काही काळ काही आवाज आपल्याला कसे लख्ख
आठवतात ना अगदी कितीही वेळ उलटून गेला तरी. ते दिवस आपण मनात पुन्हा जगू शकतो आणि
काही आवाज आपल्या कानात ऐकूही शकतो. त्यात कधी एखादा कम्माल अनुभव असतो तर कधी
एखादी दुखरी आठवण. एखाद्या विक्षिप्त माणसाला भेटल्याचा प्रसंग असतो तर कधी
एखाद्या विलक्षण छापपाडू व्यक्तीशी झालेला संवाद असतो. एकुणात काय तर स्मरणरंजनाचा
आनंद.
मला आता आठवतोय तो इंजोनियरिंग करतानाचा
पीएल चा काळ. अचानक विद्यार्थी बनलेली मी आणि महिन्याभराचा स्वघोषित भूमिगत तुरुंगवास.
पण तसल्या त्या दिवसांत आजी आमच्याकडे पुण्यात असेल तर मात्र या पीएलला मधून अधून सुट्टीच
स्वरूप यायचं. कारण ती मध्येच त्या कोठडीतल्या
दारांवर ठक ठक करत खाण्यापिण्याच्या निमित्तानं, गप्पांच्या निमित्तानं किंवा कधी कधी
तर चक्क “पुरे झालं ती बाडं उपसणं, ती सरस्वती काही अचानक तुमच्यावर अशी प्रसन्न होणार
नाहीये” म्हणत आमच्या बंदिवासात व्यत्ययही आणायची.
रात्री अभ्यास केला म्हणून सकाळी उशिरा उठायला
हरकत नाही हा तिचा लाड फक्त सकाळी आठ वाजेपर्यंत मर्यादित होता. मग लगेच तिला खिडकीतून
आत येणारी उन्हं, फुललेला मोगरा, आईनी थालीपीठ काय सुंदर केलंय असं सगळच्या सगळं तेव्हाच
सांगायचं असायचं. त्याबरोबर मग एखादं अत्यंत गरज नसलेलं पण आजीनी सांगितलं म्हणून करावच
लागणारं एखादं कामही असायचं. म्हणजे, माझा जरा चष्मा शोध गं वगैरे आणि अर्थात तो कुठे हे तिला माहित नसणं अशक्य होतं कारण खोड्या काढणे हा तिचा आवडता कार्यक्रम होता आणि त्यात आम्ही नाती
तिच्याकडून सदैव हरायचो.
उठल्या उठल्या एकीकडे समोर बाप्पाशी गप्पा आणि आमच्याशी प्रश्नोत्तरं चालू असायची.
त्यात मग “हं, शंकरास पूजिले सुमनाने!” यांतील 'सुमन'चे अर्थ अपेक्षित आहेत हे आम्हाला
कळायचंच. की, फुशारक्या मारत हे काय फालतू आहे वगैरे म्हणत १. फुल, २. सु-मन म्हणजे
चांगल्या मनाने, असं काही सांगत सो इझी वगैरे म्हणत निघून जावं तर तिचे शब्द यायचे.
३रा अर्थ आहे तो संध्याकाळपर्यंत तरी सांगा म्हणजे झालं. डिक्शनरीचा वापर करणे,
काहीतरी शोधायबिधायचं ह्या: असल्या गोष्टी कुठल्या करायच्या त्यापेक्षा पांढरं
निशाण आणि तयार उत्तर, अजूनही लिहितानासुद्धा त्या आळशीपणातला निवांतपणा सुखावून जातोय.
तर त्याचा ३रा अर्थ गहू.
असं काहीतरी लहानसं पण नवं कळल्यावर दिवसाची सुरुवात उत्साहात व्हायची. मग दुपारी
जेवताना गप्पांच्या ओघात कधीतरी तिने असाच मेंदूला खुराक द्यायचा न म्हणायचं, ‘सिन्दूर
बिन्दूर विधवा ललाटे’ करा समस्यापूर्ती. आधी समस्यापूर्ती कशाशी खातात इथपासून डोक्यात
प्रकाश पडत पडत मग ही शेवटची ओळ का बर बर म्हणत उत्तरही अर्थात तिलाच विचारावं
लागे.
पूजीत होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा!
कवीच्या मनी हे आश्चर्य दाटे, सिन्दूर बिन्दूर विधवा ललाटे!
हुश्श:
तेव्हा वाटायचं की आजीचा मराठी हा आवडता विषय आणि अभ्यासलेला विषय त्यामुळे ती इतक्या
सुंदर प्रकारे त्याचा आस्वाद घेऊ शकते. आपल्याला आपल्या विषयात अशी गंमत घेता येईल
का आणि ती अशी वाटता येईल का? शिकण्यातली आणि कळण्यातली गंमत! आजीच्याच शब्दांत म्हणायचं
तर “मेंदूचं अखंड तेलपाणी करावं लागतं नाहीतर तोही गंजणार ही निश्चित.”
या तिच्या तेलपाण्यात स्वयंअध्ययन आणि स्मरणशक्तीचे कितीक खेळ दडलेले होते हे आज
वाटून जातं. असाच एक खेळ होता भेंड्यांचा. तिला हिंदी गाणी फारशी येत नसत.
त्यामुळे मग आम्हाला मराठी गाण्यांच्या भेंड्या खेळाव्या लागत. त्यात बालभारतीतील मोजक्या
कविता आणि संदीप खरे हाच काय तो आमचा साठा आणि समोर अख्खं ग्रंथालय. तिच्याबरोबर आम्ही
६ नाती एकत्रही हारत असू. ठ, थ असल्या अक्षरांपासून मुद्दाम कसेबसे आठवून एखादं
गाणं तयार ठेवावं तर ही ४-४ गाण्यांसह आम्हाला हरवायला सज्ज. आणि शेवटी शेवटी आमचा
गट पुरता नामोहरम होत असताना तर काय आर्या, अभंग असली मंडळी सहभागी व्हायची.
त्यानंतर स्वरचित ओव्या, संस्कृत सुभाषितं, गीतेतले श्लोक या सगळ्या तिच्या जिंकण्याच्या
ट्रिक्स होत्या. खेळ चालूच व्हायचा रात्री जेवण झाल्यावर मग काय आईला वेळेची आठवण
करायला यावं लागायचं. आजीचं न ऐकून काय करतेय तीसुद्धा मग आमच्या बरोबर सामील व्हायची
आणि खेळ आणखीच रंगायचा.
आजीबरोबर हरण्यातच मजा होती! त्यातून जे शिकलो तो खरं खजिना! आजीची कविता
आजीबरोबर हरण्यातच मजा होती! त्यातून जे शिकलो तो खरं खजिना! आजीची कविता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा