मार्ग’दर्शन’

पावसाची सर नुकतीच येऊन गेली, वाऱ्याचा उनाडपणा चालूच होता. कितीदातरी वाद झाला, तरी त्याचं आणि शेताचं एकमेकांशिवाय पानही हलत नाही हे अगदी खरं. त्यामुळे त्यांच्या दंग्याची मजा मीही मनापासून लुटत होते. त्यांची ‘झुळूक’ आणि ‘सुळूक’ ची भाषा आता मलाही काही नवी नाही, त्यामेले त्यांच्यातलीच एक बनत थांबत थबकत मधेच वळत निघाले होते नेहमीसारखी आणि अचानक येऊन रस्त्यावर आदळले.
रस्ता काय सतत वैतागलेला आणि चिडलेला, ओरडला वसकन्.... “ए वाटुली, मूर्ख कुठली, वाट्टेल तिथून वाट्टेल तिथे फिरत असतेस, कुठे जायचंय, कुठून आलीयेस काही तरी माहिती आहे का? थांब आता इथेच. नाही तर फिर मागे, धांदरट कुठली !!तुझ्यामुळे आता इतर वाटा पण इथे येतील; तुझ्या या अशा वागण्याने काय गोंधळ आणि गर्दी होते न ते तुला कळायचं नाही. निष्काळजीपणा शोभ्तोच तुला हा ...जा चल ..” “एएएए..रस्त्याsss... तुझं अतीच झालय काय.. आम्ही आपलं शन करतो म्हणून वाट्टेल ते बोलतोस ...जसा दिसायला खडबडीत आहेस न तसाच वागायलाही आहेस..आज मी अजिबात ऐकणार नाहीये तुझं ..उलट त्या समोरच्या लिंबू सरबताच्या दुकानाज्व्ळून जाऊन येते..म्हणजे ते गणूकाका पण उद्यापासून इथेच येऊन बसतील” असं म्हणत मी गरकन फिरून गणूकाकांच्या दुकानाकडे निघालेसुद्धा.
रस्त्याला मात्र यातून मार्ग कसा काढायचा काही सुचेना.. त्याने तो प्रश्न सरळ आठवड्याच्या अहवाल प्रदर्शनात हायवेपर्यंत पोहोचवण्याचं ठरवून टाकलं आणि मलाही तसं कळवलं. मी ही यावेळी ठरवलंच होतं काय व्हायचं ते होऊ दे, कोणाकडेही जा म्हणाव, हायवेकडे जा नाहीतर एक्सप्रेस हायवे कडे जा , मी या प्रश्नाला तोंड देणारच. कधीही पहा, याची अरेरावी चालूच असते . कोपरयाकोपऱ्यावर दगड, विजेचे खांब, अतिक्रमणाचे फुटपाथ आणि वाटांना बंदी ...रोजचा वाद, भांडण हेच चालू.
एकदाचा रविवार आला आणि मी चौकाकडे निघाले. पण तो रविवार इतर वेळ पेक्षा जरा वेगळाच वाटत होता, नाही माझा वाद चारचौघांत येणार हे कारण होतच पण त्याहीपेक्षा वातावरण समारंभ असल्यासारखं दिसत होतं. मी माझी बाजू सावरून घेण्यासाठी कोण कोण मदत करेल असं शोधतच सभेत बसले. चक्क पाणी, जमीन आणि हवा तिथेही आज उपस्थित होती. एरवी भूमंदळातले आम्ही सर्व एकत्र जमायचो.
भूमंडळ, वायूमंडळ आणि जलमंडळ यांचा एवढा मोठ्ठा कारभार हे तिघे कसे सांभाळत असतील याचं कायमच कुतूहल वाटतं आता तर माझा प्रश्न अगदी यूsss सुटणार असा विचार करत मी निवांत झाले. इतक्यात, डोंगरदऱ्यातली दगडी पायवाट दिसली. तिचा पाठींबा मला सगळ्यात महत्वाचा वाटला, किमान तिचं वय पाहून तरी रस्ता माघार घेईलच असं मनात ठेउन मी थेट तिच्यापर्यंत पोहोचले. नेहमीसारखच शिवाजी महाराजांच्या काळाबद्दल तिचं भरभरून बोलणं चालूच होतं. गडाच्या अगदी पायथ्यापासून ते थेट माथ्यापर्यंत भरधाव, सुसाट वेगाने मावळे ये जा करत असत; घोड्यांच्या तपांचा आवाज कड्याकपाऱ्यात घुमत असे, माझ्यात तसे गुणापेक्षा दोषच अधिक. न सपाट न सरळ, कधी गुळगुळीत कधी सखल, दुर्गम, आडवळणी, अणुकुचीदार दगडांची. पण महाराजांना मी योग्य वाटले, त्यांनी मला नुसतीच उंची गाठण्याची नाही तर ध्येय गाठण्याची सवय लावली. अजूनही माझा जर कोणी माझा गैरवापर करू नये म्हणून मी स्वतःला कठोर, अशक्यप्राय बनवते, कधी एखादी दरड कोसळवून माझा राग व्यक्त करते आणि पुन्हा जुन्या दिवसांची वाट बघते. तिच्यापुढे मला माझा प्रश्न अगदीच लहानसा वाटायला लागला. आणि मी अगदी शांत झाले. इतक्यात रस्ता आलाच आणि बरोबर त्याची ती गल्ली बोळांची पलटण. इतका वेळ शांत असलेलं वातावरण दणाणून गेलं. त्याने जर विषय काढला तरच आपण उत्तर द्यायचं नाहीतर वाद घालायचा नाही असं मी ठरवून टाकलं.
एवढ्यात रूळही हजर झाला धापा टाकत टाकत. तो रस्त्याचाच मित्र काय तर म्हणे, ‘मला वेग आहे म्हणून मी भारी ...’ एक्स्प्रेस हायवेमुळे त्याचं नाक जरा खाली आलय पण अधून मधून त्याचा मीपणा डोकावतोच. असं सगळं डोक्यात चालू असतानाच एक्स्प्रेस हायवे दिसला आणि मनात भीतीचं साम्राज्य पसरलं..
पण तेवढ्यात समोरून रानवाट येताना दिसली आणि मी तिला सगळी गोष्ट यथासांग सांगून टाकली. यावर ती चक्क हसली. एरवी माझी बाजू घेणारी ती आज चक्क माझ्या विरोधात जाणार की काय असं वाटून गेलं. मग तिनंच तिच्या ह्सण्याचा खुलासा केला. “अग, आपल्या सगळ्यांचा, अगदी एक्स्प्रेस हायवेपासून ते तुझ्या माझ्यापर्यंत ..खरा हेतू काय असतो? माणसाला त्याच्या ध्येयाप्रत जाता यावं हा. आणि हे मार्गक्रमण तुझ्यामाझ्यामुळे नैसर्गिकरीत्या होतं तर रस्ता आणि रूळ मात्र माणसाने त्याच्या सोईसाठी स्वतः निर्माण केले. म्हणूनच तर तुझा रस्त्याला अडथळा वाटतो.” ती सहज बोलून गेली. रानात राहून राहून तीसुद्धा घनदाट विचार करायला लागलीये. तिचं बोलणं नेहमीच असं असतं विचार बिचार करायला लावणारं....माझं हे असच एका विचाराचा दुसरा विचार मग तिसरा चौथा विचार असं चालू होतं आणि तेव्हाच गलका कानावर आला. सगळेजण ‘सेतू’ च्या नावाचा जयघोष करत होते.
सेतूही ते स्वीकारत थेट मंचावर चालला होता. तो जाताच पाणी आणि जमीन उठून उभे राहिले. पाण्याच्या डोळ्यात अपेक्षांचा महापूर होता तर जमिनीच्या डोळ्यात कृतकृत्य झाल्याच समाधान..कुठे हेवे दावे नव्हते, कुरघोडी नव्हती ...उलट आनंद होता कर्तव्यपूर्तीचा. नवनवीन आव्हानं सहज पेलणार्या सेतूनं काही शब्दात मार्गदर्शन करावं असं सुचवण्यात आलं.

सेतू उभा राहिला. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याच्या चेहऱ्यावर कुठेच मिळालेल्या सन्मानाचा गर्व नव्हता, तर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव होती. त्यान बोलायला सुरुवात केली. “या काठावरून त्या काठावर जाण्यासाठीच अंतर माझ्यायोगे सहज कमी होत आहे याचं समाधान तर आहेच  पण एक इच्छाही आहे आपल्यामुळे दोन प्रदेश जोडले जाताहेत ते केवळ अंतरानीच नाही तर मनांनी जोडले जाओत. जर तसं झाल तर मी खरा राममार्ग ठरेन.” पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळेजण सेतूचं अभिनंदन करत होते. त्याला शुभेच्छा देत होते. मी आणि रानवट पण त्या गर्दीत सामील झालो. परत येताना डोक्यातला प्रश्नांचा गुंता सुटल्यासारखं वाटत होतं. तोडण्यापेक्षा जोडण्याचं महत्त्व पटत होतं.  
युवोन्मेष २००४       

टिप्पण्या