वार्षिक परीक्षा एकदाची संपली की दुसऱ्याच दिवशी आजीकडे कूच
करायचं हे ठरलेलं होतं. तेव्हा आईवडील आजीकडून त्याबद्दल परवानगी वगैरे मागत
नसत. उलट महिनाभर तरी ‘आई मी आता काय करू? मला कंटाळा आलाय आणि मला भूक
लागलीये’ ही वाक्य ऐकावी लागणार नाहीत म्हणून मातोश्री खूषच होत असाव्यात.
आजीकडे पोहोचल्यावर दारातूनच ‘आजी’ अशी जोरात हाक मारत घरात जायचं आणि मग महिनाभराचं
ते आनंदपर्व! इतक्या दिवसांनी नात भेटली त्यामुळे आजी पण आनंदात असायची आणि तिचा हसरा
चेहरा बघितला की बास!! जिंकलो. चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवणारी ही व्यक्ती म्हणजे देवच
होता; दुसरं तिसरं कोण असणार?
आजीकडे दिवस इतके मजेत जायचे. मातीचा चिखल करून त्यात खेळणे, साबणाच्या पाण्याचे फुगे करणे अशा गोष्टी करायला तीही बरोबर असायची. तिच्याकडून खाण्यापिण्याचे लाड करून घ्यायला सोबत आंबे, कैरीचं पन्ह, लोणची, मुरंबे
सज्ज असायचेच. त्यातही दुपारी तीन वाजता काहीतरी खास पदार्थ असायचा. त्या वेळेला
ती मधली सुट्टी असंच म्हणायची. मग मधल्या सुट्टीत कधी आईस्क्रीम, कधी पुडिंग, कधी कुल्फी,
कधी फ्लेवर्ड बटर असे घरात बनवलेले अनंत प्रयोग असायचे. त्यानंतर मात्र काहीतरी वाचन, लेखन, कोडी, स्पर्धा अशा गोष्टी चालायच्या.
तिला कोडी घालायला प्रचंड
आवडत. शब्दकोड्याचाच प्रकार हा पण तोंडी. ती एक आडनाव मनात धरणार, आणि ते समोरच्याने
ओळखायचं उदा. एक ७ अक्षरी आडनाव आहे ज्यातली पहिली ३ अक्षरं घेतली की एक ग्रह होतो.
चौथं आणि पाचवं घेतलं की फेऱ्या किंवा चकरा असा अर्थ तर ५,६ आणि ७ वं अक्षर घेतलं की तयार
होतो एक नैसर्गिक आवाज. असे तिचे भन्नाट क्लू आणि ते ती एकदाच सांगणार. त्यात ते लक्षात
ठेवून उत्तर द्यायचं. कधीकधी तर अख्खा दिवस गेला तरी कोडं सुटायचं नाही. क्वचित आपण
तिला कोडं घातलच तर, ही दुसरा क्लू सांगेपर्यंत ती उत्तर द्यायची. यात हरलो की मग सुटका
नव्हतीच. कारण लगेच सामान्य ज्ञानाचा तिचा पेपर तयार असायचा. ५ नेत्यांची नावे सांगा
... ५ संत, ५ कवी, ५ लेखक असं करत करत आमची गाडी ५ क्रांतिकारकांपर्यंत पोहोचायची.
आम्हीही तीच वाट बघत असायचो कारण त्यानंतर त्यांची एखादी गोष्ट आम्हाला नक्की ऐकायला
मिळायची.
सुट्टी आहे म्हणून उशिरा उठा दिवसभर टीव्ही पाहत पडून राहा असलं
काही आजीला पटायचं नाही. उलट ह्या वेळचा किती चांगला उपयोग करता येईल यासाठी तिच्याकडे
अनंत कल्पना असायच्या. आजीनी लवकर उठायला सांगितलं की आम्ही नातीसुद्धा अगदी निमूट
लवकर उठायचो. एरवी आईसाठी तेच काम अतिशय कष्टप्रद होतं. सकाळी उठल्यावर जमिनीवर पावलं
ठेवण्यापूर्वी आजी दोन श्लोक म्हणत असे.
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्दं प्रभाते
करदर्शनं!
तिचा देवावर ठाम विश्वास
होता तितकाच देवाने आपल्याला दिलेल्या शरीरावर. देवाने हे शरीर घडवलंय ते किती विलक्षण
आहे, मानवनिर्मित प्रत्येक यंत्र अस्तित्वात येण्यापूर्वी आपल्या शरीराच्या आत ते केंद्रित
आहे जशी बोटांची क्रेन, दाताचा ग्रांईंडर, डोळ्याचा कॅमेरा असं ती सांगायची. आपण त्याबद्दल
कायम त्याचे ऋणी असावयास हवे. त्याच्याइतकीच जर कुठली श्रेष्ठ गोष्ट या जगात असेल
तर ती ही मायभू. तिच्या आशीर्वादाशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होऊच शकत नाही.
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे!
आजही जेव्हा कधीतरी पृथ्वी, जमीन,
मातृभूमी म्हणून या धरणीमातेविषयी विचार मनात येतो, तेव्हा कायम आठवतं ते तिचं दररोज
मनापासून या धरेचे आभार मानणं. आजीची आणखी एक कविता तिने ८१व्या वर्षात पदार्पण केलं तेव्हा
लिहिलेली : कशी सुटू पांडुरंगा? इकडे क्लीक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा