आता बघच तू......

(रविवारचा दिवस, सिद्धार्थ आणि त्याचे आई-बाबा दिवाणखान्यात बसलेले आहेत. आई-बाबा एकीकडे चहाचा एक घोट घेत दुसरीकडे पेपरची पान चाळत आहेत. सिद्धार्थ टीव्ही बघत बसलेला आहे.)
सिद्धार्थ: अहाहा ...what a life!!!

आई: का काय झालं विशेष?

सिद्धार्थ: रात्री एक movie बघितलाय, सकाळी सकाळी टीव्ही लाऊन बसलोय ..आणि तरीही तू ..उठ..आवर...आंघोळ कर ..किती उशीर.....आणि अभ्यासाला बस यातलं काहीही म्हणालेली नाहीयेस...सुख!!!!
आई: धन्य...(तेवढ्यात आतल्या खोलीतून टेलीफोनची रिंग ऐकू येते...सिद्धार्थ फोन घेतो..आणि बोलून लगेचच परत येतो.) मग किती वाजता निघणार आहेस वेळेवर सांग म्हणजे तुला पोह्यांसाठी धरणार... निघालाच असलास तर ...?

सिद्धार्थ: काय..काय किती वाजता...मी खाणारे पोहे ...

आई: नाही त्या गोरेचा फोन आला होता...badmintonचं court बुक केलंय...आता बघ कसा पटापट
आवरशील....ब्रह्मदेवाचा फोन आल्यावर....

सिद्धार्थ: काही हं असं काही नाही....ब्रह्मदेव म्हणे...दोस्त आहे तो आपला...आणि court मीच बुक करायला सांगितलेलं त्याला....

(आई आत निघून जाते....सिद्धार्थ हळूच बाबाकडे जात म्हणतो.)
सिद्धार्थ: तुम्हाला कळलं का हो कोणाचा फोन होता ते ...?

बाबा: (हसट हसत) हो... हिने सांगितलं तेव्हा...

सिद्धार्थ: danger lady...माझ्या मित्रांनी sharp ear नाव ठेवलय तिचं माहितीये? जरा मी timepass करताना दिसलो की बडबड सुरु ...सकाळपासून जी गाडी सुरु होते...

बाबा: ए शहाण्या...तिला पुढच्या कामाचे वेध लागलेले असतात ..आता तुझ्या सतत मागे लावावं लागलं की
वैतागत असेल ती...
(तेवढ्यात आई हातात भाजीची पिशवी घेउन बाहेर पडताना दिसते...सिद्धार्थ जागेवरूनच ओरडतो)

सिद्धार्थ: तू भाजी आणायला निघाली आहेस का...तर घ ..भ...म वाल्या कुठल्याही भाज्या आणू नकोस...
आई: हे काय नाटक आहे आता?

सिद्धार्थ: घेवडे,भोपळे,...मुळा..मेथ्या...आणि इतर..शाळेत तू शिस्त या नावाखाली ज्या खपवत असतेस न त्या सगळ्या...

आई: ही ‘नको’ ची इतकी मोठी list असेल तर तूच आण तुला हव्या त्या...ही पिशवी आणि हे पैसे...

सिद्धार्थ: (अचानक आलेल्या संकटाला सामोर जात) हो दे की,...मी काय घाबरतो का...मग नीट कळतात कशा आणायच्या भाज्या....

आई: आणि त्या नेहमीच्या फळवाल्या आज्जी आहेत न....त्यांच्याकडून फळं पण आण...

सिद्धार्थ: बर

आई: बर काय? कुठली आणशील?

सिद्धार्थ: ठरलेला criterion आहे माझा....सारख्या बिया तोंडात येतात ..सालं खावी लागतात ...आणि कच्ची की पक्की हे हात न लावता कळत नाही ....ज्या फळांपासून एकही चांगली दिसणारी dish बनत नाही....असली बोअरिंग फळ अजिबात आणणार नाहीये मी.

आई: या तुझ्या वर्णनानंतर फक्त आंबा उरतो...त्यामुळे तू असं काहीही करणार नाहीयेस....त्यांच्याकडे खूप वेगवेगळी फळ आहेत..

सिद्धार्थ: कलिंगड,टरबूज,खरबूज, पपई तर अशक्य...इतक्या बिया..बुळबुळीत ..चिकट..सगळीकडे पाणी गळणार ..आणि एवढसं खायला कितीतरी वेळ जातो..sorry ते cancel...द्राक्ष आणतो...लीची, किवी,स्ट्रॉबेरी ...नावच बघ कशी Glamorous आहेत ...ती आणतो

आई: काय वागतोयस? glamour मधून काय vitamin मिळणारेत?

सिद्धार्थ: आई प्लीज..मी ती melon family अजिबात आणणार नाहीये ..(म्हणतच बाहेर जायला निघतो)

आई: अरे का ते तर ऐक...उन्हाळा आहे ..त्या फळामध्ये पाणी असत..ज्याची शरीराला प्रचंड गरज असते...शक्ती...उत्साह टिकून राहतो..vitamin A, vitamin C खावं या दिवसात ...

सिद्धार्थ: ok..मग त्या आज्जीना सांगतो ..थोडा vitamin A, vitamin C....potassium, iron द्या....

आई: वेड्यासारखं बोलू नको....शांतपणे ऐक तर काय म्हणतेय ते...कलिंगड, टरबूज यात vitamins असतातच ,पाण्याचा अंश अधिक असतो...energy आणि immunity ची औषधं घ्यावी लागत नाहीत...त्वचा उत्तम राहते ...sunscreen च्या मागे धावावं लागत नाही .. किवी,स्ट्रॉबेरी आण पण glamorous नावं आहेत...परदेशी डिशेसमध्ये असतात म्हणून नाही तर त्यात vitamins आहेत iron आहे म्हणून आण ...आंबा पण या सर्व गुणांनी युक्त असाच आहे...ही सगळी फळं या ऋतूमध्ये ताजी मिळतात म्हणून ती आणूया असा विचार कर की ..

सिद्धार्थ: बापरे! फळं आणतानासुद्धा विचार करावा लागणारे का ...मला वाटलं होत जरा निवांत काम असेल....

आई: तेच तर सांगायचा प्रयत्न करतेय न...डोकं जर शांत आणि शरीर ताजतवानं ठेवायचं असेल न प्रत्येक ऋतूत मिळणारी  जी फळं असतात ती खावी ...त्यातून आपल्या शरीरच संतुलन सांभाळायला मदत होते.

सिद्धार्थ: जशी तुमची आज्ञा...मातोश्री!!!

आई: हं आज्ञा म्हणे...तरी आवळा, कोकम, फणसाचे गरे ..हे मी बाहेर पडले की आणीन...

सिद्धार्थ: हे पण आहेच का अजून?

आई: आहेत म्हणजे...अरे या सगळ्या उन्हाळ्यातल्या फळांची आंबटगोड सरबतं पिण्यासाठी तर तू तयार असतोस..शिवाय त्याची jam आणि jelly किती सुंदर होते आणि टिकतेही पुष्कळ काळ....त्यांचे औषधी गुणधर्म तरी लक्षात ठेव...असो सध्या, तू फक्त दोन भाज्या आणि दोन फळं नीट बघून घेउन ये .....

सिद्धार्थ: माहिती आहे गं.....आहा आवळ्याचं, कोकमचं सरबत आत्ताच तोंडाला पाणी सुटतंय पन्ह, कैरीची चटणी, कैरीची डाळ......

आई: चल ये आता लवकर

सिद्धार्थ: ..हो हो ....अशी मस्त मस्त फळ आणतो न....आता बघच तू!!!!

(सिद्धार्थ एखाद्या युद्धावर निघाल्यासारखा भाज्या आणि फळांच्या गाडीकडे निघतो, घरात आईच्या चेहऱ्यावर हसू आणि काळजी एकाचवेळी तरळून जाते)

टिप्पण्या