सायकल, मेणबत्ती आणि पाडगावकर

      दोन पायांची चाकं जसजशी पटापट उचलता येतात तसतसं वेगाचं वेड लागतं. आपण पळायला सुरुवात करतो. आणखी वेग हवासा वाटतो, आणि सायकल नावाच्या वाहनाशी ओळख होते. सायकलवर टांग टाकून कमीत कमी वेळात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे वेध लागतात. आपला वेग जसा वाढतो तसा चेहऱ्याला हवेची निराळी मजा कळते. मुक्त आणि स्वतंत्र पणाची जाणीव करून देणारी ती आपली सोबतीण असते. एखादा अगदी उंच चढ सायकलवरून चढून वर जाताना प्रचंड शक्ती वापरली जाते आणि मग त्या उंचीवर आपण तो जिंकल्याचा अभिमानी क्षण अनुभवतो. मग त्यानंतरच्या उतारचं निसर्गानं बहाल केलेलं बक्षीस आनंदानं उपभोगतो. तो वेग, तो हवेचा स्पर्श, कानात शिरणारं वारं आणि डोक्यात  भिनलेली नशा काही और असते.
      असच एकदा माझ्यासारख्या काही सायकलवेड्या मैत्रिणींबरोबर पुण्याहून लोहगडावर जायचं ठरवलं. सायकली पायथ्याशी ठेउन गडावर चढायचं आणि दुसऱ्या दिवशी परतीची वाट धरायची. तेल-पाणी, हवा-बिवा बघून लख्ख सायकली घेऊन गडाकडे निघालो. त्या रस्त्यावरची वाहतूक, मग थोडीशी कोण आधी पोहोचणार अशी स्पर्धा करीत गड गाठला. सायकलींना विश्रांती देउन गडाकडे मोर्चा वळवला. त्याच खुमखुमीत गड चढून वर पोहोचलो. लोहगडासारखा रेखीव गड डोळ्यात साठवू तितका कमी. बऱ्यापैकी संध्याकाळ होत गेल्यामुळे मग गडावरच्या गुहेत पोहोचलो. तेव्हा लोहगड सिंहगडाइतका गावात आलेला नव्हता त्यामुळे केवळ आमचा एकच गट तिथे होता. बरोबर आणलेले जेवणाचे डबे खाऊन मग आम्ही रात्रीचा आवाज ऐकायला सुरुवात केली. काजवे, पाकोळ्या, पायथ्याच्या गावातून येणारे काही आवाज यांच्या सोबत आभाळात पसरलेले ग्रहगोल आणि नक्षत्रांची उजळणी केली. तेवढ्यात कोणीतरी मेणबत्ती पेटवली.
त्या प्रकाशानी अचानक वातावरण बदलून गेलं. प्रत्येकजण आपपल्या वह्या, पुस्तकं, चिठोरे, नकाशे घेउन मेणबत्तीभोवती गोळा झाले. गडाची माहिती, त्याचा नकाशा, शिवाजी महाराजांचे गड, त्यांचा गनिमीकावा, रायगडाला जेव्हा जाग येते मधील एक स्वगत असं करत करत मंडळी कवितांपर्यंत पोहोचली.
पुस्तक होतं ‘बोलगाणी’, कवी ‘मंगेश पाडगावकर’ आणि कवितेचं नाव होतं, ‘सांगा कसं जगायचं...’ कण्हत कण्हत की गाणं म्हणत...तुम्हीच ठरवा! शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं? ..प्रकाशात उडायचं की अंधारात कुढायचं? ...काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं? एकेक ओळ जसजशी वाचून होत होती तसतसा अंगावर काटा येत होता. ..भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं ? ...तुम्हीच ठरवा! या ओळीनं सगळं माहौलच बदलून गेला. ‘अजून एक अजून एक’...आता पुस्तक बाजूला ठेवणं शक्यच नव्हतं. ‘... गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो, जनात गायलंय म्हणून तुम्ही मोठे नसता, मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता’, ‘... प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘... मला सांगा तुमचं काय गेलं?’, ‘... याचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही’, ‘... आजोबांच्या खोलीत आता धुकं.. धुकं.. धुकं.., आजोबांचं घर सगळं मुकं.. मुकं.. मुकं..’, ‘सुकून जाणार म्हणून फुलं फुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का?’ एकानंतर एक सरस कविता वाचत गेलो आणि पोहोचलो चिउताईसाठी गाणं या कवितेपाशी ‘तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं ...’ एव्हाना सगळ्यांचेच डोळे पाण्यानं भरले होते.
      आत्ताही डोळ्यासमोर बोलगाणी उभं राहतंय, शब्दाशब्दातून जगण्यावर नितांत प्रेम करायला सांगणारं हे पुस्तक आणि हे कमालीचे विलक्षण कवी. त्यांच्याच शब्दांत त्यांना आज म्हणावसं वाटतंय, ‘इतकं दिलंत, इतकं दिलंत तुम्ही आम्हाला, खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही आम्हाला...’

टिप्पण्या