांग्लादेशी किवा
फिलिपिनो ..त्यांचाही एक विशिष्ट गणवेश....अतिशय सामान्य ....काहीसा दुर्लक्ष
करावा असाच खरं तर...कितीक वेळा मनात प्रश्न आला ...असं काय कारण असेल ज्यासाठी या
बायकांना आपला देश सोडून दुसर्याच कुठल्यातरी देशात जाऊन असं काम करावं लागत
असेल...उत्तर माहीत असतं ..मान्य करावसं वाटत नाही. ..पैसा ..दुसरं काय असणार...या
अशा त्यांच्या कष्टांवर त्याचं घर कुठेतरी दोन वेळा जेवत असेल कदाचित.. आपला देश,
आपली माणसं सोडून या परक्यांच्या घरात येऊन काम करायचं ... न भाषा येते न जागेची काही
कल्पना असते अशा जागी येऊन राब राब राबणे...हे आयुष्य?...देवाची पण कमाल आहे ..त्यानी
स्त्रीच्या अंगी हा कुठला सोशिकपणा दिला आहे ?...त्याचं त्याला माहीत !! प्रत्येक देश
आपापल्या देशी माणसांची काळजी घेत असतो ते एम्बसीच्या रूपाने. अनोळखी लोक, अनोळखी भाषा,
पैशाची देवाणघेवाण..अशा सगळ्या काळोख भरल्या रात्री ती एक ज्योत त्यांना मार्ग दाखवत
असते. भव्यदिव्य मुखवटा घेऊन उभ्या असलेल्या या चित्रात ही एक वेदना सुद्धा अगदी स्पष्ट
उठून दिसते.
सौदर्य, संपत्ती, सामर्थ्य आणि सुबत्ता
या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या या देशानं खूप वेगळे अनुभव दिले.
विचारांची समृद्धी तर हाती आलीच पण भावभावनांचं एक वेगळंच मिश्रण हाती आलं. परदेशफिरून
आल्यानी तो कधीच बघून होत नाही ...तिथे राहावं लागतं, वागावं लागतं, जगावं लागतं
तरच त्याची ओळख होऊ शकते, किवा आपलीच आपल्याला नवीन ओळख पटू शकते.
chapok nande....
उत्तर द्याहटवाpravas varna asava tar asa... khutkhutit... ugach aghal paghal nahi...
aawadala... visheshtaha, 'dusaryanda gelyavar lihilela' mhanoon, aani 'pardesh baghayacha tar rahayala pahije' hya don vicharanmule..