सगळं पाहिजे इम्पोर्टेड

वैदेही आणि अपूर्वा बऱ्याच दिवसांनी भेटल्या. वैदेहीचे कामानिमित्त सतत परदेश दौरे आणि अपूर्वाचा संसार एके संसार; त्यामुळे या जीवश्च कंठश्च मैत्रिणींना आज काल भेटायला वेळच होत नव्हता. खूप दिवसांनी परवा गाठ पडली आणि नेहमीच्या विषयावर गाडी आली. "काये नं, क्वालिटी नाही गं आपल्याकडे." नेहमीप्रमाणे वैदेही रडली. त्या दिवशी का कुणास ठाऊक पण एरवी गप्प ऐकून घेणारी अपूर्वा विरोध करत म्हणाली, "सारखं काये गं तुझं क्वालिटी क्वालिटी...?" "हं हं .. माझं एकटीचं नाहीये काही; तू जरा घरातून बाहेर पड म्हणजे कळेल तुला. अगं इतक्या साध्या साध्या गोष्टीत फसतो आपण, तिथले कॉस्मॅटिक्स, गारमेंट्स, बाकी घरगुती युटीलीटीझ, इव्हन शूज ; सगळं चांगल्या प्रतीचं असेल तर ते पहील्यांदा बाहेर जातं. बाकी इथल्या जनतेसाठी सगळा उन्नीस बीस माल! त्यामुळे मी गेले नं बाहेर कुठेही हल्ली की माझ्या  नेहमीच्या गोष्टी आणूनच ठेवते. इथे कोण त्या दुकानदारांशी वादावादी करणार?" वैदेहीनी तावातावाने सांगितलं.
एकीकडे वैशालीमध्ये बसून डोसा चापायचा आणि तोंडानी 'परदेशी ऑथेंटीक फूड' असल्या बाता मारायच्या हे किती विसंगत आणि क्रूर आहे असा शेरा अपूर्वाच्या मनात आला खरा पण ती बोलली नाही इतकंच. उलट "पण आपल्या कडच्या जेवणाची सर नाही किनी?" म्हणत तिने विषय बदलला. "छे छे, मला आता इतकी सवय झालीये नं तिथल्या फुडची की सलाड, पास्ता किंवा पिझा वीकमध्ये एकदा तरी होतोच. यू नो." “ हं तेच एकदाच नं, शेवटी आईच्या हातचं पोळी भाजी मिस करते म्हणत उरलेले चार दिवस रडतच असतेस. वैदेही, आपल्याला वरण भात खाल्याशिवाय झोप लागत नसेल तर तो खावा त्याने काही स्टेटस खराब होत नाही.” तेवढयात वैदेही म्हणालीच “आता तूच आठव ! मधे एकदा मानस साठी आणलेला पुल ओव्हर किती मस्त दिसत आहे त्याला अजून! लहान मुलांचे कपडे तिकडे खूपच मस्त मिळतात. आय टेल यू, मी किती वेळा सांगते तुला, तू लिस्ट देत जा माझ्याकडे तुझी.
आता मात्र अपूर्वा ला राहावलं नाही आणि ती म्हणाली, “ तुला एक सांगू का, तू तुझा अमुल्य वेळ देऊन हे जे काही करतेस न  सो कॉल्ड मॉड कपडे, लेन्स घालणे, सदानकदा तोंड रंगवणे, उठसूट इंग्लिश बोलणे याने काही फरक पडत नाही. आहोत आपण मराठी तर मराठी माणसासारखं वागावं मुद्दाम फेक वागायला जाऊ नये.” अपूर्वा बोलून गेली खरी पण त्यामुळे वैदेहीचा मूड पूर्ण बदलून गेला. “वैदेही, तू नं आता पुरेशी 'अचानक मॉडर्न' या कॅटेगरीत गेल्यासारखी वागायला लागलेली आहेस. नाही मला मान्य आहे की कॉर्पोरेट जगात वावरताना तुला असं साळढाळ नाही वागून चालत. हो ठीके पण तू राहण्याची पद्धत बदलते आहेस, आवडीनिवडी बदलतीयेस.. किमान... विचार....ते तरी बदलू नकोस. स्वतःच स्वतःला फसवू नकोस.”
वैदेही जरा रागातच खेकसलीच “अपूर्वा हा जो तुझा संकुचित आणि कोता दृष्टीकोण आहे नं त्याचं कारणामुळे तू आज घरी बसून संसार करत बसलीयेस. आपल्या वयाच्या इतर कुठल्याही मुलीकडे बघ, त्यांनी ह्या सगळ्याला आव्हानं म्हणून समोर पाहिलंय आणि त्यावर किती सहज त्या फ्लो करताहेत. पण तू घर एके घर करून यातल्या कशाचाच तुला अंदाज येऊ शकणार नाही. बाहेरचं जग बघ म्हणजे कळेल की काय चांगलं आहे आणि काय वाईट. तू जर दुसऱ्या जगाकडे पहिलच नाहीस तर तुला कळेल कसं की तिकडे काय आहे? मग ते अप्रीशीएट करण तर वेगळीच गोष्ट आहे. तू हेच करत बस, वरणभात, तुळशीबाग, लक्ष्मीरोड, मंगळागौरी आणि सवाष्ण म्हणून जेवणं, मुलांना शाळेतून ने-आण करण ..बास ..संपल तुझं जग.” अपूर्वा हसतच उत्तर दिलं, “हरकत नाही. तेवढचं असेल जग माझं पण मला स्वतःला सतत समजवावं लागत नाही. उगाच दुसऱ्या कोणाशी बोलताना आपल्याच शाळेला ‘लो क्लास मराठी शाळा आहेत या’ असं म्हणायचं आणि आपण कुठल्यातरी कॉन्व्हेंटचं प्रोडक्ट आहोत असं दाखवायचं, सदानकदा जो पोशाख आपण केलाय तो दुसर्यांना कसा वाटतो याचा विचार करायचा, परदेशात काम करायला मिळावं म्हणून बॉसच्या पुढे पुढे करायचं. या सगळ्यापेक्षा मी जे काही करते नं ते खूप सेन्सिबल आहे. आता विषय इतका वाढतोच आहे तर बोलते, मगाचपासून क्वालिटी क्वालिटी च्या नावानी बोंब मारतीयेस तर मग लग्नासाठी इथला मुलगा का बघतेयस तोही तिथलाच बघ!...”

टिप्पण्या