पिग्मॅलियन

‘पिग्मॅलियन’ या नाटकाचे नाटककार आहेत जॉर्ज बर्नॉर्ड शॉ. हे नाटक प्रथम सादर केलं गेलं १९१३ मध्ये. पिग्मॅलियन हे नाव आहे एका ग्रीक शिल्पकारचं, ग्रीक पुराणात असं म्हणतात की  हा पिग्मॅलियन त्याच्या एका शिल्पाच्या प्रेमात पडला आणि ते शिल्प जीवित झालं. यावरून प्रेरित होऊन शीर्षक दिलं गेलं असावं.
हे नाटक घडतं युरोपमध्ये. साधारण २० व्या शतकाचा हा काळ. या नाटकातील दोन प्रमुख पात्र आहेत एक उच्चारशास्त्राचा प्राध्यापक आणि दुसरी म्हणजे एक फुलं विकणारी मुलगी. साधारण पन्नाशीचा अविवाहीत प्राध्यापक ‘प्रोफेसर हेन्री हिगिन्स’ आणि ही एक तरूण फुलं विकणारी मुलगी ‘इलायझा डूलिटील’ यांची एकदा रस्त्यातच भेट होते. ती नेहमीप्रमाणे तिचा व्यवसाय करतेय, कोणी टॅक्सीची वाट बघतोय , कोणी पाऊस थांबतोय का विचारतोय असं चालू असताना हा प्राध्यापक जे काही ऐकू येईल ते एका वहीत टिपून घेत असतो. लोकं आश्चर्य व्यक्त करतात तर हा उलट त्यांनाच आजूबाजूच्या प्रत्येकाचं जन्मस्थान किंवा राहती जागा त्यांच्या नुसत्या बोली भाषेवरून ओळखून सांगतो. हल्ली इंग्लिशची इतकी वाताहात होत चाललेली आहे की कोणीही धड बोलू शकत नाही मला जर ह्या मुलीला सहा महिने शिकवायची संधी मिळाली तर मी हिला एका राजकन्येइतकं बदलू शकेन. बाजूलाच पिकरिंग नावाचे गृहस्थ हे पाहत असतात, हे स्वतः आहेत भाषाशास्त्र जाणणारे त्यामुळे थोडी शंका घेत त्याची ओळख करून घेतात तेव्हा मात्र या दोघांच्या विषयांचे धागे इतके जवळचे असल्याचे त्यांना जाणवतात की हा प्राध्यापक त्यांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण देतो.
 त्या प्राध्यापकाच्या तोंडून आलेले ते उद्गार एलायझाला कुठेतरी मनात पटतात आणि तिलाही वाटून जातं की आपण चांगलं बोलू आणि आपल्याला एखाद्या फुलांच्या दुकानात बसून जसं मुली फाडफाड बोलू शकतात तसं छान बोलता येईल. या विचाराने ती आपणहून या प्राध्यापकाकडे येते ती त्याच्याकडे बोलण्याचे धडे घेण्याच्या उद्देशाने. पुढे ती या प्राध्यापकाच्या आधी मारलेल्या पैजेला खरं उतरायला तयार होते आणि त्याच्याकडून राजघराण्याला शोभतील असे वागण्याबोलण्याचे शिक्षण घेऊ लागते. मध्यंतरीच्या काळात तिचे वडिल या प्राध्यापकाच्या घरी येउन चक्क काही पैसा मोबदला म्हणून घेऊन जातात.
तिला वागण्यातल्या खाचाखोचा सांगणारा हा प्राध्यापक स्वतःच बऱ्यापैकी बेशिस्त असतो पण भाषेची त्याला उत्तम जाण असते. पिकरिंग मात्र सर्वाना आदर देणारा आणि सर्वांशी नम्रपणे वागणारा असतो. तिची पुरेशी तयारी करून घेऊन हे दोघे तिला वेगवेगळ्या समारंभात एक उच्च घराण्यातील स्त्री म्हणून मिरवून आणतात. त्यावेळी एकदा कशी फजिती होते व एकदा ते कसे त्यातून सहीसलामत बाहेर पडतात असं नाट्य रंगत जातं. अशाच एका समारंभात भेटलेला एक तरुण ‘फ्रेडी’ या एलायझाच्या प्रेमात पडतो.
या सगळ्या खेळाचा अंत जेव्हा जवळ येतो आणि ही मुलगी जेव्हा खूप बदलून एक कुलीन उच्चभ्रू स्त्रियांसारखी वागू बोलू लागते तेव्हा हे दोघेजण स्वतःच्या कर्तुत्वाचं कौतुक करीत बसतात, हे काम किती अशक्य होतं आणि आपण ते कसं केलं, आपल्याला हे पुन्हा पुन्हा तेच तेच शिकवताना हळूहळू किती कंटाळा येऊ लागला होता यावर चर्चा करतात. त्या मुलीकडे असणारी उपजत नम्रता, तिची शिकून घेण्याची, लक्षात ठेवण्याची आणि बदलण्याची तयरी यावर तिचं काहीच कौतुक किंवा वाच्यता करीत नाहीत. यावेळी मात्र ती हा प्रयोग थांबवून निघून जाते आणि ते जेव्हा तिला विचारायला येतात तेव्हाही ती त्यांच्याबरोबर परत येण्याचं नाकारते; यावेळी प्राध्यापक हेन्रीला हिने परत यावं असं वाटत आहे नव्हे ती येईल अशी त्याला खात्रीही वाटते. पण एलायझा मात्र अव्यक्त मैत्रीचा प्रेमाचा धागा मनात ठेवते आणि फ्रेडीशी लग्न करणार असल्याचं वास्तव जाहीर करते.
अशी ही कथावस्तू आपल्याला प्रेमकथा असल्याचा भास नक्की करवून देते. यां नाटकाबद्दल असं सांगितलं जातं की हा शेवट बदलावा यासाठी लोकाग्रहास्तव पुढे यात बदल करण्यात आले. परंतू नाटककार मात्र यावर फार वास्तववादी उत्तरं देतो, त्याकाळातील ब्रिटीश वर्गप्रणाली, त्यातील अंतर व स्त्रीयांना असणाऱ्या संधी, त्यांचं मर्यादित स्वातंत्र्य याविषयीची परखड बाजू मांडत या नाटकाचा शेवट योग्य असल्याचे प्रतिपादन करतो.

टिप्पण्या