भाषेचे बारकावे टिपणारं ते अजरामर असं नाटक. दरवर्षी
एखाद्या शालेय स्नेहसंमेलनात, एखाद्या क्लबच्या कार्यक्रमात नाहीतर कुठल्याशा हौशी
कलाकाराकडून या नाटकातली कित्येक स्वगतं आपली म्हणून बोलली गेली असतील. कुठल्याही
जाहिरातीशिवाय वाटणारा आपलेपणा त्या कलाकृतीत आहे हाच तिचा विजय असेल असेल कदाचित
आणि म्हणूनच तिचं तारुण्य टिकूनही असेल.
लहान असताना पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याची जसजशी ओळख झाली, तसं हे पुस्तक हातात आलं . प्रत्येक मराठी वाचक हे पुस्तक वाचतोच. तसंच
माझंही झालं. पुस्तक वाचलंच पण तेव्हा भक्ती बर्वे यांनी सादर केलेली फुलराणी मला
बघायलाही मिळाली. त्या अभिनेत्रीची भाषेवरची पकड, शब्दांवर गाजवलेलं अधिराज्य आणि
अख्खं स्टेजभर असा वावर की प्रत्येक प्रेक्षक त्या जागेचा एक भाग आहे आणि तो
प्रयोग त्यातलं एक पात्र बनून अनुभवत आहे असं वाटावं. आजही ती स्वगतं आठवून
भारावल्यासारखं होतंय.
आज कित्येक दिवसांनी या नाटकाची आठवण झाली ती परवा हेमांगी
कवी ही फुलराणी पुन्हा साकारतेय असं वाचनात आलं त्यामुळे. मध्यंतरी माय फेअर लेडी
या सिनेमाशी साधर्म्य दाखवत नव्या रुपात आलेली अमृता सुभाषने साकारलेली फुलराणी
बघितली होती. तुलना झालीच तेव्हाही आताही होईल पण त्यातही काहीतरी नवीन असावं अशी अपेक्षा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा