एक भव्य सभागृह. त्यात कित्येक आसनं. त्यावर स्थानापन्न झालेले अनेक दिग्गज
भारतीय नेते. समोरच्या बाजूला उच्चासन ज्यावर संसदेत स्पीकर बसतात ते. या उच्चासनावर
एक दूरदर्शक आहे. टीव्ही म्हणूया आपल्या कल्पनेसाठी. कारण हे सभागृह आहे स्वर्गातलं.
समोर सर्व भारतीय नेतेमंडळी बसलेली. स्वतःसाठी नाही तर देशाच्या भल्यासाठी
झटलेली. देशाच हिताहित काय झालं ते पाहिल्यावाचून राहवत नाही त्यांस. दररोज पहात
असतात देशाचा वर्तमान. आता या साऱ्यांचा एक पक्ष, पक्षाचं नाव हिंदुस्थान पक्ष आणि
त्याचं ध्येय ‘हिंदुस्थानचं सम्रृद्ध भवितव्य’.
उच्चासनावर सज्ज थेट
प्रक्षेपणावरून काही वाक्य ऐकू येत आहेत. देशभक्तांच्या वाटण्या केल्या जाताहेत.
ऐकूनच सारे नेते कावरेबावरे आणि उद्विग्न. सावरकर आणि गांधी एकमेकांकडे बघतच राहिलेत. त्यांची
नजर जवळच स्थानापन्न झालेल्या राजीव गांधींकडे जातेय तर त्यांनी एक हात डोक्याला टेकवलेला.
त्यांचे आजोबा नेहरूजी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आणि त्यांच्या मातोश्री
चक्क त्या टीव्हीवरील प्रक्षेपण बंद करायला तिकडे जायला निघालेल्या.
हा सगळा प्रकार होतो न होतो तोच टीव्ही बंद होऊन आकाशवाणी ध्वनित झाली. या
देशभक्तांच्या वाटण्या आणि देशभक्तीची टक्केवारी हे सगळं कसं ठरतंय? पूर्वी
मांडलेल्या विचारांच्या आधारे सध्याच्या परिस्थितीला अनुसरून नवीन विचारांची पुनर्मांडणी
करायची की ह्तबल होऊन जुनी पाळंमुळं उकरून काढत देशवासियांची दिशाभूल करायची? हे चालू तरी काय आहे?
स्वर्गस्थ झाल्यापासून ही मंडळी फक्त बघतात हे सारं आणि नजरेनेच बोलतात
एकमेकांशी. कित्येकदा तर डोळे बंदही ठेवतात. हेतू हाच असेल कदाचित की हे असलं काही बघावं
लागू नये आणि एकमेकांची नजरानजरही होऊ नये!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा