न संपणारी गोष्ट......


“एक होता अच्चा, एक होता बच्चा आणि एक होतो मी. अच्चा गेला शिकारीला, बच्चा गेला शिकारीला, मी पण गेलो शिकारीला. अच्चाला शिकार मिळाली, बच्चाला शिकार मिळाली, मला काहीच नाही”.....मला काहीच नाही असं ऐकताच नीताच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. अच्चाबच्चाकडे आहे आणि माझ्याकडे नाही... का पण? ...गोष्ट असली म्हणून काय झालं, मला पण हवं सगळं काही... इतक्यात आज्जीनं पुढची गोष्ट सांगितली. “अच्चानी एक शिकार दिली, बच्चानी एक शिकार दिली....माझ्याकडे दोन दोन”...हे ऐकताच मात्र आनंद गगनात मावेनासा झाला.....येssss..आज्जीची गोष्ट चालूच होती. तेवढ्यात सईदाबाई काम करून घरातून बाहेर पडत होत्या. नीता लगेच त्यांच्या पाठोपाठ निघाली. अजून जिना धड उतरता येत नव्हता. त्यामुळे बाई तिला म्हणाल्या,” नीता अंदर जाओ, आज्जी मारेगी”....त्यावर नीता म्हणाली, “आज्जी मारेगी नही, गोष्ट सांगेगी” हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच गम्मत वाटली आणि सगळे खोखो हसले. नीताला काही कळलं नाही. आज्जी आणि तिची गोष्ट यातलं घट्ट नातंच फक्त तिच्या डोक्यात पक्कं होतं.
अच्चाबच्चा बरोबरच पेंद्या,वड्ज्या, वाकड्या आणि लहानगा श्रीकृष्णबाप्पा सुद्धा होता. ज्ञानोबा, मुक्ताई, सावता माळी, एकनाथ आणि किती किती जण होते. शिवबा तर खास आवडता. अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी सुरु झाल्या की एकानंतर दुसरी...अजून अजून... असं करता करता अख्खा दिवस जायचा; तीच कथा भीम न अर्जुनाची, हे वीर शिरोमणी तेव्हापासून लाडके होत गेले. पण या सगळ्यांशी जमलेली गट्टी ही केवळ लहानपणापुरतीच मर्यादित नसून अवघ्या जन्माला पुरून उरणारी  आहे हे तिला कुठे माहित होतं. नीता मोठी होत होती तसतशा आज्जीच्या गोष्टीही मोठ्या होत होत्या. साने गुरुजी, सावरकर, विवेकानंद यांनी आता अच्चा आणि बच्चाची जागा घेतली होती. गोष्ट नुसतीच ऐकायची नसते तर ती अंगीकारायची पण असते हा धडा आता पचनी पडायला लागला होता. टरफलाच्या गोष्टीतले बाळ गंगाधर टिळक, घड्याळाच्या गोष्टीतले मोहनदास गांधी हे अचानक थोर झाले नाहीत,तर ती थोरवी त्यांनी उत्तम वागून मिळवली हे कळायला लागलं होतं.

दारातला बहरलेला मोगरा दिसला की आज्जी आपसूकच कालिदासाच्या शाकुंतलेला भेटवून आणायची, निसर्गाशी ओळख करून द्यायची. मध्येच कधीतरी तरुणाईचं उत्साही वागणं खटकलं की दासबोधातली मुर्खांची लक्षणं वाचून दाखवायची. त्यातली सगळीच लक्षणं आपल्यावर चपखल लागू पडताहेत हे कळून आल्यावर शरमेनं तिची मान  खाली जायची आणि वागण्यात योग्य तो बदल घडायचा. आज्जी, नीता आणि गोष्ट हे एक जादूची कांडी फिरवावी तसं अनोखं नातं होतं. आज्जीनी एखादी गोष्ट सांगायला सुरुवात केली की ती कधी संपूच नये असंच तिला कायम वाटायचं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आजीची गोष्ट तिच्या बरोबर होती आणि तिला ती योग्य दिशा दाखवत होती. अगदी जुन्या सण संस्कारांची कारणं परिणाम ते सध्याची ट्रेंड किवा फॅशन, कशातून काय घ्यायचं आणि काय वगळायचं हे नेमकं कळायला कित्येक गोष्टी आधार म्हणून समोर आल्या. अगदी लग्न करताना बुद्धीचं सामर्थ्य की सौंदर्य इथपर्यंत सगळ्या विचारांना या गोष्टींनी एक भक्कम बैठक दिली. आज नीताकडे तिची आज्जी नाही पण आज्जीने सांगितलेल्या गोष्टी तिच्याबरोबर आहेत. रोज रात्री तिचा मुलगा तिला, “हं आई, एक होता अच्चा, एक होता बच्चा आणि एक होतो मीsss” अशी त्या गोष्टीला सुरुवात करून देतो; तेव्हा तिच्या मनात येतं की खरंच, या गोष्टी तर चिरकाल टिकणाऱ्या कधीही न संपणाऱ्या गोष्टी आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा