माझ्या मनाच्या आकाशात, भरला सारा निळा रंग
वर उठले अनंत तरंग, पण एकच होता अंतरंग
मला व्हायचं होतं, निळ्या अंबरासारखं
मला व्हायचं होतं, निळ्या सागरासारखं
नव्हे,नव्हे, घननीळ रामासारख
नव्हे,नव्हे, घननीळ कृष्णासारखं
मला व्हायचं होतं, अजातशत्रू
पण कोपऱ्याकोपऱ्यांत भरले रिपु
काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोहांनी झालं काळकुट्ट मनाचं आकाश
कुठेही दिसेना थोडासाही प्रकाश
विवेकाची बिजली, लख्खकन चमकली,
मनातली आशा थोडीशी पालवली
कुठून तरी आली गोड गोड वाणी,
मानी रे भगवंत, भेटेल तो प्राणी
नको करू हेवादावा, नको करू राग लोभ
प्रभूची आठवण ठेवून, सारं काही उपभोग
प्रेमाचे हे घाल सडे, सद्भावनांची घाल रांगोळी
त्यातून सहज प्रकटेल, निळ्या नभाची झळाळी
नको करू खंत मनी, होशील तू अजातशत्रू
संपून जाईल सारे जिणे, संधी अशी नको घालवू
काळे सारे ढग, विरून वितळून गेले,
मनाचे आकाश फिरून, निळाईने भरले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा