‘तुम्हाला केवढ्या सुट्ट्या असतात आमचं तसं नाही आम्हाला मोजून इतक्या इतक्या
सुट्ट्या असतात. मजाय तुमची!!’ ‘काय नं सुट्ट्या मिळत नाहीत अग त्यामुळे माझं
हल्ली इंडियाला जायचं ठरवताच येत नाहीये इत्यादी इत्यादी’
तर ‘सुट्ट्या’ या विषयावर परवा बोलत होतो तेव्हा आमचे एक मित्रश्रेष्ठ म्हणाले
‘वाढदिवसाला सुट्टी मिळायला काय बालवाडी आहे का? असल्या सुट्ट्या मिळायला नशीब
लागतं.’ तर दुसरा म्हणाला ‘अरे आमच्याकडे फार कमी असतात सुट्ट्या, वर्षातून फक्त
तीस.’, ‘तुमचं बरं आहे लेको तुमच्या जगात सणसमारंभ असतात महिन्यातून दोनदा शिवाय
शनिवार रविवार आणि कोणी आला, कोणी गेला, कोणी म्हणतो एकाची आज जयंती, कोण म्हणतो
उद्या, कोणी रस्त्यात मंडप घालतो म्हणून रस्ता बंद होतो म्हणून सुट्ट्या जाहीर
होतात... ही ही नं ऐश आहे ऐश!
तरी बर हल्ली कंपन्यांना स्वतःच जागांची भाडी परवडत नाहीत म्हणून ३०-४०%
जनतेला वर्क फ्रोम होम म्हणून घरातून काम करायला सवलत द्यावी लागते आणि काही तर चक्क
घरातून काम सुद्धा करतात.
पूर्वी म्हणे फक्त अमावस्येला काम करीत नसत म्हणजे किती दिवसातून ही सुट्टी
मिळत असेल बघा! घरातून बाहेर पडू नये अशी काहीतरी अंधश्रद्धा होती म्हणून असेल
कदाचित. पण त्यानंतर कोण थोर व्यक्तीने इंग्रजांनी जेव्हा आपल्या भारतीयांना
कामासाठी वेठीस धरले तेव्हा रविवार सुट्टी मिळवून दिली असं वाचायला मिळालं.
आता या सॉफ्टवेअर कंपन्या आठवड्यातून ५ दिवस १२ तास काम करवून घेतात. हळूहळू
कदाचित अडीच दिवस २४ तास असंही करतील. मग प्रचंड सुट्ट्या. या सुट्ट्यांमध्ये काय करणार?
पैसाची काळजी नाही तो तेवढाच मिळेल पण त्यामुळे वेळ मात्र मिळेल तो कसा खर्च करणार?
कदाचित मॉल संस्कृती (यात खूप वेळ घालवण्याची क्षमता असते, पैसा किती गेला फारसा म्याटर
करत नाही.), मुव्ही संस्कृती (हिच्या बळावर आपण जगू शकतो, कारण ह्यात माणसाच्या जीवनाचं
प्रतिबिंब असतं म्हणे!), हॉटेल संस्कृती (यात काय हवं ते खाता येतं आणि ते कसं बनवायचं
ते माहित असावं लागत नाही, आयुष्य संपू शकतं पण प्रत्येकाने जायलाच हवं अशा जगातील
हॉटेलची संख्या संपणार नाही.), आणि टुरीस्ट संस्कृती (केल्याने देशाटन किंवा आधी जग
बघायला हवं तर कळणार नं कसं जगायचं!! हे सगळं तत्वज्ञान तंतोतंत पाळणं अतिशय गरजेचं
असत कारण शेवटी स्टेट्स महत्वाचं) ....अशा सगळ्या संस्कृतीझ वाढणार! आपण लोक खरं तर
सुट्टीत पण खूप बिझी असतो. त्यामुळे रिकामा वेळ अजिबात नसणार ‘कसं आहे, वेळ जेवढा मिळेल
तेवढा कमीच असतो’ ....कोणीतरी म्हणून ठेवलेलंच आहे नं...आणि नसेल म्हणलं तर हे घ्या
आपण म्हटलं!!
चला! मला प्रश्न पडला होता की इतक्या कार्यतत्पर जनतेला अचानक मिळालीच प्रचंड सुट्टी
तर वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडेल की काय पण नाही, अनेक संस्कृत्यांची संस्कृती
प्रत्येकाचा वेळ घालवत राहील इमानदारीत.
चुकून एखाद्याने स्वतःच एखादा उद्योग सुरू केला किंवा बसल्या बसल्या शोध बिध लावला
किंवा काहीतरी अक्राळविक्राळ करून दाखवलंच तर ..छे हो! ....खुळी असायचीच काही माणसं
आपण फार लक्ष द्यायचं नाही!
आपल्याला वेळच कसा मिळत नाही असं म्हणायला आपण मोकळ राहायचं आपल्याला नियोजन करता
येत नसलं वेळेचं म्हणून काय झालं कंपन्या वाईट त्या सुट्ट्या देत नाहीत!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा