मोदी तरी बिचारे काय काय करणार?


नमो नमो नमो ...... आमच्या देशातला पेट्रोलचा भाव कमी करा, आमच्या देशातला भष्टाचार कमी करा, रस्त्यावरचे खड्डे घालवा, प्रदूषण कमी करण्यासाठी; पर्यावरण संतुलित करण्यासाठी योजना आखा, आम्हाला नोकरी द्या, आम्हाला शिक्षणात राखीव जागा द्या आणि आणखीही बरंच ...सर्व काही तुम्हीच करा ..... आमच्या ऐवजी शिक्षण तुम्हीच घ्या आणि पास पण तुम्हीच व्हा हे तेवढं म्हणायचं बाकी आहे....अहो पण, सरकार तरी काय काय करणार? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी त्याचं त्यालाच प्यावं लागतं. घास भरवता येतो पण स्वतःचा स्वतःच चावावा आणि गिळावा लागतो...ऐतखाऊ आणि फुकट्यांच्या आपल्या या जगात कोण कोणाचा आणि कसा विकास करणार?
      आम्हाला अजून रस्ता आणि फुटपाथ यातला फरक कळत नाही. हातानी दोन पोरं धरून आम्ही हमरस्त्यावरून सारसबागेत फिरल्यासारखे चालत जातो. जर कुठल्याशा दुकानात गेलो तर अरेरावी करून आपण आल्या आल्या आपल्याला हवे तेच आधी दिले गेले पाहिजे असे म्हणत भांडणं करतो. ओळी वगैरे आम्हाला दिसत नाहीत त्यामुळे त्या पाळण्याचा प्रश्नच येत नाही. परदेशात गेलो की आम्ही कारच्या मागच्या सीटवर सुद्धा बेल्ट बांधून बसतो पण इथे आम्हाला लाज वाटते, सिग्नल कळण्यासाठी रंगांच ज्ञान असावं लागतं आणि आजूबाजूच्या गाड्यांचं भान असावं लागतं, यापैकी कुठल्याच निकषावर आम्ही पास नाही त्यामुळे अपघात हे नशीब वाईट असल्यामुळे होत असणार; त्यात वाहकाचा, वाहन चालवण्याचा अथवा ट्राफिकचे नियम न पाळण्याचा काहीच संबंध नसतो. वैयक्तिक आणि सार्वजनिक असे दोन प्रकार असतात आणि ते तशाच प्रकारे वापरले जातात हे अजून आपल्या डोक्यात येतच नाही ...आपण प्रत्येकच जागा वैयक्तिक मालकीची असल्यासारखी नुसती वापरतो...जपत नाही.
भ्रष्टाचार आम्ही करत नाही, ‘ते’ करतात, आम्ही त्यांना फक्त तो करू देतो इतकंच. आम्ही थोडीच डोनेशन्स मागतो किंवा वशिले मागतो; छे: आम्ही फक्त देतो....देणारा गुन्हा करत नाही मागणारा करतो...उलट असं अहिंसक वागून आम्ही एका प्रकारे भ्रष्टाचाराला आळा घालत नाही का? आम्ही कर्ता, कर्म अशा भाकड गोष्टींकडे लक्ष देत नाही...आम्ही फक्त बघतो, बघ्याची भूमिका घेणंही अतिशय मह्त्त्वाचं असतं असं आम्ही शिकलेले आहोत...हो आणि हल्ली आम्ही खूप काही करतो, सोशल मीडियाचा वापर करतो ना आम्ही...फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर बसून आम्ही आमचे कित्येक तास, दिवस, महिने, वर्ष लाईक आणि डीसलाईक करतो ...थकून भागून एखादा मॅक बर्गर किवा पिझा खाऊन शांत झोपी जातो....यात आपण आपला वेळ पर्यायी देशाचा वेळ वाया घालवतो असं आम्हाला वाटत नाही.... अमेरिकन आणि इटली याच देशात काय ती खाद्यसंस्कृती होती आणि आहे अशी ठाम समजूत असणारे आम्ही आपण कुठेतरी असं करताना आपल्याच चलनाचं मूल्य कमी करत चाललो आहोत हे समजू शकत नाही
लोकं म्हणतात पळायला हवं ... की आम्ही जिम लावतो...लोकं म्हणतात कॅलरी कॅलरी की आमचं तेल तूप बंद ....लोकं म्हणाले सॅलड हेल्दी की सकाळ संध्याकाळ नुसती सगळी गर्दी सॅलड बारमध्ये ...योगासन आणि सूर्यनमस्कार काय किवा घरातली कोशिंबीर काय वेगळी नसते पण आपल्याला ती भाषाच कुठे कळते...स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यापेक्षा आपल्याला दुसऱ्याच्या सारखं जगण्यातच धन्यता वाटते.... क्षेत्र कुठलंही असो आम्ही असेच वागतो, नोकरी करताना आम्ही नवीन काही शोधावं म्हणून कुठलंच काम हातात घेत नाही ...केवळ जे सांगितलं आहे ते आणि तितकंच करतो..काम करण्यापेक्षा पाट्या टाकून वेळ पुढे ढकलून देतो....चुकून एखादा असं काहीतरी वेगळं करताना दिसलाच तर त्याला वेडा ठरवायला मात्र जराही वेळ घालवत नाही ...आणि असं करण्यात आम्हाला विशेष काही गैर वाटत नाही...कारण आमचं ध्येय काय तर अमेरिकन सिटीझनशीप....वर्षातून एक तरी परदेश दौरा केला तर आणि तरच हल्ली आम्हाला महत्त्व मिळतं...परदेशी ब्रान्डवर आम्ही उभे राहतो... तेच कपडे वापरतो ...प्रवास त्यानेच करतो आणि खातोही तेच .....आम्हाला या देशात जर रहावसंच जर वाटत नसेल तर सुधारणा काय करणार आम्ही ...घरातच वोटर कार्ड येतं म्हणून मतदान करायला गेलोच चुकून तर उमेदवार कोण हे सुद्धा माहीत नसतं ना आपला मतदार संघ माहीत असतो...आम्ही कधी चुकूनही त्या उमेदवाराचं प्रोफाईल वाचायचे कष्ट घेत नाही..आजूबाजूचे लोकं असतात की तेवढ सांगायला ...बास झालं...तो ही एक दिवस ‘सुट्टी’ एन्जॉय करतो....आपल्या अशा मतदान केलेल्या ‘बोटा’चा फोटो काढून फेसबुकवर त्याची जाहिरात करायला मात्र आमचा नंबर पहिला...
एकूणातच आपल्याकडे किवा आपल्या देशाकडे असणाऱ्या नैसर्गिक संपत्तीविषयी आपल्याला ना माहिती आहे ना कुतूहल..चमचमत्या, झगमगत्या पाश्चात्य संस्कृतीच्या चष्म्याची हौसच अधिक...सर्वसाधारणपणे जेव्हा एखादा देश विकसित होतो तेव्हा तो त्याच्या संस्कृतीचा पाया भक्कम बनवत विकासाच्या पायऱ्या चढत पुढे जातो ..आपल्याला मात्र दुसऱ्याचं बोट धरून जाण्यातच कौतुक वाटतं.... आता असे हे आमचे निगरगट्ट आणि निर्ढावलेले मेंदू विकसित होतील अशी आशा बाळगणाऱ्या तुमचा आम्हाला खरंच खूप आदर वाटतो.
पण, जर या आणि अशा कित्येक पायाभूत जाणिवांचा अभाव आपल्या भारतीयांमध्ये असेल तर आम्हाला कोण आणि कसा मार्ग दाखवणार? एक वर्ग शिकलेलाच नाही म्हणून अशिक्षित आणि दुसरा वर्ग जगात काय आहे नाही ते सर्व ज्ञान कोळून प्यायलेला अतीसुशिक्षित आणि माजलेला असताना सगळेच जण एकेक पाउल पुढे आले की अख्खा देश एक पाउल पुढे जाईल या तुमच्या तत्वाप्रमाणे देश सुराज्याकडे कधी जाणार?

तुमचं काय चूक आहे म्हणा? तुम्ही तरी काय काय करणार? कचरा हा कचरापेटीतच टाकायचा असतो, रस्त्यावर नाही. रस्त्यावर थुंकणे हा गुन्हा आहे, आपल्या देशातही सिग्नल पाळायला हरकत नाही,परीक्षेत एकदा कॉपी करून पास झाल्याने आयुष्यात त्याचा काहीच फायदा होत नाही, घड्याळातली वेळ ही फक्त घड्याळापुरतीच मर्यादित नसून अधून मधून आपणही ती पाळावयास हरकत नाही, आपल्या देशात पिकवली जाणारी फळं आणि भाज्या तितक्याच पौष्टिक असतात जितक्या परदेशातल्या ‘एक्झॉटिक वेजिटेबल’, रिसोर्स आणि कम्फर्ट शोधत आपण परदेशाचे गुलाम होत चाललोय .....हे सगळं का आम्हाला पंतप्रधानांनी शिकवायचं?....आणि आम्ही म्हणतो अच्छे दिन आनेवाले है!!!!!!
'Yuvonmesh' (October 2014)

टिप्पण्या

  1. Very true, Nandita! ! No point just chanting Namo Namo, each one of us have to get our basics right and do our bit.... only then will achche din come. Very well-written; totally agree!!

    उत्तर द्याहटवा
  2. मस्त!

    And still there is a hope. check this out... I loved it!
    http://www.storypick.com/anonymous-revolution-india/

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा