फोर व्हीलरशी ओळख..२

     पुढे चालू 
‘रस्त्यावर किती गर्दी असते, मुलाला मागे बसवलं नं की तो रडतो आणि म्हणतो, आईनी कार नाही चालवायची, हो; आणि पार्क करायला जागा कुठे असते आजकाल छे..’ असे अनेक विचार माझ्या कार-ड्रायव्हिंगच्या आड येत गेलेले आहेत. मीही अगदी इमानदारीत ते मान्य करून जमेल तितके वेळा कार ड्राईव्ह करणं टाळतही आलेय. नकोच नं ती भानगड, असं म्हणत ज्या म्हणून गोष्टींपासून आपण पळत जातो त्या बरोबर दत्त म्हणून आपल्या समोर उभ्या राहतात. तसंच झालं, भारतातली चारचाकी अमेरिकेत दुचाकी इतकी सहजगत्या फिरताना दिसते. मैलोन्मैल अंतर कापण्यासाठी या चतुर्भूजेला अभिवादन करून शरण जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
      मग काय, इथे पुनश्च हरिओम म्हणत चारचाकीला सामोरं जाणं आलं. भारतात मशीन शिकलं की काम झालं अशी परिस्थिती होती त्याउलट इथे त्या मशिनचं मॅन्युअल पाठ करून त्यावर चक्क लेखी परीक्षा होते. त्यात पास झालं तर त्या मशिनला हात लावता येतो तेही ठराविक नियमांच्या चौकटीत.
      भूगोलाच्या पुस्तकात नकाशे असायचे ना तसे रंगवलेले असतात रस्तेही, हा माझा पहिला धडा. रस्त्यावर डावीकडे उजवीकडे वळण्याच्या खुणा रंगवलेल्या असतात, ठराविक रंगांचे पटटे असतात ते असतात येण्याजाण्याच्या किंवा चक्क दुसऱ्याला ओव्हरटेक करण्याच्या समंतीदर्शक खुणा.
अहाहा! चुकून असं काही पुण्याच्या रस्त्यात घडलं तर... मला एक सोनेरी स्वप्न पडलं.. आणि गाडीत सदोदित गर्दीची सूचना द्यायला सज्ज असणाऱ्या रेडियो वरून सगळेच रस्ते सुरक्षित आहेत कुठूनही जा असं काहीबाही विचित्र ऐकू आल्याचा भास झाला.
नकाशात आपण उजवीकडे उत्तर दिशा दाखवायचो आणि नकाशात काय काय आहे याची सूची लिहायचो तशाच प्रकारे इथेही रस्त्यावर चहूदिशानी आयताकृती पाट्या दिसत असतात. आणि हो त्या जाहिरातीच्या नसतात त्यावर रस्त्यावर गाडीचा वेग किती असावा, यानंतर किती अंतरावर शाळा आहे, कुठे वळण आहे तर कुठे थांबावं लागणारे, कुठे प्राणी रस्ता क्रॉस करतील तर कुठे रेल्वे क्रॉस करेल असे बरेच काही लिहिलेले असते. या सगळ्या पाट्यातून काय बिशाद आहे आपली पाटी कोरी राहील? आपल्याकडच्या विचित्र, विक्षिप्त, तटस्थ किंवा आगाऊ पाट्यांचं कौतुक आपण खूप ऐकून असतो. पण चुकून कोणी रस्त्यावरच्या दिशादर्शक किंवा स्थानदर्शक पाट्याही किती चांगल्या आहेत असं बोललेलं ऐकिवात नाही.
याव्यतिरिक्त असतात ते सिग्नल. तीन रंगांचे तीन सिग्नल असतात, ते एकतर जेव्हा चालू असतात तेव्हा ते पाळायचे असतात; नाहीतर समोर जर कोणीही नसेल तर सहसा सिग्नल पाळला की फक्त मागच्या गाडीतून हॉर्न ऐकू येतो. अशा भ्रमात जर आपण असू तर आपले डोळे खाड्कन उघतात. इथे सगळे सिग्नल सतत चालू असतात आणि रस्ता रिकामा असला तरी लोक ते पाळतातसुद्धा ..हो ..जरी रस्त्यावर पोलीस नसला तरी. हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर आपल्या देशात ही एक गोष्ट घडली तर आपण आपल्या विकासात सुमारे हजार पावलं पुढे जाऊ.
असो तर सुरक्षितता या ध्येयासाठी आखल्या गेलेल्या नियमांच्या चरक्यातून आपण उसासारखे पिळून निघतो. रस आणि चोथा वेगळा व्हावा तसा सतर्कपणा आणि अतीआत्मविश्वास वेगळा होतो. सुतासारखा सरळ झालेला वाहनचालक स्वतःची आणि दुसऱ्याची, दोघांच्या गाड्यांची आणि देशाची सगळ्याची काळजी करीत सावधपणे ड्रायव्हिंगव्हीलला हात लावतो.
काही गोष्टीत नापास होण्याचंही जसं कौतुक होतं, जसं ज्याला एटीकेटी नाही तो खरं इंजिनियर नाही वगैरे वगैरे तसलाच इथे गाड्या चालवताना नापास न झालेला खरा ड्रायव्हर नाही असले सल्ले देणारे पूजनीय लोक मला खूप भेटले ज्यानी माझं त्या परीक्षेला जाण्याचं मनोधैर्य कायम राखलं. लेखी परीक्षा देण्यापूर्वी ड्रायव्हर साठी चे पुस्तक मदतीला आले. त्यांतर त्या लायसन्स देणाऱ्या खात्याने उपलब्ध केलेल्या अपेक्षित प्रश्नाच्या याद्या याला ‘दहावी बोर्ड परीक्षेसाठी असायचं तसं २१ अपेक्षित’ वगैरे म्हणायला हरकत नाही. हे सगळं मदतीला होतच शिवाय कित्येक जणांचे इंटरनेटवर त्या प्रक्रियेविषयी असणारे सल्लेही फुकट उपलब्द्ध होते. अखेरीस मला तसे विशेष काही धक्के न बसता मी यातून तरून गेले आणि माझी गाडी ‘चालविणे’ या मुद्द्यावर येऊन पोहोचली.
शिकाऊ चालकाकडून काय काय अपेक्षित असतं याचीही यादी दिलेली असते बर का, म्हणजे सगळ्याचा आकृतीबंध तयार असतो इथे. तसं मग गाडी पुढे मागे घेणे, मागे घेताना नुसतच आरश्यात न बघता मागे वळून बघणे इत्यादी घटना करू त्या घोकतच ते ठिकाण गाठलं. रस्त्यावर असणार परीक्षा, बापरे उजवीकडे जवळच एक रेल्वे स्टेशन आहे तिकडे नेलं तर, किती फुटांवर थांबायचं असत? हो आणि सिग्नल कुठले असतात तिकडे असले सगळे घोकत घोकत परिक्षकाशी सामना केला. मनात चक्क जप करत होते की कुठलाही यील्ड सिग्नल आपल्या नशिबी न यावा. कारण या यील्ड्शी माझा अजून काही फारसा परिचय आणि मैत्री झालेली नाही आणि भारतात सर्वच सिग्नल आणि एकूण व्हेहिकल आपण स्वतःला यील्ड घेतच चालवतो.
झालं, एकदाची किल्ली लावली आणि इंजिन सुरु झालं. त्यानंतर फक्त स्ट्रेट, टर्न, लेफ्ट, राईट असलं काय काय करत, गाडी सरळ रेषेत मागे घेणे, डेडएंडला ती १८० अंशात वळवणे, पार्क कर अशी सगळी प्रात्यक्षिके पार पाडून त्या परीक्षकाने माझ्या चुकांचा शेवटी पाढा वाचला आणि मला वरच्या वर्गात ढकलले आहे असं सांगितलं.
वाटत होतं त्यापेक्षा बरीच निवांतपणे डोंगर पोखरून उंदीर घ्यावा तसा लायसन्स हातात घेऊन मी बाहेर पडले. आता इतपत प्रगती झाल्यानंतर सिनेमात किंवा प्रत्यक्षात लोक म्हणतात लॉंग ड्राईव्हला जाऊ किंवा मी जातो वगैरे याची मजा काय असू शकेल याचा अंदाज बांधू शकते.

टिप्पण्या