कंटाळा म्हणजे आळस नाही!!

दिवसाला असं सकाळी सकाळी उठवायचं
डोळे चोळून चोळून गदागदा हलवत जागं करायचं
तोही मग ओढल्यासारखा रखडत रखडत उभा राहतो
कशाचच काही वाटत नसल्यासारखा तेच तेच करत राहतो
बरं वाईट राग लोभ आशा निराशा यांच्या पल्याडची शांतता
त्याला ढकलून ढकलून संध्याकाळच्या स्वाधीन करायचा
वाटच बघत तोही चक्क सज्ज होतो उत्साहानं संपायची सुरुवात करायला
समजावतो स्वतःला ‘कंटाळा म्हणजे आळस नाही.’
प्रचंड तुडुंब अशक्य अचाट अफाट की काय म्हणतात तसला कंटाळा
चारी दिशांनी वेगानी चाल करून येतो
तेव्हा त्याची बारीकशी पुरचुंडी करून
तिला मग एक टिचकी मारून फेकून देतो तो
दूर कुठेतरी अनवगत अशा पोकळीत किंवा
अदृश्य करणाऱ्या त्या आईनस्टाईनच्या काळ्या विवरात
सगळा मॅटर खलास झाल्याच्या आनंदात असणाऱ्या दिवसाला
तो कंटाळा मग दात विचकत खदाखदा हसत बसतो अँटीमॅटर बनून

टिप्पण्या