स्थिरावत चाललेले बदल

काही दिवसांपूर्वी भारतातून साता समुद्रापार वगैरे म्हणतात तसा जाण्याचा योग आला...खरे दोन समुद्र बघायला मिळाले...असो...मुद्दा असा की अगदी तयारी सुरु झाली तेव्हापासूनच बदल डोक्यात आणि अंगात भिनायला सुरुवात झाली...त्यासाठी नेमक्या वस्तू, ब्यागा, त्यांची वजनं, तिकीट, कार्ड ई ची घोकंपट्टी हे लौकिक आणि  मनात वाटत काय होतं हा एक अलैकिक बदल अनुभवत होते. यापूर्वी का प्रवास केला नाहीये ..२ -७ १५ ते चांगली २ वर्ष अगदी जवळच्या गडावर, गावाला किंवा दुसऱ्या राज्यात राहून आलोय. मग साधी bag भरणे ही घटना का व्हावी...पण हो ...ती होती कारण त्यात ठराविक गोष्टी ठेवता येतात ..हो पण ती ती दुसरी वस्तू must आहे माझ्यासाठी ..पण त्या देशात चालत नाही ती bag मधून नेलेली. अरे बापरे! म्हणजे माणसानी स्वतःच्या गरजांपासूनच तडजोड करायची तर...पण या सगळ्या गोष्टी process, safety, organized activity ई. च्या नावाखाली तंतोतंत पाळत केल्या गेल्या.
झालं....स्थलांतर झालं ...जागा बदलली, हवा बदलली, आजूबाजूची माणसं बदलली,...’जमीन आणि आकाश मात्र स्थिर होतं’ त्याची ओळख अजूनही जुन्यासारखीच होती. वेळ काय धावत असतेच. हळूहळू आजूबाजूच्या कित्येक गोष्टी, वस्तू, भाषा सगळे बदल अनुभवत घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत गेले....हातातला रुमाल जाऊन त्याच्याजागी tissue paper आले, कापडी पिशवी प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरून गेली, कुलूप किती दिवस झाले दिसलच नाहीये...फक्त किल्ली latchची, जमिनीवर फरशी नाही कार्पेट आहे, बाहेर फुटपाथ आहे पण त्यावर फूट क्वचितच दिसतात, रस्त्यावरून जाणाऱ्यायेणाऱ्या अनंत गाड्या दिसतात पण कोणत्या हे वाचायच्या आत समोरून लांब कुठे तरी पोहोचलेल्या असतात, जिकडेतिकडे कचरापेट्या असतात आणि वेळेवर त्या स्वच्छ होतात त्यामुळे कचरा हा पेटीच्या आतच दिसतो, खूप वेगवेगळ्या apartments आहेत, खूप घरे आहेत, खूप पार्किंगची जागा आहे त्यामुळे काहीच पार्किंगच्या प्रश्नामुळे विस्कळीत झालेलं दिसत नाही, पार्किंग मध्ये खेळणारी मुलं नाहीत, आजीआजोबांचे कट्टे नाहीत, इथली लहान मुलंही मोठीच असतात की काय ...त्यांचे भोकाड पसरून रडणे नाही, वाण्याच्या दुकानांना walmart च्या रुपात बघून कमाल वाटते आणि सगळं organized सुटसुटीत सुसूत्र होताना दिसतं.
चालत रस्ता क्रॉस करत असू, तर विशिष्ट जागेवरून तसं करावं लागतं...समोरच जायचं आहे ..केला रस्ता वाट्टेल तिथून क्रॉस असं करून चालत नाही...यामुळे तुमची समोरूनच जात असलेली बस miss होऊ शकते..इथे ओ काका ओ काका ..थांबा थांबा असं म्हणत लोंबकळत बस मध्ये जागा मिळवता येत नाही. बस stop वर थांबते तुम्ही तिथे असाल तर तुम्हाला घेते नाहीतर वेळ झाली की निघून जाते, आत जाऊन बसलात की तुम्हाला ज्या stop वर उतरायचं आहे तिथे दोरी स्वतःच खेचावी लागते..आणि अर्थात गंमत म्हणून कोणीच त्या दोरीशी खेळताना दिसत नाही. वाहन, वाहतूक यासारख्या गोष्टी वापरताना लोक वाहतुकीचे नियम कोळून पिउन मग त्याचा वापर करत असावेत. भारतासारख्या वाहतुकीतून जे शिकायचं राहून गेलं असेल ते सारं इथे शिकायला मिळू शकतं.
नियम नुसत्या वस्तूंसाठी, त्या वस्तूंच्या वापरासाठी आहेत असं नाही इथे त्याचं जीवनही नियमित आहे..आणि ते दिसून येतं त्यांच्या साध्याशा वागण्यातून ...इथे प्रत्येकजण दुसऱ्याला प्रतिसाद देतो..मान हलवून, हसून, तर काही वेळा goodafternoon goodmorning म्हणून ....बापरे! ...आपण पुण्यातून आलो असू तर ओळखीच्या लोकांना तरी आपण हा प्रतिसाद देतो का प्रश्न पडावा आणि इथे लोकं चक्क अनोळखी लोकांशी असे वागतात....आपल्याला mannersचा सणसणीत धडा मिळतो. भाषा कळवून घेण्यासाठी तोंड आणि कान कमी पडले तरी डोळे, आणि दोन्ही हात मदत करत खाणाखुणा करून वेळ मारून नेता येते...अशी असंख्य स्थित्यंतर सतत घडत असतात. 
हे सगळं जरी बदलत असलं तरी माणसाचं मन, त्याच्या सवयी, त्याच्या काळज्या, त्याचा स्वभाव आणि त्याची माणसं ..ती मात्र स्थिर असत्तात. पाय कुठल्याशा ‘villae’चा रस्ता तुडवत असले तरी मनातला टिळक रोड जात नाही, soft drink फुकट वाटलं तरी पाण्याशिवाय तहान भागत नाही, तिकडे राखीव जागांमुळे त्रस्त झालेला माणूस इथे त्याच राखीव जागांसाठी कागद गोळा करण्यात आयुष्य पणाला लावतो, दाराबाहेरचा खुट्ट आवाज त्याला अस्वस्थ करतो, श्रीखंडासाठी इथल्या दह्याचा चक्का कसा होईल आणि मिल्क पावडरीचे गुलाबजाम बरे लागतील का हे प्रश्न काही केल्या त्याला झोपू देत नाहीत.  पण इंटरनेट नावाच्या देवाने डोक्यावर हात ठेवलेला असल्याने तो त्याच्या आईबाबा, ताईदादा आणि दोस्त मंडळींशी दृश्य संपर्क साधू शकतो आणि तात्पुरता का होईना आनंदी राहू शकतो.

टिप्पण्या

  1. बदल सातत्याने व्हायला लागले की त्या बदलांची सवय होते..या सवयीला रूळणे असे म्हणायला हरकत नाही...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा