नावातली गंमत

नाव, नावात काय असतं... असं म्हटलं तरीही नावात बरंच काही असतं राव.. असं कसं? तेवढी एकच तर गोष्ट आहे जी आपण जन्मापासून मरेपर्यंत आपली म्हणून सांगतो, बाळगतो, ओझं म्हणून वाहतो किंवा मुकुट म्हणून मिरवतो. ते कधी ओळख होतं..हवीहवीशी, नकोनकोशी, कधी एखाद्या स्पर्धेतला विजय होतं तर कधी पराजय, कधीतरी असतं नुसतं नातं अगदी जवळचं तर कधी एखादं अगम्य अक्षर फक्त...
आपण जन्माला आल्यानंतर खरंच कशावरून ठरत असेल आपलं नाव? ‘बाळाचे पाय पाळण्यात’ प्रमाणे रूप, रंग, गुण किंवा त्या बाळाच्या येण्यापूर्वी किंवा नंतर त्यांच्या पालकांच्या जाणीवात झालेले बदल यावरून ठरत असेल कदाचित. मी माझ्या मुलाचं नाव युधिष्ठीर ठेवणार असं म्हणणारी एखादी कुंती सुद्धा असेलच या जगात जिला तिच्या मुलाचं भविष्य घडण्याआधीच कळलेलं असेल कदाचित. किंवा अगदी परवाच्या पिक्चरमधली वर्तमान सनाया आपल्या मुलीत बघणारी आई असेलच की. 
कसंही का असेना, पण हे जे सगळं घडत असतं त्याची त्या बिचाऱ्या बालकाला काडीचीही कल्पना नसते. ते बिचारं बोलायला येऊ लागतं तसतसं स्वतःचं नाव सांगायला सुरुवात करतं, बोबडं का होईना, र ला ल म्हणत, ड ला र म्हणत ते हे कष्टप्रद काम करत राहतं. काही नावं तर अशी असतात ना, असतील नसतील तेवढी जोडाक्षर, काना, मात्रा, वेलांट्या, रफार सगळं असतं हो त्यात. पण आईवडीलांनी न मागता दिलेलं हे दान घेण्यापलीकडे त्याच्याकडे पर्याय नसतो.
मला नेहमी प्रश्न पडतो, की नाव असावं तरी कसं? तर जे वयाबरोबर मोठं होत गेलं पाहिजे असं. म्हणजे माणूस मोठा होईल, यश किंवा नाव मिळवेल, त्याच्या नावाची इतिहासात नोंद होईल वगैरे नाही, झालं असं काही तर उत्तमच. पण हाक मारताना किमानपक्षी विनोदी वाटू नये. माझी आज्जी, तिचं नाव उषा, हे नाव कसं, लहानगी उषा, ए उषे, काय सुंदर दिसतेयस ...अशी तरुण उषा ...किंवा उषा आज्जी, सगळीकडे चपखल! तशाच मालती, शालिनी, मंदाकिनी, कुमुद, सरोज, आशा, लता, झालच तर निर्मला पण माझ्या काळातल्या मुली; नेहा, प्रियांका, सायली, जुईली, अमृता या जेव्हा आज्ज्या होतील किती गमतीशीर वाटेल त्यांना हाक मारताना, कशा आहात नेहाआजी? अर्थात तोवर मोठ्यांना आदर देणे हा प्रकार संपुष्टात आलेला असेल कदाचित, किंवा आई, मोठी आई, लहान आई अशी एखादी टूम निघालेली असेल कोणास ठाऊक. मुलांच्या नावांबाबत सुद्धा असच काहीसं गणित आहे, गणेश, विष्णू, विनायक आजोबे आता सुहास, शिरीष, सुरेश, हेमंत, मोहन यांनी रिप्लेस झालेत. पण मंदार, अमेय, अनुराग, अभिजित, अश्विन हे जेव्हा त्यांच्या जागा घेतील तेव्हा खरी मजा येईल. अर्थात हा झाला गमतीचा भाग पण काहीही असो, कोणी म्हणेल आपण नावं घेऊन थोडीच आज्जीला हाक मारतो, तेही खरेच पण नात्यांमध्ये भावनेला महत्त्व अधिक त्यामुळे नावात काही नसतं हे अगदी योग्य!
पूर्वीच्या नावांची आणखी एक गंमत, प्रत्येक घरांत एक तरी बेबी काकू, बेबी आत्या, बेबी मावशी असायची; आता ही बेबी ते नक्की कशी ठरवायचे हा मोठा कुतूहलाचा विषय आहे. पण ती असायची. आता हळूहळू या बेबीझ पण कमी ऐकायला मिळतात. या बेबीला पहिल्यांदा हाक मारायची तर खूप धाडस लागतं बर का....नुसतं आत्या म्हणावं, बेबीआत्या म्हणावं पंचाईत असते. घरात नक्की किती मंडळी असतील काय माहित, ज्यामुळे की ही अशी नावं तयार होत असतील. कित्येकदा तर मुलं भावंडांना ऐकून आपल्याच आईवडीलांना दादा, वहिनी, काका, काकू, आप्पा असं म्हणत. आता आपल्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात आपल्याला असं काही मनातही आणता येत नाही.
नाव या विषयावर नावं ठेवणं मुलाचं नाव ठेवल्यापासून चालू होतं. काय तर नाव म्हणे शौर्य, दक्ष, कृती, आदर्श, स्वागत, ललकारी. मुलांना कसं शिकवायचं मराठी व्याकरण? कसा कळणार विशेषनाम, सामान्यनाम, आणि विशेषण यातला फरक? वेगवेगळी असतात ना ही सगळी मंडळी! जर प्रत्येकजण आपल्या मुलाचं नाव अद्वितीय असावं म्हणून वेगवेगळे शब्द नाव म्हणून ठेवू लागला तर हळूहळू टेबल, खुर्ची पण भेटतील रस्त्यात आणि एखाद्या मातेला अगदीच लांब नावाची हौस असेल तर आरामखुर्ची. अशक्य नाही. कुठेतरी अँड्रॉईड जन्माला आलेला असेल आणि गुगलचं तर एव्हाना लग्नही झालेलं असेल....

टिप्पण्या