चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो...

( कवी मंगेश पाडगावकर यांच्या " प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" या कवितेचे विडंबन)

चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो..
कितीही कुठेही मिळाला तरी तो हवा असतो..

काय म्हणता? या ओळी खोट्या वाटतात?
द्रव्याच्या दृष्टीने चिल्लर वाटतात?
वाटल्या तर वाटू दे, आटल्या तर आटू दे!
तरीसुद्धा, चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो..
कितीही कसाही मिळाला तरी तो हवा असतो..

नुसतं आलं आणि तुळस घालून चहा करता येतो
cinnamon and vanilla घालूनही चहा करता येतो
साखरेचं प्रमाण चुकलात तरी चहा करता येतो
दूधाचंच भांडं वापरलंत तरी चहा करता येतो
दुधाचे दात पडल्या पडल्या चहा पिता येतो
कवळी नाही घातली तरी चहा पिता येतोच

आठवतं का, तुम्ही पहिला चहा कधी घेतलात?
आईबाबांशी भांडून तो कप केव्हा जिंकलात?
भावंडांबरोबर बिस्किटं बुडवत बुडवत कधी चहा घेतला होता
की रविवारच्या पोह्यांबरोबर तो अधिक रंगला होता?
तुम्हालाही कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं
चहाबरोबर तुमचं सगळं आयुष्य आखलेलं होतं

चहा-बिहा भंपक लागतो म्हणणारी माणसं भेटतात
रस्त्यावरच्या कटिंग चहाला नावं ठेवणारेही असतात
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“मी चहा कधीसुद्धा घेतलेला नाही.
सगळी व्यसनं केली, पण चहाला शिवलेलो नाही.
आमचं काही नडलं का? चहाशिवाय अडलं का?"
त्याला वाटलं मला पटलं,
तेव्हा मी त्याला इतकंच म्हटलं,
चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो
तिन्हीत्रिकाळ घ्यावा असा अमृताचा ठेवा असतो

त्याच्यासोबत पाऊस कधी पहिला असेल जोडीने
एकेक घोट त्याचा रिचवला असेल ओढीने
भर दुपारच्या उन्हात कधी ice tea घेतला असेल
तरतरलेल्या तृप्त मनाने कधी lemon tea घेतला असेल
रेल्वेच्या डब्यात कधी कळकट्ट चहा घेतला असेल
MNC तल्या cubicle मध्ये कधी गोरापान चहा घेतला असेल
तरीसुद्धा, चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो..
कुठेही कसाही मिळाला तरी हवा असतो.

चहा कधी आळस असतो
नुसताच हाता-तोंडाचा चाळा असतो
चहा कधी सांडतोसुद्धा
आपला कपडा त्यात माखतोसुद्धा
दोन घोट चहा सुद्धा तरतरी आणतो
नुसताच भुकटीचा वास सुद्धा उत्साह आणतो

म्हणूनच चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो 
कुणीही कधीही दिला तरी तो हवा असतो

टिप्पण्या