फोर व्हीलरशी ओळख..१

Maruti 800
मी गाडी चालवताना!
फोर व्हीलर चालवता येणं, न येणं ही गोष्ट आपल्या आत्मविश्वासाची चांगलीच परीक्षा घेऊ शकते. लहानपणापासून सायकल, गियर्ड किंवा विदाउट गियर्ड व्हेहीकल चालवू शकू किंवा नाही हा प्रश्न कधीच पडला नाही. पण चारचाकीविषयी मात्र मला कायम संभ्रम होता.
खरं पाहता चारचाकी घरी आली तेव्हाचा माझा उत्साह अवर्णनीय होता असं आठवतंय. स्वर्गाला हात पोहोचावे इतका आनंद आणि आता काय कुठे कुठे कसं फिरुया अशी एकेक स्वप्नमालिका. पण ही चतुर्भुज देवता माझ्यावर सहजासहजी प्रसन्न होणार नव्हती.
कार घेतल्यानंतर काही दिवसात मी बाबांना आग्रह करकरून ही नवी कोरी कार बाहेर नेण्यासाठी मागे लागले. बाबांकडे नवा लायसन्स, नवी कार आणि माझा ‘बाहेर चला’ असा धोशा. मग काय; निघालो. नवी कार ‘सावली मिळावी’ आणि ‘लगेच काही सतत बाहेर काढावी लागायची नाही’ असं ठरवून बाबांनी जरा आतच पार्क केलेली, पण त्यामुळे त्यामागोमाग दोन गाड्या लागलेल्या होत्या. ती बिचारी आता रिव्हर्स मारत दोन गाड्या आणि शेजारी बिल्डिंग अशा कचाट्यात अडकलेली, नंतर एक स्विफ्ट लेफ्ट टर्न की बस त्यानंतर तिला रस्त्याचं दर्शन घडणार होतं. तसं आमच्या सोसायटीचा वाहनांचा चक्रव्यूह लायसन्सची परीक्षा घेण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरू शकतो आणि तसे अनेक अभिमन्यू आमच्या सोसायटीने तयारही केलेले आहेत. पुण्यात अशी आमची काही एकच जागा असेल असंही नाही त्यामुळे अख्खं शहरच रस्त्यातही निरनिराळ्या रणनीती वापरीत महाभारताचं नाव अजरामर  करण्यात मोलाचा वाटा उचलतं.
तर तेव्हा माझे बाबा गाडीच्या आत बसून मला म्हणतच होते, ‘घाईघाईने आत्ता कार बाहेर काढायला नको, लोकाच्या गाड्यांना धक्का नको लागायला’ मी मात्र त्यांना बाहेरून ‘येऊ द्या येऊ द्या’ च्या खुणा करत होते आगाऊपणे. नाही नाही, लोकांच्या गाड्या व्यवस्थित राहिल्या फक्त त्या नादात, बिल्डिंगच्या गच्चीवर साठलेलं पावसाचं पाणी जमिनीवर आणणाऱ्या एका पाईपनी गाडीवर उडी घेतली आणि त्या पाईपनी माझ्या होत्या नव्हत्या चारचाकी प्रेमावर पाऊस पाडला. पुढे १० वर्ष मी बाबांना कार बाहेर काढायला आपणहून सांगितलं नाही आणि आजूबाजूला बघत ‘येऊ द्या’ चे सल्ले तर अजूनही कोणालाही द्यायचे टाळते.
एवढ्यावर माझी न तिची गाठ संपते तर सोप्पं होतं पण म्हणतात नं काही गोष्टी जमणार नसल्या तरी प्रयत्न करीत राहतोच माणूस. तसा मला काही वेळा मुली गाड्या चांगल्या चालवत नाहीत यावर विश्वासही बसायचा. दुचाकी चालवताना पूर्ण वेळ दोन्ही पाय जमिनीला टेकवत ठेवणाऱ्या बदकी प्रवृत्तीचा मलाही अतिशय राग यायचा, काही वेळा तर रस्त्यावर तसं न करण्याची मी विनंती पण करून बघितली पण मला ‘गेली २७ वर्ष मी गाडी चालवतेय आणि तू कोण मला.....’ तो मुद्दा नाहीये, एरवी माझ्या ब्लॉगला एकही कॉमेंट नसते पण यावर मात्र मला सर्व स्त्रीवर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळू शकेल.
असो, तर हळूहळू मी ही आपण चारचाकी न चालवू शकणाऱ्या ‘रडे वाहनचालक’ गटात एक आहोत अशी मनाला समजूतही घातली. पण मुंबईतली नोकरी, दर आठवडा पुण्याची हवा खायची हौस, त्यासाठी एसटीतून होणारा प्रवास यामुळे न राहवून कार शिकायला सुरुवात केली. प्रशिक्षण आणि परीक्षणातून यथाशक्ती पार पडले. हातात लायसन्स मिळाल्यावर थोडसं छान छान, भारी भारी वाटलंही पण मी त्याचा उपयोग केला तो शून्य.
पुन्हा पुढे मग चांगली चार वर्ष गेली मध्ये. मी नोकरी करत नव्हते म्हणून रिकामी आणि बाबा रिटायर झाले म्हणून आमची कार रिकामी होती. त्यामुळे आमची पुनर्भेट झाली. चक्रव्यूहातून बाबांनी कार बाहेर काढून दिली की मग मी रस्त्यावरून निवांत हिंडू फिरू लागले. गर्दीच्या वेळा टाळण्याऐवजी मुद्दाम त्यावेळी गेल्यामुळे कारचा स्पीड न वाढवता कशी मी सहज इकडे तिकडे फिरू शकते यावर इतरांना सल्ले देण्याइतपत अनुभव गोळा केला. मॅन्युअल येतेय आता ऑटो काय सहज येईल म्हणत ती गाडी चालवली खरी पण तेव्हाही माझा मुलगा पहिल्यांदा माझ्याबरोबर आला तेव्हा त्याने  घरी आल्या आल्या कोणी काही विचारण्याच्या आत ‘बाबा, तू निट चालवतोस बृमबृम, आई तू मागे बसत जा’ असं अगदी तत्परतेने सांगितलं आणि माझ्या ड्रायव्हिंगला लगाम बसला.

                                                                      क्रमशः

टिप्पण्या