आजी..........

आज्जी..............खूपदा लिहावसं वाटलं, पण लिहिता आलं नाही. सहज सोप्पं होत तेव्हा ते.... तुझी आठवण येतेय;....तू काय करतेयस?...मला कन्टाळा आलाय....इथे एक नंबर पाऊस पडतोय...तू लगेच पुण्याला ये..आता खूप दिवस ये आणि ...तू आत्ता इथे हवी आहेस बास...आता हे शक्य नाही....म्हणून...
माझी आज्जी, यातला माझी आहे न, तो खरच प्रचंड हावरा आणि स्वार्थी आहे ...ती दुसऱ्या कोणाची नसावीच असा एक भाव त्यात आहे....काही माणस कुणाशीच वाटून घ्यावीशी वाटत नाहीत त्यापैकी माझ्या आयुष्यातली ही एक व्यक्ती.
खूप लहानपणापासून आज्जी या व्यक्तीसाठी मी काय वाट्टेल ते करायला तयार असायचे कारण तिचं बरोबर असणं हा एक अतिशय उत्साही, आनंदी आणि आत्मविश्वासानं भरलेला असा सळसळता जिवंतपणा असायचा...प्रत्येक क्षण पुरेपूर जगणं म्हणजे काय? तर माझी आज्जी... मग ते एखाद प्राजक्ताच फुलं असो,मोगऱ्याची कळी, देवासमोरची फुलांची नक्षी, संस्कृत श्लोक, ताजा लोण्याचा गोळा, वालाची उसळ, घरातच बनवलेलं अमूल बटर, सुरकुत्या न पडता वळत घातलेली नऊवारी साडी, कागदावर उमटलेला शब्द न शब्द, पत्त्यांचा कायमच लागलेला डाव,पाठीवरची शाबासकी आणि रात्रीची तिच्या कुशीतली गोष्ट......
तिनं खूप महत्त्वाची गोष्ट शिकवली... विचार करायला शिकवला. एखाद्या गोष्टीकडे positively कसं पाहावं ते तिनं कायम दाखवून दिलं....नुसत बोलून नाही तर वागून...अगदी साक्षात वजाबाकी जरी तिच्यासमोर उभी असली तरी ती त्यातून एखादी तरी positive गोष्ट शोधून त्याचं कौतुक करू शके.
माझी ती एक कमाल मैत्रीण होती, अतिशय उत्तम संवाद साधू शकायची. पन्नास वर्षाचं पिढीतलं अंतर कापून आत्ता आत्ताचे विचार नुसती ऐकू नाही तर पचवू शकायची. भारतावर तिनं प्रेम करायला शिकवलं....समाजाचा विचार करत जगायला शिकवलं..प्रबोधिनी सारख्या संस्थेशी तिनं माझी ओळख करून दिली...ज्यामुळे मी खूप निरनिराळे अनुभव घेऊ शकले...तिने कित्येक विषयांवर चर्चा केल्या. अगदी गणित, शास्त्र, भूगोल काय वाट्टेल त्या...त्यातून खूप काही शिकलेय..नुसती माहिती नाही तर एखाद्या विषयचं ज्ञान म्हणजे काय याचा अनुभव घेतलाय....

आजवर आम्ही हजारदा तरी कवितांची पुस्तक घेऊन आवडत्या कविता वाचल्या असतील, प्रत्येक वेळेला कविता वाचून त्यातून कळणारा वेगवेगळा अर्थ आणि त्यावरची घेतलेली टाळी कधीच विसरता येणार नाही. माहित नाही ..माझ्याइतकं भाग्यवान कोणी असेल का? माझ्या आजीनी मला ज्ञानेश्वरीतले श्लोक आणि त्यांचे अर्थ पत्राने लिहून पाठवले आहेत....तिला आवडणारे कित्येक श्लोक माझ्या बाळंतपणात वाचून दाखवले आहेत...माझा मुलगा आणि आज्जी याचं पणतू आणि पणजीचं नातं इतकं गोड होतं...तिच्याच मांडीवर झोपणार असेही लाड त्याने पुरवून घेतले....माझं आणि तिचं भांडणही व्हायचं खूपवेळा...आणि ते कधीही संपल नाही कारण दोघीही स्वतःचा मुद्दा कधीच सोडायचो नाही...कदाचित त्यातच आमचा आनंद होता. तिच्या आठवणी अनंत आहेत त्यातून तिचा सहवास अखंड राहील ...पण तिच्यासारखा थोडा जरी positive विचार मला करता आला तर मात्र तिला खरा आनंद होईल. 

टिप्पण्या

  1. kamal....

    aajichi ek zalak milun jate.

    Pan ek vatala, je lihilays te thoda lihilays...

    ajun lihun ek paripoorna vyakti chitra ubha kar ki... (mi charitra nahi mhanate)

    ticha disana, kapade, bolanyachi dhab, tumache sanvad, patratil kahi oli, udaharana asa sagala deun...

    Mi vat pahatoy...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा