ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण

ग्यानबा तुकाराम ढॅण्टढॅण टॅण्टढॅण - एलिझाबेथ एकादशीच्या निमित्ताने 

‘खेळ मांडियेला येत्या बालदिनी’ म्हणत परेश मोकाशी यांनी त्यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट यंदाच्या बालदिनाच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित केला आणि त्या चित्रपटाने खराखुरा बालदिन साजरा केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ सारखा एक उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकाकडून तशाच किंबहुना अधिकच अपेक्षा होत्या आणि या चित्रपटाने त्या अगदी सहज पूर्ण केल्या. 
एक अतिशय साधी सरळ कथा, वास्तवाचं छायाचित्रण, सुरेल गाणं, सुंदर भाषा आणि ज्या त्या वयाला शोभेल असे अतिशय उत्कृष्ट संवाद यांनी नटलेला असा हा चित्रपट महाराष्ट्रातील ‘पंढरपूर’ या गावात घडतो. गावाच्या नावातच दडलेली ‘विठुमाऊली’ आणि ‘वारी’ची नस पकडत दिग्दर्शक आपल्याला त्या कुटुंबाचाच एक भाग बनवून टाकतो आणि मग त्या कुटुंबाच्या आयुष्यातले काही दिवस आपण सर्वजण त्यांच्यापैकीच एक जण होऊन अनुभवतो. 

‘ज्ञानेश’ हा एक हुशार,चुणचुणीत मुलगा, त्याची लहान बहीण ‘झेंडू’, त्याची आई न् आजी असं हे कुटुंब. ज्ञानेशचे वडील हयात नाहीत पण ते Scientist असल्यामुळे त्यांनी दिलेलं ज्ञान आणि त्यांनी बनवलेली एक सायकल ‘एलिझाबेथ’ या गोष्टी म्हणजे या मुलांचं सर्वस्व. विलक्षण नाव तसा कमालीचा अर्थ. एलिझाबेथ म्हणजे टिकाऊ अशी ही सायकल पण काही साधीसुधी नाही तिच्यामध्ये खूप बदल केलेले आहेत, तिला डोळे आहेत, हसरा चेहरा आहे, सायकलची सीट असली तरी तिला पाठ असं बरंच काही. या मुलांसाठी बाबांची आठवण असलेल्या या सायकलचा खूप लळा आहे आणि त्यांच्या Scientist बाबांनी ती बनविली आहे याचा सार्थ अभिमानही आहे. वडिल गेल्यानंतर आई स्वेटर विणून घराचा खर्च भागवत असते. एकदा ज्ञानेशच्या आईचं हे स्वेटर विणण्याचं मशीन वेळेत कर्ज चुकतं करता न आल्यामुळे बँकेकडे सुपूर्त करावं लागतं. हे मशीन सोडवून आणण्यासाठी पाच हजार रुपये द्यायचे असतात. या रकमेची जमवाजमव करताना आता ही ‘एलिझाबेथ’ सायकल विकावी लागणार अशी परीस्थिती निर्माण होते. झालं, ज्ञानेश आणि झेंडूची झोपच उडते. काहीतरी करायचं आणि आपली सायकल वाचवायची असं त्याचं ठरतं. नजीकच्या काळात असणाऱ्या ‘कार्तिकी एकादशी’च्या निमित्ताने एखादा व्यवसाय करावा का असं त्यांच्या डोक्यात येतं. त्यांच्या मित्रांकडूनही या कल्पनेला पाठींबा मिळतो आणि सगळी मित्रमंडळी ‘एलिझाबेथ’ साठी एकत्र येऊन बांगड्यांचा व्यवसाय सुरु करायचा ठरवतात. आई आणि आज्जी यांना कळू न देता हा सगळा व्यवहार पार पडताना ज्ञानेशची पार तारांबळ उडून जाते. पण तो जिद्दीनं आणि प्रामाणिकपणानं हा उद्योग पूर्ण करतो. आपल्या बरोबरीच्या मित्रांना चांगल्या सवयीचं महत्त्व पटवण्यासाठी, त्यांना एखाद्या गोष्टीसाठी विरोध करण्यासाठी तो घाबरत नाही. थोडक्या कालावधीत पण भरपूर अनुभवांना सामोरं जात तो त्याची एलिझाबेथ विकण्यापासून तर थांबवतोच पण आईलाही कर्जमुक्त होण्यासाठी हातभार लावतो. असे हे सहज सुंदर कथानक जाता जाता खूप काही देऊन जाते. 

दिग्दर्शकाचा आणि लेखकाचा हा ज्ञानेश घोकंपट्टी बहाद्दर नाही हे कळतं त्याच्या कीर्तनांवरून. संत गाडगेबाबा आणि संत न्यूटन यांचे तो दाखले देतो. एकीकडे पेरेल तसे उगवते म्हणतो तर दुसरीकडे क्रिया तशी प्रतिक्रिया, दूर गेलेली गोष्ट परत मिळवता येते...पण त्यासाठी काय लागते तर गुरुत्वाकर्षण असे कित्येक शास्त्रीय नियम तो साध्या सोप्या भाषेत मांडतो...जशी एखादी गाठ सोडून दोरा सरळ करून दाखवावा तसे...लेखन आणि संवादांचं हे एक अफलातून मिश्रण जुळून आलंय...ज्यातून वरवर बोजड वाटणारे हे गुरुत्वाकर्षण, न्यूटनचे गतीविषयक नियम, उर्जा अक्षय्यतेचा नियम किंवा आईनस्टाईनचा सापेक्षता सिद्धांत हे अगदी सोप्पे वाटायला लागतात. 

‘दगड दगड दगड ..’ हे परेश मोकाशी यांनी लिहिलेलं आणि आनंद मोडक याचं संगीत असलेलं हे गाणंही खूप सुंदर आणि सुश्राव्य आहे. ते शास्त्र आणि मानवी मन किंवा आजचा माणूस यांच्यामधलं नातं दाखवत चित्रपट पुढे नेतं. चित्रपटगृहातून बाहेर पडताना दगड दगड म्हणतच आपण बाहेर पडतो. 

श्रीरंग महाजन, सायली भांडारकवठेकर, पुष्कर लोनारकर या लहान मुलांचा अभिनय चोख. या मुलांचे बोलके डोळे, चपखल पकडलेली भाषा, आवाजाचे चढउतार करत केलेली संवादांची देवाणघेवाण यामुळे चित्रपट बघताना आपला चेहरा सदैव हसरा राहतो. आणि या मुलांच्या निरागस अभिनयांना तोडीस तोड नंदिता धुरी आणि वनमाला किणीकर यांच्या आई आणि आज्जी अशा भूमिका बजावल्या आहेत. 

सध्याच्या समीक्षणातून समकालीन चित्रपटांविषयी समोर येणारं धक्कातंत्र या चित्रपटात नाही. चित्रपट पाहत असताना अखेरीस काय होईल याचा अंदाज आपल्याला सहजी बांधता येऊ शकतो पण तरीही ही सर्वसामान्य घरात घडलेली सरळ साधी सुटसुटीतपणे फुलत जाणारी कथा तितकीच भावते. 

अशा सगळ्या उत्तमोत्तम गोष्टींची मोट वळून आपल्या साध्या सरळ हाताळणीने मुलाचं ‘बालपण’ टिकवत, पंढरपूरचं ‘खरेपण’ सांभाळत, वारीचं ‘भारावलेपण’ अनुभवायला देत परेश मोकाशी एकदशीविशेष एक ‘शास्त्र’शुद्ध मेजवानीचं ताट आपल्या समोर मांडतात आणि आपण सगळेही तृप्त होऊन सुहास्यवदनी घरी जातो. 
'Shikshan Vivek' (December 2014)


टिप्पण्या

  1. आवडल्या गेलेलं आहे. और आन दो!

    Btw... 'हे सोप्पं करून सांगितलेलं शास्त्र'वरून आठवलं 'नसिरुद्दीन शाह'चं नाटक आलंय, Einstein नावाचं. मुख्य भूमिकेत अर्थातच नसिरुद्दीन शाह. रविवारच्या पुरवणीत त्यावर एक मस्त लेख आला होता. तो मिळेपर्यंत हे वाच - http://ncpamumbai.com/events-festivals.aspx?e=822&s=1363.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा