विज्ञानाची शिडी

“चला, संपली परीक्षा! विज्ञानाचे पेपर इतक्या उशिरा का ठेवतात यार? अख्खी परीक्षा होईपर्यंत टेन्शन नुसतं.” असं म्हणत म्हणत सुहास आणि तुषार परीक्षा वर्गातून बाहेर आले. तुषार वर्गातला हुशार विद्यार्थी, वर्गात कायम पहिला येणारा. त्याच्या या गुणामुळे इतर मुलांमध्ये तो जरा नावडता. परिणामी त्याला सगळे ‘रट्टू’ म्हणून चिडवतसुद्धा. तर सुहास हुशार पण पाठांतर आणि घोकंपट्टी करण्यात बाद त्यामुळे मार्कांच्या यादीत एकदम मागे. तुषारने बाहेर आल्यावर लगेचच बॅगमधून मोबाईल काढला आणि आईला ‘पेपर ..फर्स्टक्लास!’ असा मेसेज पाठवला. सुहासने तिरकस हासत पेपरबद्दल चर्चा सुरु व्हायच्या आत तिथून पळ काढला आणि तो थेट घराकडे निघाला.
घरी गेल्या गेल्या आई विचारणार ‘काय, कसा काय होता पेपर?’ तेव्हा काय उत्तर द्यायचं? असा विचार करत दप्तराच्या बंदाशी खेळत खेळत स्वारी रस्त्यावरून चालत निघाली. कसला पेपर? एक टीप धड लिहिता नाही आली की थोडक्यात लिहायचं मोठ्ठं उत्तर आठवलं नाही. फरक लिहा तेवढा झकास होता. कितीही अभ्यास केला न तरी विज्ञानात अज्ञानच राहणार बहुतेक माझं, त्यापेक्षा इतिहासतल्या गोष्टी आणि  भूगोलातले नकाशे बरे.
चालत चालत बसच्या थांब्यापाशी पोहोचला. तेवढ्यात नेहमीप्रमाणे खच्चून भरलेली बस आली. आता या गर्दीतून तासभर उभं राहून घर गाठायचं होतं. जरा वेळ गेला आणि बस सिग्नलपाशी थांबली. थांबली कसली बंदच पडली. यांत्रिक बिघाडामुळे सगळ्यांना बाहेर पडावं लागलं. कंडक्टर आणि ड्रायव्हर एकेक करून सगळ्यांना तेच तेच उत्तर देत होते. ‘रस्त्यावर आधीच प्रचंड ट्राफिक त्यात बंद बस आणि अचानक सैरावैरा बाहेर निघालेली चांगली ५०-६० लोकं यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन गेली. त्या बसनी दोहो बाजूंची कित्येक वाहने थांबवली होती. भर रस्त्यात बंद पडलेली बस, आणि रागावलेली माणसं यांना रस्ता दाखवायला ३-४ पोलीससुद्धा येऊन हजर झाले. या सगळ्या गडबडीत फार वेळ जाणार त्यापेक्षा चालतच लवकर पोहोचू म्हणत सुहासने फुटपाथ गाठला.
कोणीतरी फोनाफोनी करून उशीर होणार कळवत होतं, कोणी तिथेच गाडीच्या आत बसून कॉम्प्युटर उघडून कामाला सुरुवात केली. कोणी भांडण करत होतं तर कोणीतरी जांभया देत होतं. सगळ्यांचाच वेळ वाया चाललेला होता. एक बस बंद पडली तर केवढा गोंधळ!
इकडे सुहासच्या मनात आता वेगळेच विचार यायला लागले. ‘बापरे! यंत्राशिवाय कसं होणार आपलं? सकाळी उठल्यावर बंद केलेलं गजराचं घड्याळ, युनिफोर्मला केलेली ईस्त्री, आईचा स्वयंपाकसोबती रेडियो, ताईचा कॉम्प्युटर, बाबांच्या हातातला सतत ठणाणा करणारा मोबाईल. या सगळ्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे आणि ती अशी गरजेच्या वेळी बंद पडून कशी चालतील? आपल्या आयुष्यातल्या या सोई, हा सुटसुटीतपणा यंत्राशिवाय किती अवघड होऊन बसेल. रस्त्यावरच्या या आजकालच्या गाड्या आपला किती वेळ आणि श्रम वाचवतात, सध्याच्या जीपीएस ने सज्ज असणाऱ्या गाड्यांना तर गाडीच मार्ग सुद्धा दाखवते. एवढच कशाला हळूहळू तर ड्रायव्हररहित गाड्या सुद्धा चालू लागतील. विज्ञान कुठच्या कुठे जाऊन पोहोचलंय, एक क्षेत्र असं राहिलेलं नाही ज्यात प्रगती होत नाहीये.’
एव्हाना तो घराजवळ आला. त्याने दारावरची बेल वाजवली खरी पण दार उघडलं जाणार याहीपेक्षा ‘बेल कशी वाजत असेल? एकदा उघडून बघूया का नक्की आत काय होतं?’ असले विचार येऊन गेले. मग आईचा ठरलेला प्रश्न आलाच त्याला ‘ठीक होता’ असं उत्तर देत त्याने थेट अभ्यासाची खोली गाठली. तेवढ्यात मागून आईचा आवाज आला, “सकाळी दूध फ्रीजमध्ये टाकायचं विसरलास नं, नशीब, थंडीच्या दिवसांत चार तास राहिलं बाहेर तरी नासत नाही.” आज डोक्यात वेगळीच चक्र सुरु होती त्यात आणखी एक भर पडली. ‘दूध नासतं? मग त्याचा थंडीशी काय संबंध? तापमान कमी असताना दुधात नक्की होतं तरी काय?’ त्याच तिरीमिरीत त्यानी खोलीतलं कपाट गाठलं, “संपली न परीक्षा?” म्हणत ताईसाहेब हातात भेळेची डीश घेऊन हजर झाल्या. भेळ खाण्यापूर्वी ती खावी हा विचार न येता वाटून गेलं, ‘या वेगवेगळ्या चवी देणाऱ्या पदार्थांचे गुणधर्म बदलतात तरी कसे? रंग, रस, गंध याचा आणि ‘रसायनाचा’ किती जवळचा संबंध? काही रसायने शरीराला चांगली तर काही वाईट. काही औषधी तर काही ठार विषारी! या असल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आज कित्येक रोगांवर औषधं शोधताहेत आणि त्यामुळे अवघ्या मानवजातीचा फायदा होतोय. वैद्यकीयशास्त्राने जी प्रगती होतेय त्यामुळे मानवाचं आयुर्मानही वाढत चाललेलं आहे.’
तेवढ्यात ताई “काय मग आज TV समोर ठाण मांडून नाही बसलास अजून?” असं चिडवत निघून गेली. मानवजातीपर्यंत पोहोचलेल्या सुहासच्या गाडीचे रूळ एकदम बदलले आणि गाडी TV वर येउन थांबली, ‘आता हा TV, त्याची स्क्रीन, त्यावरचं चित्र, त्याच्या केबल्स, त्यांना मिळणारा सिग्नल, तो पाठवणारा सॅटेलाईट पण हे सगळं जुळवून आणणारे कोण तर हे चॅनेल, ते शूट कुठे करतात आणि त्या फिल्म आपण कुठे बसून बघतो.....अरे देवा! हे सगळं किती विलक्षण आहे!’ या विचारात तो असताना त्यानं विमानाचा आवाज ऐकला. तो धावतच खिडकीजवळ गेला. विमान ही त्याची अत्यंत आवडती गोष्ट. पक्षासारखं उडत जाणाऱ्या विमानाबद्दल त्याला कायम कुतूहल वाटायचं. उंच आभाळात उडणारं ते विमान नाहीसं झाल्यावर त्याचं लक्ष चंद्राकडे गेलं, मग बुध, शुक्र, मंगळ लगेचच ओळखता आले. ‘पृथ्वीसारखा दुसरा एखादा ग्रह, भारतानं पाठवलेलं मंगलयान, जर खरच अशी जीवसृष्टी दुसऱ्या ग्रहावर असेल तर?’ आज अचानकपणे आपण डोळस झालो की काय असंच त्याला क्षणभर वाटून गेलं.

‘विज्ञान आहे म्हणून हे सगळं आहे. ज्ञानाचा एवढा मोठ्ठा डोंगर समोर आहे त्यासाठी विज्ञानाची शिडी घेण्याशिवाय पर्याय नाही. ती शिडी आपल्या समोर असताना आपण त्यावर चढायचं की नाही असा विचार करतोय, ‘छे.. छे..  असं कसं करून चालेल? विज्ञान नुसतं पाठ करून चालायचं नाही तर ते समजूनही घ्यायला हवं आणि कळायलाही हवं.’ असं म्हणत म्हणतच तो कॉम्प्युटरसमोर जाऊन बसला. गुगलची विंडो त्यानं उघडली आणि त्यात ‘science+new+learning’ हे शब्द टाईप केले.   
सुहाससारख्या जुज्ञासू मुलांसाठी पुण्यात मंथन विज्ञान जत्रा आयोजित केली जाते त्याविषयी जरूर माहिती करून घ्या.
शिक्षणविवेक फेब्रुवारी २०१६

टिप्पण्या