नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.....

(सकाळची वेळ. एका घरात आजी झाडांना पाणी घालतेय. एकीकडे तोंडानं काहीतरी स्तोत्र पुटपुटणं चालू आहे. शेजारच्या पलंगावर तिची नात गाढ झोपलेली आहे. आजीचं काम होतं आणि न राहवून ती तिच्या नातीला हाक मारते)

आज्जी: रमा, उठ आता ...खूप उशीर झाला हं..
रमा: हं...
आज्जी: निदान आजच्या दिवशी तरी लवकर उठावं...आवरावं...छान सगळ्यांनी मिळून                    जेवावं..नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी नवीन करावं...
रमा: (कसेबसे डोळे चोळत) हो गं आजी, रोजचंच असतं तुझं..
आजी: रोज असतो होय पाडवा?
रमा: (आता मात्र गडबडीने उठून उभीच राहते) काय सांगतेस काय? परत आला पण पाडवा...? खंरच      आहे गं तू म्हणत असतेस नं नेहमी...काय दिवस धावतायत नुसते...खरंच....
आजी: परत आला? म्हणजे हे काय आता नवीन?
रमा: नवीन कसला? दिवाळी आत्ता आत्ता तर संपतेय ...आणि लगेचच नाही का आला?
आजी: आता मात्र कमाल झाली हं तुझी...मी गुढीपाडव्याविषयी बोलतेय...आज वर्षाचा पहिला             दिवस....निदान आज तरी उठ की लवकर....
रमा: ओह..हं ..हो ठीके ठीके...
(निवांत उठून आवरायला निघून जाते. ब्रश हातात घेउनच घरभर फेरी मारते...आईचा स्वयंपाक चालू झालेला असतो...मस्त श्रीखंड पुरीचा बेत..आहा ...बाबांची पूजा होऊन त्यांची गुढी बांधायची जुळवाजुळव चालू असते...आपल्याला जरा जास्तच उशीर झालाय आणि आजी त्या मानाने कमीच रागावली आहे हे ध्यानात घेत रमा पटापट आवरूनच आजीसमोर जाते.)
आजी: धन्य: सकाळची उन्हं ओसरायची वेळ आली आणि तुमचं अभ्यंगस्नान होतय अजून....
रमा: ए आजी, काय गं.. तुझा एवढा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्यावर रागावून कशाला       सुरुवात करतेयस दिवसाची?
आजी: माझं नवीन वर्ष? खरंच गं बाई...तुमचा तो सीझर जानेवारीपासून वर्षाची सुरुवात करून गेलाय       आणि भोगतोय आजन्म ३१ डिसेंबरचा धांगडधिंगा...
रमा: (हळूच हसत) ए हे काय गं...त्या गोऱ्या इंग्रजाचा राग उगीच ज्युलियस सीझरवर कशाला          काढतेयस? त्यानं जानेवारी १ पासून वर्षाची सुरुवात काय केली...आज अख्खं जग वेळेच्या          आखीवरेखीव कोष्टकात बांधलं गेलं...
आजी: राग त्याचा नाहीच...तुमचा येतो...तुम्हा पोरांना चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे पाडवा हे ध्यानात        येत नाही पण १ जानेवारीसाठी १ डिसेंबरपासून तयारी चालू होते तुमची...
रमा: हो मग ...रोजच्या आयुष्यात आम्ही तेच कॅलेंडर वापरतो...हे चैत्र वैशाख वगरे मंडळी कधी         येतात कधी जातात कळत पण नाही आम्हाला...
आजी: तेही खरंच म्हणा...पण आपले हे मराठी महिने आहेत ना ते निसर्गाला जोडलेले आहेत..            आपला हा पहिला महिना ..चैत्र..वसंत ऋतूचं मोठं लोभसवाणं रूप घेउन येतो... सारी झाडं         नव्या पालवीनं सजलेली...फुलत असतात..फळत असतात....पक्ष्यांची आनंदी गीतं ऐकू  येत         असतात...प्रसन्नता...नवलाई...नवचैतन्य घेउन येणारा हा रूपरसगंधमय मास असतो. म्हणून तर     आपण नव्या वर्षाची सुरुवात या दिवसापासून करतो. देवांची, गुरुंची पूजा करतो. येतं वर्ष सुख,     समृद्ध आणि आरोग्याचं जावं म्हणून प्रार्थना करतो.
रमा: (गुढीला नमस्कार करते आणि विचारते) आणि आजी, ही गुढी?
आजी: ब्रह्मध्वजाय नम: ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद |
      प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू |
     रमा, ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली आणि ती सृष्टी जिवंत झाली ती याच दिवसापासून.      ब्रह्मध्वज म्हणजेच ही गुढी...जी आपण आपल्या आनंदाचं, उत्साहाचं प्रतिक म्हणून घरोघर        उभारतो. अगं शिवाजी महाराजांनी सुद्धा या विजयध्वज म्हणून ही गुढी उभारली होती माहित      आहे?
रमा: आहा: किती अर्थपूर्ण कृती असतात न या सगळ्या....नाहीतर आम्ही काय केवळ सगळे करतात     तसं नवं वर्ष साजरं करायचं म्हणून केक आणतो....त्या नव्या वर्षाची वाट बघत रात्री बारा         वाजेपर्यंत जागतो..केक खातो आणि नव्या दिवसाची सुरुवात मात्र झोपेनं करतो...किती हे           विरोधाभास?
आजी: हं...आत्ता प्रकाश पडलाय रे सूर्यनारायणा तुझा ....(असं म्हणत रमाच्या हातात कडूनिंबाची          चटणी ठेवते)
रमा: ए ए आजी...तुझं आत्तापर्यंत सांगितलेलं एक न एक वाक्य मला पटलय..पण प्लीज....             (हातातल्या चटणीकडे बोट दाखवून...ती ते खाणार नसल्याचा अविर्भाव व्यक्त करते)
आजी: काहीही कारण नकोय...अगं हा कडूनिंब रोगशांती करणारा...कायमचं याचं सेवन म्हणजे             व्याधींचा नाश...
रमा: बघ हं....सगळे ते जीम, न्युट्रीशनिस्ट, डायटीटिक्स लोकांची छुट्टी झाली पाहिजे बरं का....
आजी: बघच आता तू...अगदी तमाम सगळ्यांची छुट्टी....चला...आता देवाला नमस्कार करून नवीन        एखादा संकल्प करून कामाला लागा...काय गं तुमचं ते resolution की काय ना ते ...
रमा: हो हो करणार न...पण त्याआधी अतिशय महत्त्वाचं काम...(आजीला वाकून नमस्कार करते         आणि म्हणते) आजी गं, तुलासुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.....नवं वर्ष सुखाचं,           समाधानचं, आनंदाचं, आणि आरोग्याचं असावं यासाठी...
(आजीला खूप आनंद होतो. आजी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला आशीर्वाद देते.)
                                                                                                                             (Shikshanvivek  march 2015)

टिप्पण्या