लहान मुलांसाठी Golden books

लहान मुलांना खूप चित्र असणारी पुस्तकं बघायला जशी आवडतात तशीच थोडी थोडी अक्षरओळख झाल्यावर त्यात लिहीलेलं वाचावं असंही वाटायला लागतं. मी पण असंच छानसं पुस्तक शोधताना एक पुस्तक हातात आलं ‘Little golden books’.                ही लहान मुलांसाठीच्या पुस्तकांची एक मालिका आहे. ही पुस्तकं पार १९४२ पासून आजवर वाचली जात आहेत. त्यापैकी ३ खूप सुंदर गोष्टी वाचायला मिळाल्या.
‘The poky little puppy’ ही गोष्ट आहे एका लहानश्या भूभूच्या पिल्लाची. ते पिल्लू आईला न सांगता लपून छपून घरातून बाहेर जात असतं. मग त्याची भावंडं त्याला शोधत त्याच्यापाठोपाठ निघतात आणि आसपासच्या निसर्गाचं निरीक्षण करीत कुठे जाऊन पोहोचतात, त्यांना काय सापडतं आणि त्यानंतर आई त्यांना काय शिकवू बघते याची ही गोष्ट.
Scuffy the tugboat’ या गोष्टीत आहे एक खेळण्यातली पिटुकली बोट पण तिची स्वप्न मात्र आहेत मोठ्ठाली. जेव्हा तिची ही स्वप्न खरी होऊन समोर येतात तेव्हा तिची कशी धांदल उडते. तिचा हा प्रवास मांडलाय लहानग्यांच्या शब्दांत.
The saggy baggy elephant’ यात आहे एक हत्तीचं पिल्लू. त्याला एकदा त्याच्या रूपावरून चिडवलं जातं आणि तो गोंधळून खरोखरच स्वतःला बदलायला निघतो. पण थोडक्याच अनुभवातून त्याला त्याची खरी ओळख पटते.
वेगळं काही तात्पर्य वगैरे न मांडताही खूप ओघवत्या आणि सोप्प्या भाषेत लिहिलेल्या गोष्टी लहान मुलांना ऐकायला नक्की आवडू शकतात. लेखन आहे Janette Sebring Lowery यांचं आणि चित्र आहेत Gustaf Tenggern यांची. काही वाक्य, शब्द यांची द्विरुक्ती गोष्टीला रसाळ आणि लयबद्ध बनवतात आणि त्याबरोबर असणारी बोलकी चित्र छोट्यांनाच काय आपल्चयालाही चटकन आवडून जातात.  


टिप्पण्या