आशावायु....


तुम्ही फेसबुकवर आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांचं एक विचित्र स्टेट्स शेअर केलेलं वाचलं आहे का? त्यात लिहेलेलं असत की तुमचं मृत्यू कधी होणार आहे आणि कशा पद्धतीने. मी वाचलंय काहीजण म्हणे अपघाताने तर काही दुर्धर आजाराने मरण पावणार आहेत. मग काहीजण जे आत्ता ५० वर्षांचे आहेत ते अजून ८० वर्ष जगणार आहेत तर काही पुढे जेमतेम १० वर्ष असतील. मला हे असलं वाचून कायम विचित्र वाटतं! का वाटत असेल या लोकांना ह्या साईटवर जाऊन असं काहीतरी शोधून काढावं? खरंच कमालीचा विषय आहे हा की, भविष्यात काय होणार हे आपल्याला अजिबात माहित नसतं त्यामुळे सतत एकप्रकारची अस्थिरता किंवा कुतूहल आपल्या मनात जिवंत असतं. एकदा जन्माला आलं की आपल्या हातात आपल्या आयुष्याचा लेख मिळाला की बाबारे, तुझं नाव हे, तू २० वर्षांनी हा हा उद्योग करत असशील तुला २-३ मुलं होतील. बायको बरी असेल, त्यामुळे परिस्थिती फार हाताबाहेर जायची नाही, तू साधारण ७० वर्षाचा झालास की तुझं गुडघ्याच ऑपरेशन होणारे मग तू ७ वर्षांनी बाय बाय. अरे!! काय म्हणजे किती फालतू झालं न आयुष्य. म्हणजे सिंहगड चढला वर मस्त भजी खाल्ली आणि खाली उतरलो. पण मध्ये अधे काय केलं? आम्हाला थेट उंची गाठायची घाई मधला रस्ता कसा होता, जाताना काय पाहिलं, काय होतं पण बघायचं राहून गेलं त्यानंतर तिथे पोहोचलो तेव्हा काय वाटलं असा त्या मार्गाचा पूर्ण प्रवास जास्त स्मरणीय नाही का वाटत?
भविष्य खरं की खोटं कोणास ठाऊक पण जे घडणार असतं ते घडतंच असतं आणि काय घडणार माहित नसतं म्हणूनच कदाचित ते घडूही शकतं. मग त्याला आपण नियती म्हणून तरी स्वीकारतो किंवा देवाची इच्छा म्हणून तरी मग ते जाणून घ्यायची इतकी घाई ती काय करायची? हे आपलं माझं मत.
हं म्हणजे भविष्य बघावं की बघू नये? हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  जेव्हा समोरचा रस्ता आपल्याला कुठे घेऊन जातोय हे कळेनासं होतं तेव्हा भविष्य पाहिलं की काही वेळेला आधार मिळतो तात्पुरता का होईना! किंबहुना मला तर वाटतं माणूस भविष्य बघितलं ना की काही वेळा त्या सारखे वागायला लागतो. एखाद्या सकाळी वाचलं की आज वाहनापासून सावधगिरी बाळगा की माणूस स्वतःच वाहन सुरक्षितपणे तरी चालवतो किंवा काही झालीच पडझड तर भविष्य सांगणाऱ्याला चार शिव्या घालून मोकळा होतो. हा आठवडा चांगला भरभराटीचा जाणार वाचलं की लगेच आत्माराम सुखावतो आणि आहा: पुढच्या काही दिवसांची चिंता थोड्या वेळापुरती तरी मावळते. अर्थात ही भरभराट आपली आणि अंबानी किंवा टाटा बिर्लाची वेगवेगळी असते जरी राशी सारखी असली तरी हे आपण लक्षात ठेवायला हवं.
राशीचक्र कार्यक्रमात वगैरे त्या त्या राशीच्या थोरमोठ्यांची चित्र दाखवली जायची त्यानंतर ऐकलेल्या एका संवादात केवळ राम, लक्ष्मण, श्रीकृष्णाची आणि माझी राशी सारखी आहे हाही अभिमान व्यक्त होताना ऐकायला मिळाल्याचं आठवतं. अर्थात या मंगळ, बुध, गुरु, शुक्र ग्रहांनी जनतेला उपजीविकेचा मार्ग खुला करून दिलेला आहे हेही तितकच खरं! अर्थात हा विनोदाचा भाग झाला पण पौर्णिमेचा चंद्र, सकाळचं कोवळं उन, भरलेलं आभाळ, धो धो पाऊस असले हवामानातले बदलही आपल्यावर बरावाईट परिणाम करतात तर पृथ्वीचं भ्रमण आणि ग्रहांच्या बदलणाऱ्या जागा हे माणसाच्या मेंदू आणि मनावर परिणाम करत असतील तर अशक्य नाही. त्या निमित्ताने का होईना लोक मुहूर्त बघून नारळ फोडून एखाद्या कार्याची सुरुवात करतातच की.
      आत्ता या विषयावर लिहित असताना शंकराचार्यांच्या चर्पटपंजरीकेतील एक सुभाषित आठवतंय ते असं,  
पुनरपि रजनी सायंप्रात: शिशिरवसंतौ पुनरायात:
काल: क्रीडति गच्छन्त्य़ायुस्तदपि न मुञ्चति आशावायु:
अशी आपल्या मनातली आशा ही चिरंतन जीवित असते मग त्याला भविष्याचं खतपाणी करा वा नका करू.

शेवटी काय तर आपल्या सर्वांच्या भविष्यात सुख आणि भरभराट असो अशी आशा!!

टिप्पण्या