भारssत माssझा देssश आहे ....

माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रीणींनो,
रोजच्या रोज न चुकता आपण कित्येक प्रतिज्ञा करत असतो...त्यापैकीच एक भारssत माssझा देssश आहे ......अगदी सकाळी उठायला उशीर झाला की ...बास! मी उद्यापासून लवकर उठणार यार! किंवा शाळेत निघताना सायकलवर धुळीचा थर जमलेला दिसला की.. उद्याच्या उद्या सायकल स्वच्छ करणारे इथपासून ते ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ इथपर्यंत. पण आपल्या या प्रतिज्ञा कितपत यशस्वी किंवा अयशस्वी होतात ते आपणच तपासून बघायला हवं ना! आपल्या रोजच्या दिनक्रमात शाळेची सुरुवातच आपण प्रतिज्ञेपासून का बरं करत असू? निव्वळ पाठांतर एवढाच याचा हेतू आहे की मी या बोलांचं काही देणं लागतो याचा आपणकधीतरी विचार करायला हवा.
लहानग्या शिवबानं स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा घेतली. क्रांतिकारकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रतिज्ञा घेतली. पण या प्रतिज्ञा त्यानी नुसत्याच बोलण्यापर्यंतच मर्यादित ठेवल्या नाहीत तर त्यांनी कृती करून ती प्रतिज्ञा सार्थ करून दाखवली.
भारताचे नागरिक असणारे आपण सर्वजण १५ ऑगस्ट स्वातंत्रदिन म्हणून आणि २६ जानेवारी प्रजासत्ताकदिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरे करतो. वंदे मातरम्, आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्थानकी, सारे जहाँ से अच्छा हिदोस्ता हमारा यासारखी गीते पाठ करतो. त्या गीतांचं सामूहिक गायन करतो आणि उरला दिवस सुट्टी म्हणून मज्जेत घालवतो. आणि मग विडम्बनकारांना ‘भारत कधी कधी माझा देश आहे...’ यासारख्या कविता सुचू लागतात.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा देशानं स्वीकारला आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला. प्रत्येक सामान्य माणूस सत्ताधीश झाला. देशातल्या प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचं जतन करावं असा संकल्प करण्यात आला.
येत्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आपण जर भारताच्या संविधानात नमूद केलेली ही तत्त्व नक्की काय आहेत हे समजून घेऊन त्यापैकी एकतरी तत्त्व आपल्या अंगी बनवायचा प्रयत्न करूया का?
आपल्या देशात आपल्याला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे ‘स्वातंत्र्य’ आहे. आपण या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करतो का? ‘भाषण स्वातंत्र्य’ उपभोगताना जर काय बोलत आहोत याचा विचार सुदृढ असेल ते भाषणही निरोगी राहते. असा एखादा चांगला विचार आपण आपल्या मित्रमैत्रिणींना बोलून दाखवतो का आणि त्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करून कृती करतो का हे तपासून बघूया. जसं शाळा सुटली की आपला वर्ग स्वच्छ करून मगच वर्गातून बाहेर पडायचं हा विचार बोलून दाखवून खरोखरच जर आपले सगळेच मित्र यासाठी तयार झाले तर आपला वर्ग किती स्वच्छ राहील. आपला वर्ग हे जसं हक्काने म्हणतो तसंच तो वर्ग स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य आपण पार पाडू.
प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य आहेच पण त्या प्रत्येकाकडून समानता आणि बंधुता जोपासली जावी अशीही अपेक्षा आहे. बोलून बोलून गुळगुळीत आणि जवळचे वाटणारे हे शब्द पण अंगीकारणं मात्र कठीण असतं बरं का! बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीमध्ये एखाद्या दुर्बळ व्यक्तीला सहज बाजूला सारून आपण आत घुसतो. आपल्याकडे काम करायला येणाऱ्या बाईंना दार उघडतो आणि बंद करतो, त्यांच्याशी आपण संवादही साधत नाही. Facebook किंवा WhatsApp वर सकाळपासून रात्रीपर्यंत Good Day चा मारा करतो पण समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तोंडभर हसून शुभेच्छा देऊ शकत नाही. इस्त्रीसाठी कपडे घेऊन जाणारा काय किंवा रोजची भाजी विकणारा काय? आपण गिऱ्हाईक आहोत म्हणून अरेरावीची भाषा सहज करतो... पण या सर्वांशी कधीतरी ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे मनात जागं ठेवत संवाद साधतो का? जर असं केलं तर आपल्याला हवा असलेला दर्जा तर प्राप्त होईलच पण परस्परांना ‘माणूस’ म्हणून किमान आदर केल्याचं एक समाधानही  मिळेल.
याव्यतिरिक्त संविधानानं मांडलेलं सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हे मूल्य. कित्येकदा तत्व, मूल्य, हक्क, अधिकार, कर्तव्य किंवा अगदी संविधान, राज्यघटना हे शब्द मोठ्या माणसांसाठी आहेत आपल्यासाठी नाहीत अशी आपली ठाम समजूत असते. पण आपल्या नकळत आपण हे सगळे शब्द जगत असतो. विविध कारणांसाठी आपआपल्या पातळीवर न्याय मिळावा यासाठी धडपड करत असतो. कधी कोणी चोरी केल्याचे लक्षात आले तर त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवतो आणि त्याला योग्य तो धडा शिकवतो. वर्गातल्या सेक्रेटरीनं ‘हिटलरगिरी’ करू पाहिली तर त्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारतो. याच संस्कारामुळे आपण मोठे होऊन सुजाण नागरिक होऊ शकतो.

आपल्या देशावर दहशतवादी हल्ला झाला तर आपण प्रत्येकजण हळहळतो. मग आपल्या देशाचं आपण आपापल्या परिनं संरक्षण कसं करणार? आपण सर्वांनी जाणीवपूर्वक एक जागरूक नागरिक होण्याचा प्रयत्न केला तर ... केवळ तर आणि तरच... ‘माझा देश आणि माझे देशबांधव त्यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझे सौख्य सामावले आहे’ या आपल्या प्रतिज्ञेला खरा अर्थ राहील.

'Shikshan Vivek' (January 2015)

टिप्पण्या