पाळीव ..छे:..पालीव प्राणी !

जगात किती वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघायला मिळतात; प्राण्यांना पाळणारे, त्यांना सर्कशीत अथवा संग्रहालयात ठेवणारे किंवा त्यांना घाबरणारे आणि त्यांना संग्रहालयात बघून फुशारक्या मारणारे. प्राण्यांना खाणारे...आपण या लेखापुरते जरा बाजूला ठेउया.
     मला कित्येकदा प्रश्न पडतो ... मुद्दाम कुत्री, मांजर, ससे, कासवं, मासे, कीटक, असे प्राणी पाळणारे लोकं नक्की काय करतात? ok पाळला एक प्राणी; पुढे काय? त्या प्राण्यांना भूक तहान लागेल तेव्हा खायला घालतात, त्यांच्याशी खेळतात, फिरायला नेतात, लहान मुलांसारखी त्यांची बडदास्त ठेवतात, त्यांचे फोटो काढतात, त्यांची कौतुकं करतात .. ठीक..पुढे काय? ते लोकं म्हणतील आता अजून काय करायचं असतं? तेही खरंच म्हणा ... पण कधी कधी वाटतं ...पूर्वी चंपक मासिकात असायच्या न गोष्टी; लंपू माकड आणि टोपू बेडूक याचं भांडण किंवा गबडू कासव आणि चमकू ससा यांची प्रसिध्द शर्यत असल्या गोष्टी फावल्या वेळात घरातल्या घरात फक्कीने रेघाबिघा आखून मैदान तयार करून देणे असलंसुद्धा काही करतात की काय? ...करोत बापुडे ...आम्ही आपले सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणत संग्रहालयातील प्राणी बघण्यातच धन्यता मानतो झालं. ...बरोबर! आम्ही मोडतो वरीलपैकी प्रकार दोन मध्ये ..साक्षात भित्रट आणि अवर्णनीय फुशारक्या मारत प्राणी संग्रहालयाला वर्षागणिक चार भेटी देत प्राण्यांवर हवे ते भाष्य करायला मोकाट सुटलेले दिग्गज!
     पण! हा पण माणसाला आयुष्यात कधी सुखानं जगू देईल तर शपथ! आम्ही सहसा पाळीव प्राणी पाळणाऱ्या मानवी प्राण्यांपासूनसुद्धा दूर राहतो, रस्त्यावरून कुत्री येताना दिसली की ताबडतोब रस्ता क्रॉस करतो, मांजर या प्राण्याचा वासही सहन न करू शकणारे आम्ही सहवास कुठले करतोय? घरात झुरळ नावाची असामी दिसली की साधारण शेजारच्या दोन घरांपर्यंत आमची किंचाळी ऐकू जाऊ शकते, घरात उंदीर असू शकतो असा संशय जरी आला तरी आम्ही रात्री झोपताना ऑक्सिजनसाठी किंचित जागा सोडत पांघरुणात लपून बसतो. असल्या भेदरलेल्या जीवाला जर पाल हा तुझा पाळीव प्राणी असणार आहे असं कोणी सांगितलं तर काय अवस्था होईल त्याची? तसलीच दयनीय अवस्था माझी झाली... जेव्हा मला माझी ही सरपटणारी मैत्रिण पहिल्यांदा भेटली....माझा हा मैत्रिण शब्द किती केविलवाणा आहे हे माझं मलाच ठाऊक. पण काही नाती ही न मागता मिळतात त्यातलच हे एक.
Brown anole Video 
     जागा आहे फ्लोरिडा नावाचा समशीतोष्ण कटीबंधीय प्रदेश. येथील वातावरण आणि वनस्पती यांमुळे मातकट रंगाची पालींची एक जात (Brown Anole) ही बेफाम वाढत चालेलेली आहे. इथे अगदी काही तासांसाठी आलेला पर्यटकसुद्धा या पालीशी सामना करतोच. कारण या पाली रस्त्यावर, फुटपाथवर, घराबाहेरच्या कुंपणावर, झुडपांत चक्क नुसत्या बसून असतात.
या पाली खरं तर समुद्रापलीकडून इकडे आलेल्या आहेत बरं का...म्हणजे जेव्हा अमेरिकेत किनारपट्टी विकसित होत गेली आणि ब्रिटीश व्यापारी प्रवेश करते झाले साधारण त्या सुमारास; या जातीची संख्या वाढू लागली. ब्रिटिशांनी तरी कुठे कुठे न काय काय नेलेलं आहे नि आणलेलं आहे ब्रिटिशांनाच माहित, असो! तर आज ती ६-७ इंच लांबीची लहानशी सरपटणारी पालींची जात इतकी प्रचंड संख्येने वाढलेली आहे की तिने पूर्वापार इथे वास्तव्य करणाऱ्या एका पालीच्या जातीलाही (Green Anole) मागे टाकलेलं आहे. या जाती वेगळ्या अशा की यातली जी पूर्वीची जात आहे, हिरव्या पालींची; ती अजूनही जंगलात राहते, उंच झाडाच्या बुंध्यावर आढळून येते, काही वेळा रंग बदलणाऱ्या सरड्याशी हिची तुलना करता येउ शकते. तर दुसरी मातकट पाल साक्षात उघड उघड जमिनीवर दिसून येते. त्यांचा धीटपणा तर काय वर्णावा, त्या आपल्याला घरापासून ते इष्ट स्थळापर्यंत आपल्या पावलावर पाउल ठेवत साथ करतात. कुठूनही कधीही उडी मारत आपले डोळे चपापून टाकतात, सकाळ संध्याकाळ पानापानातून सळसळ करीत उनाडत अविरत भटकत असतात. दोन बाजूनी फिकट मातकट आणि पाठीवर गडद मात्तीचा रंग परिधान केलेल्या या पाली माना वर करकरून सावधतेचा इशारा देत आपापल्या जागांची अखंड टेहळणी करीत असतात तर कधी मानेखालचा पंखा पसरवत आपल्या मर्दुमकीची घोषणा देत असतात. थंड रक्ताच्या या पाली जेव्हा एखाद्या किटकावर तुटून पडतात तेव्हा त्यांच्या मूळ सरपटणाऱ्या वंशाचं त्या प्रतिनिधित्व करत असतात असं वाटतं. अवघं सहा का सात वर्षाचं, शेपूट असलेलं नसलेलं सद्रूप विद्रूप जसं असेल तसं आयुष्य जगतात तेही कसं तर एखाद्या भूखंडावर राज्य करणाऱ्या राजासारखं!
        असा कितीही पालमहिमा गायला तरी किळस आणि शिसारी येण्यासाठीच की काय तो या पालींचा जन्म असं वाटल्यावाचून राहत नाही. कधीकधी वाटतं चालता चालता पायात आली की एखादी तरी चिरडता येईल पण त्याचक्षणी आपली चपळाई कमी पडल्याची जाणीव होते आणि दुसऱ्याच क्षणी त्या साहसाच्या नुसत्या विचाराने वाढलेली धडधड दडपणाच्या एका हुश्श: चा श्वास घेउन पुढे सरपटती होते.

टिप्पण्या