आजीबद्दल

माझी आजी, उषा पेंडसे, तिची आठवण, तिचं बोलणं आणि वागणं यात ना कमालीची किमया आहे. भाषेची ओळख मला आजीने करून दिली. ती कायम म्हणायची, वाचन हा असा छंद आहे जो जपताना तुम्ही कुणालाच त्रास देत नाही आणि तुमच्या ज्ञानात अतोनात भर करीत राहता. वर्षातून तीन वेळा असं बारा वर्ष तिने ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं. गीता तत्वज्ञान म्हणून आणि भाषेचं वैभव म्हणून तिला अतिशय प्रिय होती आणि कर्मयोग सांगणारा श्रीकृष्ण तिला आदर्श रामापेक्षाही श्रेष्ठ वाटायचा.
आजीशी साधासाच संवाद झाला तरी काहीतरी नवं समजायचं, एकदा असाच तिच्याशी झालेला संवाद आठवतोय, तो दिवस होता महाकवी कालिदास दिन. माझ्या पिढीतल्या हातावर मोजता येईल इतक्या लोकांना फक्त माहित असेल की असा एक दिवस साजरा केला जातो. माझीही तीच गत होती. मग तिच्याशी बोलताना, “हो का? काय सांगतेस?” असं मी म्हणेपर्यंत आजीचं उत्तर यायचं,
“आषाढस्य प्रथमे दिवसे ...अशी सुरुवात करत ...
पुरा कविनां गणना प्रसंगे,
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास:
अत्रापितत् कवेरभावात्
अनामिका सार्थवति बभूव”
असा हा महान कवी आणि मग कालिदास या विषयावर गप्पा. काय गम्मत होती. हे सुभाषित पुढे जेव्हा पाठ्येतर सुभाषित म्हणून पुस्तकातून भेटलं तेव्हा गम्मत वाटली आणि थोडीशी लाजही. केवळ पुस्तकी शिक्षणाच्या, मार्कांच्या आणि लौकिकाच्या मागे धावणाऱ्या आमच्यापेक्षा आजीच्या पिढीचं शिक्षण किती खरंखुरं होतं. ती हे असंच प्रत्येकाशी बोलायची, घरातच नाही तर बाहेरच्यांशीसुद्धा, तेव्हा ती कधी ‘ही मी देत असलेली माहिती, ज्ञान; मी फुकट देतेय की याबद्दल समोरचा मला काहीतरी देणार आहे’ याचा विचार करत नसे. आजच्या पिढीचं प्रत्येक गोष्टीसाठी मोबदला मागणं बघून तिला आश्चर्य वाटायचं.
तिला मराठीच आवडायचं असं नाही तर संस्कृत, इंग्लिशसुद्धा आवडायचं, कधीतरी एका संस्कृत शब्दांचा अर्थ सांगताना तिनं एका गमतीशीर पद्धतीने लक्षात ठेवलेले अर्थ सांगितले होते,
                    ‘विन्डो वातायनो खिडकी गवाक्षो भोक भिंतीचे’
हे आणि असं तिचं बोलणं कधी विसरूच शकणार नाही. जाता जाताही एखादा श्र्लेष ती सांगून जायची तो असा,       
‘कीर्तनास नरहो तुम्ही जागा’
      तिच्यात गुणग्राहकता होती त्यामुळे घरातल्या प्रत्येकाचं तर ती कौतुक करायचीच पण तिला  आवडलेल्या पुस्तकाबद्दल, कवितेबद्दल, गाण्याबद्दल, वक्तृत्वाबद्दल आवर्जून कौतुकाची पावती पोहोचती करायची. त्यामुळे तिचा लोकसंग्रह प्रचंड होता आणि ती सगळ्याच गटांत हवीहवीशी असायची. ती खूप छान लिहायची. तिच्या काही आठवणी आणि लिखाण मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सर्वांशी शेअर करीत आहे. आजीची कविता.

टिप्पण्या