कुठे जातोय आम्ही ....

गेल्या आठवड्यात whats app वर सुगरण नावाचा एक लेख वाचनात आला. लेखिका अज्ञात. साधारण सारांश असा की हल्लीच्या मुलींनी स्वयंपाक करता येत नाही याविषयी त्यांना काहीही वाटत नाही आणि उलट त्या; ज्या बायका घरी जेवण बनवतात त्यांच्याविषयी आश्चर्य व्यक्त करतात. तर यात काही कौतुकास्पद गोष्ट नाही. हल्लीच्या मुलींनी स्वयंपाक शिकायला हवा.
वाचून खरं तर आश्चर्य वाटलं. अजूनही मुलींनी स्वयंपाक शिकायला हवा, त्या एकमेकींना याबाबत कमी अधिक लेखतात, आपल्या नंतर आपल्या मुलांना हातची माया कशी काय समजणार जर आपण त्यांना जेवायलाच घालू शकत नसू तर? हे सगळे प्रश्न आजही पडताहेत. आपण कुठेतरी पुन्हा मागे जातोय का? स्वयंपाक आला म्हणजे सगळं काही आलं आणि तुला येत नाही म्हणजे तू चांगली आई किंवा आज्जी होऊच शकत नाहीस...हा विचार खूप बिचारा वाटला मला.  
बाजू कुठलीच योग्य किंवा अयोग्य असू शकत नाही त्यामुळे तटस्थ राहून या मुद्द्यावर विचार करायला सुरुवात केली...वाटलं, लग्नापूर्वी आजच्या कित्येक मुलींना स्वयंपाकघरात फक्त जेवायला जाऊन माहित असतं, तेव्हा त्यांचे आईवडील त्यांना मुद्दाम त्या कामापासून दूर ठेवत असतील असं मला वाटत नाही. कोणी आजकालची नोकरी करत करत घर सांभाळणारी व्यक्ती ठरवून आपण स्वयंपाक करायचाच नाही असं करत असेल असंही वाटत नाही. बहुधा या गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असाव्यात.
स्वयंपाक रोजच्या रोज करणे, तो करता येणे, तो चांगल्या चवीचा करता येणे आणि तो करायची आवड असणे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग या सगळ्यांना एकाच तराजूत कसे तोलणार? प्रत्येक माणसाची स्वतःकडून असणारी अपेक्षा वेगळी असते. कोणाला स्वयंपाक आणि घर हे विश्व वाटतं. कोणाला हे सोडून जगात खूप काही आहे असं वाटत असत तर कोणी या दोन्हीची कसरत करत तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. तर मग या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या त्याच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत घर आकार घेत असत यात स्पर्धा असल्याने फक्त कलह किंवा आत्मस्तुती मिळवता येऊ शकते.
त्यामुळे ‘सुगरण’ जे त्या लेखाच्या नुसार जी आहे त्या पदार्थात चविष्ट जेवण बनवू शकते ती राहते बाजूला आणि स्वयंपाक प्रत्येक बाईला यायलाच हवा हा विचित्र मुद्दा बाहेर येतो. राहता राहिला प्रश्न हॉटेलमध्ये जाऊन खाणाऱ्या बायकांची संख्या अधिक असा मुद्दा असेल तर स्वतः कष्ट न करता आयतं जेवायला मिळत असेल तर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला ते पचू शकतं यासाठी बाई किंवा पुरुष यात फरक नाही आणि जर कोणाचं असं म्हणणं किंवा वागणं असेल की ते घरचा डबा घेऊन हॉटेलात इतरांना सोबत म्हणून जेवायला जातात तर ते खोटं वागून इतरांना फसवत असतात आणि स्वतःला दुःखात ठेवण्यातच ते समाधान मानतात.
हं आणि हातची माया किंवा आपल्या मुलाबाळांना आपली आठवण ही फक्त जेवणाच्या पदार्थांमुळे मनात राहते हा गैरसमज असावा ..आपली आई किंवा आज्जी त्याहून खूप काही जास्त आपल्याला देत असते.

लिहिणेचा हेतू ज्यांना स्वयंपाक येत नाही त्या थोर आहेत हा नसून त्यांना ते नाही तर दुसरं काहीतरी येत असणार हा बघणाऱ्याचा दृष्टीकोन हवा...हा आणि इतकाच!

टिप्पण्या

  1. Avadla article! Even though i did not understand few words 😊 Unfortunately humans tend to stereotype a lot, and it is upto each one of us to not judge ourselves based on others' stereotypes and also, not judge others based on our stereotypes ( and also try to reduce them in first place).
    -neha

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा