निमित्त.."कट्यार.."

     
 चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’..खरं तर याला चित्रपट म्हणावं की ‘संगीतिका’? असा प्रश्न मनात आला. कारण मी बघितलेला चित्रपटाचा आत्मा सशरीर ‘संगीत’ असण्याची ही पहिलीच वेळ.
      यू ट्युबवर ज्यूकबॉक्स द्वारे उपलब्ध असलेली या चित्रपटातील गाणी ऐकली. त्यानंतर काही गाण्यांचे व्हिडीयो बघितले. क्वचित असंही वाटून गेलं की आता चित्रपट बघायचाच कशाला? कारण ते संगीत इतकं बोलकं होतं की त्यात दृश्यानुभव घ्यावा ही गरजच वाटली नाही. पण दिवसागणिक ही गाणी वेड लावत होती हे मात्र खरं. घरात, गाडीत, मोबाईलवर या गाण्याचं अधिराज्य गाजत होतं. फेसबुकवर ‘क का घु’चे रिव्ह्यू, स्टेटस झळकत होते. ‘चित्रपट असावा तर असा!’ ‘घुसली रे घुसली...कमाल’ असेही होते तर दुसरीकडे ‘घुसली कसली ...दिसलीसुद्धा नाही.’ असले ताशेरेही होते. वसंतराव आणि अभिषेकीबुवा यासारख्या दिग्गजांकडून प्रत्यक्ष ऐकलेली गाणी दुसऱ्या कोणाकडून ऐकायची तयारी नसणारे काही कमी नव्हते. आणि अशा प्रकारची तुलना होणं साहजिकच होतं. या न त्या कारणानं चित्रपट पाहणं लांबत गेलं पण पहिला तेव्हा त्याबद्दल काहीतरी लिहायलाच हवं असं मात्र नक्की वाटलं.
      बालगंधर्व, लोकमान्य यांसारखे जीवनपट ताकदीने साकारणारा सुबोध भावे कट्यारमधून काय किमया करतो हे बघायची उत्सुकता होतीच. तशी त्याने ती पूर्ण केलीच आणि चित्रपट बघून झाल्यावर नाटकातल्या कित्येक गाळलेल्या जागा भरल्या गेल्याचीही जाणीव झाली.
      ‘कट्यार’ म्हणून रीमा लागू यांचे स्वर कानावर पडले ते त्या कट्यारीवर साज चढवतच.कलाकाराच्या अहंकाराला काबूत ठेवणारी ही कट्यार तिची गोष्ट सांगू लागली. दोन तोडीसतोड कलाकार, त्यांच्यातील स्पर्धा आणि जय-पराजय यांतून निर्माण होणारी जीवघेणी इर्षा आणि त्या इर्षेमुळे एका कलाकाराचं नष्ट झालेलं जीवनध्येय. अहंकार आणि नम्रता यांतील द्वंद्व आणि त्याला साजेसे भाषिक अलंकार. ‘स्वर जसे तीव्र असतात तसेच कोमलही’ म्हणणारा सदाशिव, ‘तू तुझ्या स्वरांनी, सुरांनी अहंकाराचा खून कर’ म्हणणारी झरीना आणि ‘विद्या आणि कलेतला फरक सांगणारा’ कविराज आपल्या शब्दांनी, संवादफेकीने आणि अभिनयाने चित्रपटाचा आलेख उंचावत नेतात आणि गायक कलाकार त्यांच्या संगीताने सूरांच्या निरागसतेचं शिवधनुष्य पेलवत ती उंची टिकवून धरतात. कट्यार सरतेशेवटी निष्कलंक राहते.
      सचिन पिळगावकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय कौतुकास्पद आहेच कारण गायनाचा अभिनय करणं कदाचित गाण्यापेक्षाही अवघड असू शकतं. राहुल देशपांडे, शंकर महादेवन आणि महेश काळे यांच्याबद्दल खरं तर काही बोलायची गरजच नाही. त्यांच्यामुळे आज घराघरांत शास्त्रीय संगीताचा प्रवेश झालाय आणि यासारखी दुसरी कुठली दाद असूच शकत नाही.
      चित्रपटात काहीच खटकत नाही असं होत नाही पण ते नमूद करावं इतकं महत्त्वाचं वाटत नाही कारण त्यापेक्षा उत्तम गोष्टींची संख्याच अधिक आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ‘वसंतरावांची सर नाही ...’ असं म्हणणारे जे जुन्या पिढीतील लोक आहेत त्यांना विंदा करंदीकर यांच्या ओळी ऐकवाव्या असं वाटतंय,
ह्यांना न अपुले आवडे, त्यांचे रुचे ना आपणा
बीज प्रगतीचे विरोधी, ते जरा समजून घे!!

आजच्या नव्या पिढीतल्या या कलाकारांनी आम्हाला हे जे जुनं सोनं लखलखीत करून नव्यानं अनुभवायची संधी दिली आहे त्याबद्दल त्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद!!

टिप्पण्या