कोणाचं काय तर कोणाचं काय......

कोणी म्हणतात; चला, गेल्या वर्षातला हा शेवटचा दिवस; नवीन वर्ष काय काय घेऊन येतंय बघायचं. कोणी प्रचंड आत्मविश्वास असणारे म्हणतात; वर्ष असावं तर असं! वाह! पुढचं वर्ष पण असंच झकास असणार! कोणी म्हणतो; छे! कसलं काय? वय वाढतंय नुसतं बाकी काही फरक नाही. कोणी म्हणतो आज केक खाऊन मजा करू, ‘उद्या’ कोणी पाहिलाय? कोणी म्हणत असतो यावर्षी तरी आई कुठलेही प्रश्न आणि संशय उराशी न बाळगता मला घराबाहेर पडू देईल का? नेमकी तीच आई म्हणेल ही कार्टी रात्री रात्री कुठे तडफडत असतात, आमचा जीव टांगणीला लावून, यावर्षी तरी सद्बुद्धी दे बाबा देवा ह्यांना!
कोणाला तरी मनात शंका असते यंदा तरी ती मला किंवा तो मला हो म्हणेल का? या वर्षी तरी माझा विषय सुटेल का? या वर्षी तरी मला किंवा ह्याला/नवऱ्याला ऑनसाईटची संधी मिळेल का, या वर्षी तरी सुनबाई धड वागणार का की स्वतःचच खरं करणार? या वर्षी तरी मुल होऊ द्या म्हणाव, वर्ष काय हा हा म्हणता जातात!! एक ना दोन प्रत्येकाची दर नव्या वर्षाकडून काही न काही मागणी असते. नवं वर्ष काय हो करणार? ते बिचारं वेळ घेऊन येतं बाकी मिळालेल्या त्या वेळात काही करणं किंवा न करणं आपल्याच हातात.
मी पण लहान असल्यापासून नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे रिझोल्युशन वगैरे करण्याचा प्रयत्न करत आलेय. म्हणजे शेवटच्या दिवशी आजवर करायच्या असलेल्या परंतू राहून गेलेल्या किंवा न जमलेल्या गोष्टी आधी तपासायच्या आणि मग नवा संकल्प करायचा. अर्थात तोही मला वर्षातून किमान तीन वेळा रिफ्रेश करावा लागतो. एकदा हे न्यू इयर चं स्वागत करताना, एकदा आपला मराठी महिना चैत्र येतो तेव्हा आणि एकदा माझा जन्मदिवस मी वाढदिवस म्हणून साजरा करते तेव्हा. एक तर संकल्प मी गेल्या कित्येक वर्षांपासून करतेय, तो म्हणजे सकाळी लवकर उठणे. आता मला या संकल्पाचासुद्धा कंटाळा आलाय. किती वेळा तेच तेच ठरवायचं ना? त्यापेक्षा नाही जमत एखादी गोष्ट आपल्याला, हे म्हणून चक्क संकल्पच बदलायचं ठरवून टाकलंय, ते कसं सोप्पंय! संदीप खरे म्हणतो तसं...‘स्वतःलाही कधी माफ करायला हवे’. असल्या ओळी मी सहसा विसरत नाही.
तर कालचा दिवस असाच विचार करण्यात गेला की गेल्या वर्षीचा संकल्प होता व्यायाम करण्याचा, एखादा खेळ खेळण्याचा. त्यावरून एकुणात ३६५ दिवसांपैकी ३०० दिवसांचा डिस्काउंट बिनबोभाट घेऊन टाकला आणि ६५ दिवस कठोर तपश्चर्यापूर्वक सूर्यनमस्कार घातले असावेत असा अंदाज करून स्वतःला त्यातून माफ करून टाकलं. उरला एखादा खेळ खेळणे हा संकल्प त्यात तर मी छप्परफाड प्रगती करत सुटलेली आहे.
माझी खेळ या विश्वातली अंगणातली प्रगती संपून तशी बरीच वर्ष झाली. जेव्हापासून म्हणजे साधारण २००० साली हातात कॉम्प्युटरचा कीबोर्ड मिळाला तेव्हापासून रोडरॅश, मारियो आणि ब्रिक्स हे खेळ खेळून कीबोर्डवर पूर्वी कधीतरी अरोझ होते हे सांगावं लागलं. पुढे काळ्या पांढऱ्या स्क्रीनचा मोबाईल, त्यात पुन्हा तेच रेकॉर्ड कायम! आणि आताचा टचस्क्रीन मोबाईल म्हणजे तर ‘देव’! अँग्री बर्डस, फार्मव्हिले, कँडी क्रश, फ्रुट निन्जा, कट द रोप, सबवे सर्फर्स, फ्लोफ्री आणि कित्येक खेळ केवळ हाताच्या बोटांनी जिंकले. वाचून वाटेल की ह्या खेळांचं मार्केटिंग वगैरे करतेय की काय पण तसलं काही नाही. हेच ते खेळ आहेत ज्यांनी मला माझीच कित्येक रेकॉर्ड मोडून पुन्हा जिंकल्याचा आनंद दिला. लेव्हल क्लियर झाल्या की, अरेच्चा आता बघू प्रत्येक लेव्हलमध्ये तीन स्टार्स मिळतात का असं करत करत मी कितीतरी खेळ हिंट किंवा क्रॅक्स न बघतासुद्धा जिंकू शकले.
पण या वर्षी ‘२०४८’ या खेळानी मात्र मला हैराण केलं. २-२ ४, ४-४ ८, ८-८ १६ असं करत २०४८ पर्यंत प्रवास करणाऱ्या या खेळाशी मी चहूबाजूंनी सामना केला. सगळ्यात आधी खेळ डाउनलोड केल्यावर जी मी १०२४-१०२४ ला पोहोचले ती कायमचीच. ते दोन ध्रुव काही केल्या एकमेकांना भेटायला तयार नव्हते. कित्येक प्रयत्न करून बघितले, म्हणजे प्लान करत खेळणे, विचार न करता नुसते आकडे इकडून तिकडे ढकलणे, पण छे! कित्येक दिग्गजांनी तर त्यांचा तो २०४८ चा झेंडा FB वर झळकवूनसुद्धा वर्ष झालं असेल. आणि कालचा दिवस उजाडला. मोठा आकडा उजवीकडे ठेवला म्हणजे होतं पूर्ण असले सल्लेही ऐकलेले होते. त्यानुसार गणित करत जमत आलं ...आज हा खेळ आपण जिंकणार असं वाटलं... त्याक्षणी त्या आकड्यांना एक चुकीची जागा दिली गेली ...अगदी हातातोंडाशी आलेला गेम घालवला. बास आज काही झालं तरी हा खेळ जिंकायचाच असं ठरवून पुन्हा खेळायला सुरुवात केली. काही मूव्ह झाल्या, माझी ती विनिंग पोझिशन आली, १०२४-१०२४ च्या आकड्यांना दोन जागा मिळालेल्या होत्या, पुढच्या चार स्टेप्स करायच्या होत्या, श्वास रोखून ताठ बसून सगळा जीव डोळ्यात साठवून, आजूबाजूचे २-२ ४, ४-४ ८ करत दोन्ही १०२४ ना एकमेकांसमोर यायला जागा मिळवली आणि अखेर काल रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर २०४८ हा आकडा दिसला. ‘जन्मा आलो सार्थक झालं’ म्हणत शांतपणे तो खेळ अनइंस्टाल करून टाकला.
आता नव्या वर्षाचा नवा संकल्प करायला पुन्हा सज्ज!

टिप्पण्या