जित्याची खोड ....दुसरं काय ....

कसं आहे ना... एखादी नवी गोष्ट केली ...समजा नवं पुस्तक वाचलं, नवीन नाटक पाहिलं, सिनेमा बघितला, ते अगदी नवीन जागा बघितली....की त्या अनुभवाचा पार चेंदामेंदा करून चर्चा करकरून भुस्कुटं पडेपर्यंत परीक्षण, विश्लेषण करायची सवय असते काहींना.....जित्याची खोड हो दुसरं काही नाही ... तर त्या स्वभावाला अनुसरून गेली काही वर्षे ज्यांचे ब्लॉग्स वाचून माझ्या स्वयंपाकघराची चूल पेटत आली आहे त्या समस्त सुगरण संप्रदायाच्या आशीर्वादाने मी सुद्धा आज एक पाककृती लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.
पदार्थाचे नाव : खमंग कुरकुरीत पाककलेचा ब्लॉग
साहित्य : पर्सनल कम्प्युटर - १
                कुठल्याशा साईटवर ब्लॉग अकाऊंट - १
                microsoft word चे ज्ञान - बेसिक
                स्वतःच्या पाककृतीवर विश्वास - तुडुंब
                पाककृतीचे फोटो - घरी कॅमेरा असेल तर स्वतः काढा, नाहीतर इतर साईटवर मिळवा.
कृती : १. प्रथम word file मध्ये एखाद्या पदार्थाची खमंग पाककृती लिहावी.
२. त्या पाककृतीमध्ये फोटो, तसेच पदार्थातील बदल उदा, भारतीय लाडूचे इटालीयन डेझर्ट, यासारखे विलोभनीय घटक घालून ती कृती भाजून घ्यावी. असे न केल्यास ती कच्ची राहू शकेल व हवा असलेला वाचकवर्ग तुमच्यापर्यंत नाही.
३. आता ही खुसखुशीत पाककृती तुम्ही ब्लॉगच्या प्लेटवर सर्व्ह करा. तुमच्याकडे थोडेफार इंटरनेट वापरण्याचे ज्ञान आणि डेकोरेशन स्किल्स असतील तर त्यासारखी मजा नाही.
टीप :  १. एकच कृती लिहून थांबू नका, किमान १००, गोड-तिखट वेगवेगळ्या चवींच्या कृती     लिहा.
२. तुम्हाला जेवढे वाचक हवे आहेत त्याप्रमाणे भाषेची निवड करा. तुम्हाला येत नसेल तर google translate वापरा.
          ३. या पद्धतीने कृती लिहिलेला ब्लॉग सहसा फसत नाही.

लेबल्स: पाककृती, recipe, खमंग, कुरकुरीत, tasty, tangy, ब्लॉग, blog

चला...खूप कष्ट पडतात राव....आणि किती creative आहे हे....बापरे ..रोज एक पदार्थ करायचा..त्याची कृती लिहून हे हे एवढं सगळं करायचं...त्या ब्लॉगची लिंक जमेल त्या त्या मित्रमैत्रिणीना पाठवून भंडावून सोडायचं ..प्रचंड कष्ट!
असो...कळावे...लोभ असावा.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या ब्लॉग्सशिवाय कित्येकांचं जेवण तयार होऊ शकत नाही. पण हे असे तोंडाला पाणी सुटेल असे फोटो आणि कृती यातून डोळे न् मन प्रसन्न होतं हो..पण त्या पदार्थाचा दरवळ आणि पोटात पेटलेला जठराग्नी यांच्यासाठी मात्र त्या ब्लॉगला प्रमाण मानून प्रामाणिक कष्ट घ्यावे लागतात. 


टिप्पण्या