संन्यस्त खड्ग

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं हे एक संगीत नाटक. भाषेचं माधुर्य सुयोग्य शब्दांच्या आणि समर्थ विचारांच्या पायावर उभं राहिलं की अधिकच खुलून यावं तशी ही एक विलक्षण कलाकृती ज्यात भाषेचं सौंदर्य आणि सामर्थ्य तर आहेच आहे पण याच विषयावरील वैचारिक उहापोह्देखील आहे. संन्यास व संसार याविषयीची मतमतांतरे व विरोधी दृष्टीकोण यात मांडलेला आहे. नाटकातील गीते कथेला पूरक आणि पुढे नेणारी आहेतच. किंबहुना 'शतजन्म शोधिताना' हे गाणं ऐकून हे कोणी लिहिलं आणि कुठल्या नाटकात हा शोध मला या नाटकाकडे घेऊन आला. या शब्दांची उंची इतकी आहे की काव्यांची थोरवी निराळी पटवावी लागत नाही. या पुस्तकाचं परीक्षण न करता नाटकाची कथा सारांशरुपाने लिहीत आहे.
नाटकाची सुरुवात होते तेव्हा सिद्धार्थ(गौतम बुद्ध) हे त्यांच्या जन्मभूमीला म्हणजेच शाक्य राज्याची राजधानी कपिलवस्तू येथे जायला निघालेले आहेत.  त्याचं वाटेवर ते कौडीन्याशी जन्म-मृत्यू,जरा-व्याधी यासारख्या महादु:खांपासून दूर जात मुक्ती मिळवण्यासाठी त्याने कोणते तप केले याबद्दल बोलत ते दोघे पुण्यप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या विविध तपाचरणाचं दर्शन घेतात. सिद्धार्थ त्यास सांगू पाहतो की ज्या देवाला आपण खाऊन पिऊन सुखी आनंदी निरोगी राहावं असं वाटत असेल त्या देवासाठी उपासतापास देहदंड इत्यादी गोष्टी करणे काही योग्य नव्हे. 
शाकंभट आणि क्षारा हे कपिलवस्तूमधील एक पुरोहितांचं कुटुंब. वडिलोपार्जित पुरोहितांचा लौकिक या शाकंभटाला काही टिकवता आलेला नाही. याबद्दल त्याची बायको त्याला सदोदित दूषणे देते आहे व हा तिला स्वत:च्या तिचा पती असल्याचा दाखला देत तिने उंबरठा न ओलांडता त्यास केवळ पाठींबा देत राहावा असा पुरुषी अहंकार लादू पाहत आहे. तो  लबाडी करून लोकांस खोटे सल्ले देत, कुठकुठले विधी न ताईत देत का होईना कसाबसा स्वतःचा संसार ढकलीत आहे. सिद्धार्थ त्यांच्या नगरीचा राज्य सोडून संन्यास घेतलेला राजा आता परत तेथे येत असल्याची वार्ता न मिळालेला हा शाकंभट हा राज्य सोडून गेलेला राजा पुन्हा गृहस्थाश्रमात नक्की येतो कि नाही बघ असं म्हणत त्यास हिणवू बघत आहे. नाटकात शाकंभट हे पात्र त्याचा विरोधी दृष्टीकोण मांडताना दिसतं. 
सिद्धार्थ जेव्हा हे राज्य सोडून गेला तेव्हा तटाची दारे ज्या पहारेकऱ्यामुळे उघडी राहिली त्याला या आरोपातून वाचण्यासाठी उत्तर देतो; तू जरी पेंग येऊन निजला असलास तरी असे कबूल न करता जगास असे सांगावेस की, ''तू नेहमीसारखी दारे व्यवस्थित लावलीस खरी; पण कोण्या देवदूताने तुझ्या डोळ्यावरून हात फिरवला व म्हटले की मूर्च्छित व्हा व तुम्हास पुन्हा जाग आली तेव्हा पहाट झालेली व दारे बंदची बंद. भाबड्या श्रद्धावान लोकांचा लोकापवाद टाळायला चमत्काराची ढालच उपयोगी ठरते.'' संसार निभावून नेण्यासाठी किंवा निव्वळ जगण्यासाठी हे पात्र कुठलाही विधीनिषेध बाळगताना दिसत नाही उलट वास्तवातील कठोरातील कठोर सत्य स्पष्टपणे मांडत राहते.
सिद्धार्थाचे वडील राजा शुद्धोधन यांना सिद्धार्थ अर्थात भगवान बुद्ध नगरीच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्याची बातमी कळते व ते एका अस्पृश्य वस्तीतून येत आहेत असे कळते. ते ऐकताच हा क्षत्रिय रागाच्या भरात त्याकडे घोडा दौडवतो पण आपल्या विनयी पुत्रास समोर बघताच त्याच्या मनातून तो राग लोप पावतो. त्यास विचारतो की तू आता हे राज्याचा भार पुन्हा उचलण्यास सज्ज आहेस का? पण बुद्ध त्यास सांगतो की त्याला या अवघ्या जगताच्या कल्याणाचा भार वाहवयाचा आहे त्यामुळे तो राजमुकुट व राजाचा क्षत्रियधर्म दोन्ही पाळू शकत नाही. 
या राज्याचे सेनापती विक्रमदेव यांना मात्र निर्वाणाचा मार्ग जगतास उपदेशीत जे सहस्त्रावधी लोकांस संन्यास देत चालले आहेत त्या बुद्धांचा हा मार्ग लोकविघातक वाटतो. ते याविषयी बुद्धांशी चर्चा करतात. संसार, संन्यास, संन्याशाचा संसार, मठस्थ आणि गृहस्थ यातील भेदाभेद व एकंदरीत कृषी,कामिनी व कृपाण यांचा त्याग हा प्रमुख भेद यावर ते चर्चा करतात. हिंसा अयोग्य म्हणून तुम्ही कृषी करण्याचे टाळणार आणि त्यातूनच दुसऱ्या कोणी पिकविलेलं धान्य भिक्षा म्हणून ग्रहण करणार हा कोणता न्याय? अर्थाजन न करता लोक कल्याण कसे होणार? कृपाणाचा त्याग केल्याने राज्यास जो दुबळेपणा  येईल त्याचे काय यासारखे गंभीर प्रश्न विचारतो. त्यावर भगवान बुद्ध त्यास सांगतात संन्यासी भवभ्रमाचे जे रान साफ करतो तीच त्याने केलेली शेती. संन्यस्थाकडेही शस्त असतेच फक्त ते असते क्षमेचे.विक्रमाला मात्र ही अहिंसा आत्मघातकी वाटते. परंतू बुद्धाचा शस्त्रांचं युग जाऊन आता शांतीचं युग येणार असा विश्वास आहे आणि त्याच्या या विश्वासामुळे त्याने विक्रमालाही या संन्यासाची दीक्षा दिलेली आहे.
दरम्यानच्या काळात सुमारे चाळीस वर्षानंतर विक्रमाचा मुलगा वल्लभ हा या नगरीचा सेनापती झालेला आहे. त्याचा सुलोचनेशी प्रीतिविवाह झाल्यानंतर त्याला विक्रमाने संसारही संन्यासाइतकाच पवित्र असतो असे सांगत आशीर्वाद दिलेला आहे.
अचानक कोसलचा राजा विद्युतगर्भ त्यांच्या राज्यावर चालून येत असल्याची बातमी येते. शाक्यातील प्रबलतम जनतेने संन्यास घेतलेला आणि ती सर्व राजनगरी पराक्रमशून्य बनलेली असताना एक सरदार पुन्हा सेनापतीकडे येतो. 
शत्रूसैन्य अर्ध्याहून अधिक राज्य हस्तगत करीत राज्यात घुसते तेव्हा सेनापतीचा मुलगा वल्लभ या युद्धाला सामोरा जाण्यास सज्ज होतो. आता सन्यस्त विक्रमापुढे संन्यास सोडून राज्याला वाचविणे अधिक महत्वाचे ठरू लागते. जोवर आजूबाजूचे राजे बुद्धांना पूजित गेले तोवर क्रोधावर दुष्टतेवर त्यांच्या दया-क्षमा या मूल्यांनी विजय मिळवला खरा पण विद्युतगर्भाने मात्र ही सीमा ओलांडून दुबळ्या दयेचा प्राण घेतला. आता राजदूतांच्या विनंतीला मान देत पुन्हा शस्त्र हातात घ्यावे का या त्याच्या मनातील शंकेवर बुद्धांनी त्यास सल्ला दिला तो अहिंसेच्या मार्गाचा अवलंब कर व शस्त्रसंन्यास मोडू नकोस हाच. परंतू सेनापती विक्रम जेव्हा त्याचे खड्ग समोर पाहतो व राज्याची दुदर्शा बघतो तेव्हा त्याला संन्यासाचा संन्यास घेण्यावाचून पर्याय उरत नाही.
वल्लभ शत्रूच्या ताब्यात सापडतो. हे वृत्त सुलोचनेस त्याच्या पत्नीस कळताच ती क्षत्रिय पत्नी पुरषी वेशात सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेते इतकेच नव्हे तर सेनापती विक्रमाच्या सेनेचा भाग होत प्राणपणाने लढतेदेखील. चार दिवसांच्या लढ्यानंतर शरण न आल्यास वल्लभाचा तत्क्षण शिरच्छेद केला जाईल, या अटीतूनही हे पिता व पत्नी राज्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतात. ते दोघेही पतीपत्नी पुढे युद्धात मरण पावतात. स्त्रीचं रणरागिणीचं रुप इथे वर्णन केलेलं आहे.
घायाळ झालेल्या विक्रमास बुद्ध युध्द करण्यापासून रोखू पाहतात. या संन्यस्त खड्गामुळे मी हजारो निरपराधांचे जीव वाचविले असं म्हणणाऱ्या त्याला बुद्ध परंतू तो खड्ग कलंकित झाला असल्याचे असे सांगतात. पण अखेरीस धर्म प्रकट होऊन त्यास महाकर्मयोगी वीरवर असं संबोधत तूझ्याबद्दल जगतास विस्मृती जरी झाली तरी तुझे हे कर्मसंन्यास तुला निर्वाणच्युत होउ देणार नाही असे निश्चितपणे सांगून जातो.

टिप्पण्या