जे ऐकायला मिळू नये असं सध्या बातम्यातून सगळं ऐकायला आणि बघायला मिळतंय.
स्वदेश, स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा याविषयीचा असणारा सार्थ अभिमान चालू
घडामोडी बघून अस्वस्थ करून सोडतो. त्यातूनच विवेकानंद, रामकृष्ण यांची आठवण होते.
त्यानिमित्तानं शिवाजीराव भोसले यांनी विवेकानंद या विषयावर दिलेलं व्याख्यान
ऐकलं. समाधान होईना म्हणून सर्च चालूच ठेवला. तर अविनाश धर्माधिकारी यांच्या
निरनिराळ्या भाषणांची यादीच हाताशी आली. त्याचे विवेकानंद ऐकले. मग सावरकर. ही
दैवत होतात न होतात तोच त्याचं महात्मा गांधी याविषयावरील भाषण समोर येऊन ठाकलं. संघाच्या
हितचिंतकाला साजेसे विचार घरातून कायमच अवतीभवती होते त्यामुळे असेल किंवा निव्वळ शाळेत
सविनय कायदेभंग किंवा दांडीचा सत्याग्रह या विषयावर लिहिलेल्या मोठ्ठ्या उत्तरांना
कधीही मार्क मिळाले म्हणून असेल. महात्मा गांधी हा विषय तसा वर्ज्य राहिला.
या भाषणात मात्र सुरुवातच अशी होती ही कोणाहीबद्दल पूर्वग्रह करण्यापूर्वी त्याचा
अभ्यास करावा आणि मग मत तयार करावं. हे मनोमन पटलेलं वाक्य. मग पूर्णतः भाषण ऐकून ठरवलं
की वाचून तर बघूया एखादं पुस्तक. विनाकष्ट मोफत उपलब्ध झालं ते ‘सत्याचे प्रयोग’ हे
पुस्तक. पटवर्धन यांनी केलेला हा मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. पूर्वी केवळ अनुक्रमणिका
वाचून बाजूला ठेवलेलं हे पुस्तक वाचायला घेतलं. त्याबद्दल थोडसं लिहिते.
या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या आयुष्यातले बालपण, तरुणपण, त्यांचे दक्षिण आफ्रिकेतील
अनुभव, तेथील स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा सहभाग आणि त्यानंतर भारतात आल्यानंतर भारतीय
स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी केलेला प्रवेश यावर ते लिहितात. या पुस्तकात १९२१ पर्यन्तचा
कालखंड विचारात घेतलेला असल्याने ते आत्मचरित्र नाही तर त्याचा काही भाग आहे.
त्यामुळे भारतातील त्यांच्या कामाचे कित्येक संदर्भ वाचावयास मिळत नाहीत.
वयापरत्वे सामोऱ्या येत गेलेल्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला, मोहाच्या,
त्राग्याच्या आणि त्यागाच्या प्रसंगात त्यांचं जे मानसिक द्वंद्व झालं आणि ते त्या वेळी
सत्यासाठी किंवा सत्यामुळे कसे वागत गेले यातून त्यांच्यातील ‘माणसाची’ ते ओळख करून
देतात. शाकाहार व नेचरोपथी यावरील यांचा ठाम विश्वास व त्याचे केलेले प्रयोग यांचे
विस्तृत उल्लेख आणि स्वतःची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न येथे दिसून येतो.
शिक्षणासाठी भारताबाहेर गेल्यानंतर तेथील शैक्षणिक ज्ञान आणि आजूबाजूच्या जनसमुदायाकडून
मिळवलेलं व्यावहारिक ज्ञान याबद्दल लिखाण केलेले आहे. तसंच हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन
लोकांचा लाभलेला सहवास त्यांच्याशी झालेलं धर्माबद्दल आदानप्रदान आणि त्यामुळे त्यांच्या
जाणिवांत झालेले बदल यातून ते मांडतात. रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून केलेला दक्षिण
आफ्रिकेतील प्रवासाचा अनुभव, त्यानंतरचे त्यांचे वर्तन आणि त्यांच्या ठायी असणारी
शक्यतो नमतं घेण्याची तयारी ही कदाचित सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गांची नांदी असावी
असे वाटते.
भारतातील त्यांच्या कार्याची सुरुवात करताना गोखल्यांचा त्यांच्या कामाला असणारा
पाठींबा आणि विश्वास ते आवर्जून उल्लेखतात. व भारतात काम करायचे असल्यास आधी संपूर्ण
भारतभर फिरून तेथील समस्यांची ओळख करून घ्यावी न नंतर कामास सुरुवात करावी या त्यांच्या
सल्ल्याला मानून त्यानुसार भारतभर भ्रमण करताना घेतलेल्या अनुभवांना ते मांडतात. याव्यतिरिक्त
गुजरातमध्ये सुरु केलेला आश्रम व चम्पारण येथील सत्याग्रहाचे सारांशात्मक लेखन केलेले
आहे.
अतिशय सामान्य माणसासाठी स्वातंत्र्यलढ्यात करण्याजोगे काम शोधून देण्याची ताकद
असलेला आणि त्यासाठी त्याच्याबरोबर उभे राहून ते काम करण्याची तयारी असणारा हा मार्गदर्शक होता. ही कामे सुरु करवून ती सहजी इतरांच्या
हाती देवून नवनवीन कामाचं स्वप्न पाहू शकणारा व ते पूर्ण होऊ शकेल याची आशा धरू असणारा असा हा नेता होता. वाचल्यावर वाटलं, एखाद्या नेत्याबद्दल पूर्वग्रह करून घेण्यापूर्वी त्याचं किंवा त्याच्याविषयीचं
लेखन तटस्थपणे वाचयला हवं एवढं मात्र नक्की.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा