परवा मोबाईल
स्क्रीनवरून भटकत भटकत मी एका फोरमवर पोहोचले. त्यात चर्चा चालू होती लहान
मुलांच्या गाण्यांबद्दल. या फोरमवर बऱ्याचशा मराठी मुली ज्या परदेशी राहतात व
ज्यांची मुले लहान आहेत अशा मिळून साऱ्याजणी जुनी गाणी शेअर करीत होत्या. कोणी अटक
मटक चवळी चटक, कोणी अबडक खबडक घोडोबा, इथे इथे बस रे मोरा असं आठवून आठवून पाठवत होतं....
मध्येच कोणीतरी शुभं करोति चं लिरिक्स मागितलं आणि ती लिंक मग तुटली होती.
खरोखर किती गमतीशीर
गाणी आहेत ही ऐकायला आणि म्हणायला. पण या गाण्यांचा उगम किंवा हेतू काय बरं असेल?
अहो काय असणार? आपलं ते दुडूदुडू धावायला लागलेलं पोर एका जागी शांत बसवायचं तरी कसं?
म्हणून तर या गाण्यांचा शोध लागला असेल...एक हात धरून इथे इथे बस ग चिऊ ...म्हणत दोन
मिनिट का होईना आई विश्रांती घेत असणार.
तसाच हा भटो भटो,
कुठे गेला होतात? कोकणात. मग तिकडून काय आणलं? फणस. कापा की बरका ..? कापा. हे इतकं
सगळं निमूट ऐकताना खट्याळपणा बाजूला ठेवत ते चिमूरड शांत बसून राहतं.
लहान मुलांना आपण ही
वेगवेगळी ऐकवलेली गाणी त्यांना इतकी आवडतात तरी का? म्हणजे ती गाणी किंवा कविता यातलं
संगीत आपल्याला त्यांच्याशी जोडतं की शब्द? आपल्याला जमेल त्या उच्चारात ही पिल्लं
आपल्या पाठोपाठ कधी ‘सांग सांग भोलानाथ ...’ म्हणायला लागतात कळतही नाही.खरं तर त्यानंतर
बुगू बुगू करणारा तो नंदीबैल बहुतेक त्यांना ऐकायचा असतो. ‘झुकू झुकू झुकू आगीनगाडी’
म्हणत घरभर फिरायला त्यांना मजा वाटत असते. ‘शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली
सभा ..’ असं म्हणतात तेव्हा आजूबाजूच्या प्राण्यांशी त्यांची छान ओळख होत असेल कदाचित
आणि म्हणूनच त्यांना ही गाणी हवीहवीशी वाटतात.
पक्ष्यांचं,
प्राण्यांचं आणि आपलं नातं कसं असतं नं? म्हणजे आपण लहान मुलांना ‘माणसं कशी बोलतात?..’
अ आ ई असलं काही शिकवत नाही. तर चिऊ कसं म्हणते? चिव चिव, काऊ काय म्हणतो? काव काव,
भूभू कसा ओरडतो? भो भो असं सगळं शिकवतो आणि त्याचं निरीक्षण करायला सांगतो. आणि यात
भाषेचा अडसर नसतो, कारण इंग्लिश ओल्ड मॅक्डोनाल्डसुद्धा सगळ्या प्राण्यांची ओळख करून
देतो ते या विविध प्राण्यांच्या आवाजाबरोबरच.
भन्नाट असतात खरच ही
बालगीतं. असावा सुंदर चाकलेटचा बंगला मधलं टॉफीचं दार, लेमनच्या खिडक्या हे या मुलांना
किती सहज कल्पनेत रंगवता येऊ शकतं? चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी याची कल्पनाही
तेच करू शकतात. त्यांनाच वाटू शकतं की एखादा वाघ चंद्रावर जाऊन पाणी पीत असेल, एखाद्या
सायकलवरून उडत जाता येईल किंवा गोष्टीतला राजा म्हणजेच आपला बाबा असेल. कित्ती सुंदर
असतं त्यांच्या काल्पनेतलं विश्व.
मगाशी म्हणाले तशी या
प्रकाराला भाषेची मर्यादा नाहीच. मराठीच नाही तर इंग्लिश बालगीतांची आठवण झाली. Baba black sheep, incy wincy spider, jack and jill,
London bridge is falling down यासारखी कित्येक nursery
rhymes प्रत्येकाला तोंडपाठ असतातच. कधीतरी
तुलना केली दोन्हीत या सगळ्या गाण्यात कल्पनेपेक्षा वास्तव अधिक दिसून येतं हेही कळेल.
पण परवा सहज म्हणून ह्या गाण्यांविषयी वाचलं तर कळलं की यातल्या कित्येक कविता
बालगीतं नव्हेतच तर ती त्या त्या काळात रचल्या गेलेल्या कविता आहेत. Baba black sheep एका राजाने कर वाढवले तेव्हाची आहे तर ring a ring a roses एका प्लेगच्या साथीविषयीही आहे. humpty dumpty यातला हे पात्र कोण ते अजून कुणालाच कळलेलं नाही. म्हणजे खरं तर म्हणजे वरवरच्या अर्थापेक्षा
या कवितांचा खरा अर्थ खूपच गूढ आणि गंभीर आहे. आणि आपण मात्र ती गीतं तालासुरात म्हणत
त्याची गाणी म्हणूनच मजा घेत असतो.
बापरे! असलं काही वाचलं की कल्पना आणि वास्तव यातला फरक अंगावर येतो. चूक की बरोबर, खरं की खोटं असे अनुत्तरीत प्रश्न समोर यायला लागतात.
छे: .... कुठून सुरुवात केली आणि कुठे जाऊन पोहोचले?
बापरे! असलं काही वाचलं की कल्पना आणि वास्तव यातला फरक अंगावर येतो. चूक की बरोबर, खरं की खोटं असे अनुत्तरीत प्रश्न समोर यायला लागतात.
छे: .... कुठून सुरुवात केली आणि कुठे जाऊन पोहोचले?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा