गोष्ट एका टॅणूण्याणूची

      टॅणूण्याणू म्हणजे? दिव्याच्या गाड्याआपला आगीचा बंब असतो नं, म्हणजे अग्नीशामक दलाची घंटा वाजवत जाणारी गाडी तशाप्रकारच्या थोडक्यात आवाज करत जाणाऱ्या गाड्या. माझा मुलगा जेव्हा गाड्या ओळखायला लागला तेव्हा त्यानं पहिल्यांदा हा शब्द वापरला. आधी हा शब्द फक्त अमब्युलन्स पुरता मर्यादित होता पण त्यानंतर जसजसे इतर हॉर्न्स / सायरन कानावर पडताहेत तसतसं आता घरात आम्ही सगळे या सर्व गाड्यांना टॅणूण्याणूच म्हणतो. का माहित नाही; पण त्याच्या वयाच्या सर्व मुलांमध्ये फायर-ट्रक विषयीची उत्सुकता बघायला मिळाली. काही थीम-पार्क मध्ये तर फायर ट्रक चा सांगाडा त्यात सर्व साहित्यानिशी सज्ज असा बघायला आणि हाताळायला चिल्ड्रेन पार्क मध्ये उपलब्ध होता.
असं हे खेळातलं फायर-इंजिन बघणं, LEGO चा फायर-ट्रक तयार करणं वगैरे मज्जा वाटते हो! पण जर रस्त्यावरून फायर-ट्रक जात असेल तर तो आवाज आपल्यापासून दूर जाणारा असावा असंच कायम वाटतं. अमेरिकेत रस्त्यावरून जाणारे हे फायर-ट्रक खूपच दिसून येतात. पण चुकून जरी तो आवाज आपल्याकडे येतोय असं वाटलं तरी धाबं दणाणतं. स्थळ-काळ काहीही असो; डोळे टक्क जागे होतात आणि भीतीचा अंधार पसरून जातो.
परवाच्या संध्याकाळी हे टॅणूण्याणू प्रकरण असंच अगदी जवळून पाहण्याचा अनुभव आला. आपल्या भारतीयांच्या घरातल्या फोडण्यांमुळे घरातले फायर-अलार्म कित्येकदा वाजत असतात आणि मग या फायर खात्याशी सामना करावा लागतो तेव्हा असे होऊ नये याची काळजी घ्या असे बरेच सल्ले ऐकलेलं होते आणि अहो आश्चर्य! अचानक संध्याकाळी ५ वाजता घरातला फायर-अलार्म वाजायला लागला. आम्ही घरभर पळापळ केली. हो! अगदी माझा मुलगा..वय वर्षे ३; तोही मला हे बघ, ते बघम्हणत समजुतीच्या चार गोष्टी त्याच वेळी सांगत होता. सगळीकडे बघितलं. गॅस, AC सगळं बंद होतं. कशामुळे वाजला अलार्म? दार उघडून कोणाला विचारणार? काय करणार? सगळी दारं बंद असणार! अलार्म reset कसा करायचा? केला तर चालेल का? एक न दोन हजार प्रश्न. लाज, काळजी डोक्यात असतानाच शेवटी दार उघडलं. आणि बाहेर बघतो तर काय! चक्क पूर्ण अपार्टमेंट मधील होती नव्हती ती सगळी माणसं रस्त्यावर उभी होती. का? तर त्यांच्या प्रत्येकाच्याच घरातून हा फायर-अलार्म ऐकू येत होता म्हणे!
हुश्श: १०-१२ मिनिटात पहिल्यांदा आमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आपण एकटेच ह्या परिस्थितीत  नाही याचा दिलासा आणि आपली यात काहीच चूक नाही याचं समाधान. अलार्म बडवला जात असताना घराच्या आत थांबणं शक्यच नव्हतं. मग काय? पु.लं. च्या म्हैस ..म्हैस ..म्हैसची आठवण झाली. कोणी गाड्यांवर रेलून गप्पा मारताहेत, कोणी काय झालं असेल यावर त्यांची मतं मांडत होते, त्यावेळी मग प्रत्येकाने आपापले mobile नं update केले, म्हणे त्या एकमेकांकडे त्यांचे नंबर होते पूर्वी आणि काहीबाही कारणाने ने नाहीसे झालेले होते. काही तासांची निश्चिंती झाली म्हणत कोणी जेवायला नेघून गेले. तेवढ्यात कोणीतरी चुकून रेल्वेची साखळी असते ना तसली ती corridor मधली साखळी खेचलेली आहे आणि हा false अलार्म असल्याचा साक्षात्कार झाला.

पुढे मग फायर-ट्रक येऊन बाहेर उभा आहे पण हा false अलार्म असल्यामुळे ही पोलीसची जबाबदारी असल्याचे जाहीर झाले. मग आता पोलिसया परिणामाची कुणालाच कल्पना नव्हती. त्यात भरीत भर; एका घरात कोणी वयस्कर व्यक्ती राहात होती. त्यांनी आता मी काय करू?’ चा सवाल खडा करत फायर department ला कॅल केला. मग एक फायर departmentचा स्क्वाड त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना शोधून आणून अवतरता झाला. ते लोकं कुठेतरी कामात असणार त्यामुळे इकडे काय घडलंय याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे काय करावे काही सुचेनाअशा चेहऱ्याने ती सगळी त्यांच्या घराकडे वळली. अलार्म अजूनही वाजतच होता. पण काहीच वेळात अजून एका टॅणूण्याणूचा आवाज आला; ह्यावेळी मात्र चांगल्या चार पोलीस गाड्या आणि ते फायर-इंजीन घटनास्थळी पोहोचले. फायर departmentच्या गटाने तो false अलार्म बंद करून सर्वांची त्या संगीतापासून मुक्तता केली. आणि आम्ही आमच्याच घराचं दार उघडून पुन्हा आत जायला उद्युक्त झालो!

टिप्पण्या