काही घटनाच अशा असतात ज्या नाट्यमय असतात तर काही घटना अगदी सरळ
साध्या असतात पण आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण अतिशयोक्त असतो. ही अशी एखादी
गोष्ट आपण आपल्या कट्ट्यावर त्याच अभिनिवेशात सादर करतो आणि तयार होतो तो
‘किस्सा’.
मग तो एखाद्या अनोळखी व्यक्तीने
हॉटेलमध्ये परवा काय गोंधळ घातला, इथपासून, तिने त्याला कसे भर रस्त्यात
कसे प्रपोज केले इथपर्यंत वाट्टेल त्या गोष्टीचा यात समावेश होऊ शकतो.
आज असाच एक ताजा किस्सा शेअर करतेय. काय झालं? विशेष काही नाही.
अर्थात म्हणजे नक्की विशेष असतं. तर, १५ दिवसांपूर्वी मी एक laptop ऑनलाईन ऑर्डर
केला. हल्ली त्यात काही विशेष राहिलेलं
नाही त्यामुळे काही क्लिक्स करून हे काम यथासांग पार पडलं. आता हे माझं
पॅकेट कधी कुठून कसं आणि केव्हा माझ्यापर्यंत पोहोचणार ते मेसेजेसही आले
नेहमीप्रमाणे. ठरलेल्या दिवशी मीही त्याची वाट बघत घरी थांबले. १२ ते ४ वेळेत
अपेक्षित असलेल्या या पॅकेटविषयी १२ वाजून ५ मिनिटांनी मेसेज आला की हे पॅकेट घरात
कोणी न भेटल्याने दाराबाहेर ठेवण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी आपण असलो तरी नसतो
किंवा नसूनही असू शकतो वगैरे काय काय बोलतात ना काही ज्ञानी माणसं तसली अध्यामिक
जाणीव तेव्हा मला पहिल्यांदाच झाली. तडक जाऊन दार उघडून बघितलं. काहीच नव्हतं.
मनात म्हटलं, कुठेही जा माणस किंव्हा घटना बदलत नाहीत. चक्क दारातून पॅकेट गायब.
एकदा स्वतःच्याच कानांवर दयाही आली की एवढं सगळं घडलं आणि आपल्याला ऐकू येउ नये?
कमाल झाली. पुढे काय? पॅकेट पोहोचल्याचा नुसता मेसेज मिळाला पण खरं पॅकेट आलेलं
नाही असाही ऑप्शन त्या पोर्टलवर होता. ऑप्शन पाहून, चला म्हणजे आपण काही एकटेच
नाही अशी जाणीव झाली आणि जे जे होईल ते ते पाहावे म्हणत त्यातून पुढे गेले. मग
फोनाफोनी झाली. त्यातून पॅकेट वेगळ्या पत्त्यावर दिलं गेलेलं आहे असा साक्षात्कार
झाला. एव्हाना तीन तास होऊन गले होते. एवढ्या वेळात ज्या कुठल्या दारात ते पडलं
असेल त्याने ते योग्य ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न करायला हवे होते अशी आपली माझी
माफक अपेक्षा. असलं काही घडलं नाही. मग काय चौकशीसाठी विनंती करून २४ तास
उलटण्याची वाट बघणे पदरी पडले.
असल्या वेळचे २४
तास खूप असतात हो! बसल्या बसल्या स्वताच्या कमनशिबाचा शोध घ्यायला सुरुवात केली. Venn diagram, histogram, Pareto analysis असल्या सगळ्या गोष्टी फेर धरून नाचत
असल्याची जाणीव झाली. असं घडलं ते कशामुळे याच्या ‘शक्यता’ पडताळण्याचा निरर्थक
प्रयत्न, दुसरं काय? ख्रिसमससारख्या
दिवसांत दर सेकंदाला या पोर्टलवर ४०० हून अधिक मागणी केली जाते. त्यातल्या गोष्टी
योग्य जागांवर पोहोचवण्यासाठी काम करणाऱ्या distribution systems दर दिवसाला
लक्षावधी पॅकेटची ने-आण करतात. त्यापैकी किती पॅकेट पोहोचत नसतील आणि कुठल्या
कारणाने?
१.
आपला पत्ता घालताना
चुकला.
२.
मागणी पोर्टल ते
distributor चुकीची माहिती पोहोचली, जे आजकालच्या कॉम्प्युटरच्या काळात अशक्य आहे.
३.
त्या distributorने
पत्ता चुकीचा वाचला आणि पॅकेट भलतीकडे गले.
४.
आपल्या दारातले
पॅकेट चोरीला गेले.
दिवसभरात असलं सगळं घडण्याची
शक्यता किती असणार तर १%. आणि त्या १% त आपण.
२४ तास झाले, पॅकेट चुकून कुठल्या घरात टाकलं ते कळलं. ‘नेबर’ या
शब्दाचा नक्की उच्चार कसा करावा याचा पुनर्विचार झाला...’ने बरं’, ‘नाई बरं’
...वगैरे वगैरे. जाऊन चौकशी केली. पण त्या घरातल्यांना काही ते पॅकेट मिळालेलं
नसणार कारण त्यांच्या घरात कोणी नव्हतं. फोनाफोनीची दुसरी फैर झडली. ४ दिवसांनी
साक्षात वाहनचालक येऊन खुलासा करेल या आशेवर वाट बघण्याची पुन्हा सुरुवात झाली.
तसा तो आला, त्यानेही पुन्हा एकदा चौकशी करण्याचा प्रयत्न केला, दार बंद, निष्पन्न
काहीच नाही. पण आमची काही चूक नसल्यामुळे पैसे परत केले जातील आणि हवे असल्यास तीच
गोष्ट आणखी काही दिवसांत तुम्हाला दिली जाईल असा मेसेज मिळाला. झाले गेले गंगेला
मिळाले म्हणत नव्या laptop ची वाट बघायला सज्ज झाले.
कोणाच्याही सौजन्याला धक्का न लागता हे नवं पॅकेट या वेळेला मात्र माझ्याच दारात येऊन उभं ठाकलं. मीही ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या......’ म्हणत ते पॅकेट सहर्ष आत घेतलं. ‘भेटीत तृष्टता मोठी ...म्हणेपर्यंत या पॅकेट नंतर दोनच तासात त्याचा जुना दोस्त माझ्या घरात येऊन हजर झालाय. आमच्या अपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये कोण्या इसमाने काल ते आणून दिलं म्हणे. कोणी ते माहित नाही. पण आलंय खरं. आता या समोर पडलेल्या दोघांना काय म्हणावे? किस्सा! नाहीतर दुसरं काय?
कोणाच्याही सौजन्याला धक्का न लागता हे नवं पॅकेट या वेळेला मात्र माझ्याच दारात येऊन उभं ठाकलं. मीही ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या......’ म्हणत ते पॅकेट सहर्ष आत घेतलं. ‘भेटीत तृष्टता मोठी ...म्हणेपर्यंत या पॅकेट नंतर दोनच तासात त्याचा जुना दोस्त माझ्या घरात येऊन हजर झालाय. आमच्या अपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये कोण्या इसमाने काल ते आणून दिलं म्हणे. कोणी ते माहित नाही. पण आलंय खरं. आता या समोर पडलेल्या दोघांना काय म्हणावे? किस्सा! नाहीतर दुसरं काय?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा